Akola News : कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण अशा विविध योजनांचे प्रत्येक जिल्ह्यात कोट्यवधींचे अनुदान महिनोमहिने रखडलेले असून शेतकरी सातत्याने याबाबत कृषी विभागाकडे विचारणा करीत आहेत. एकट्या पश्चिम विदर्भात रखडलेल्या अनुदानाचा आकडा सहा कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेसह इतर योजनांमधून शेतकऱ्यांना शेती अवजारे व कृषी सिंचन सुविधांसाठी देण्यासाठी अर्ज मागवले जातात. यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांना अवजारे व सिंचन साहित्य खरेदी करण्यास पूर्वसंमती दिली जाते.
मागील काही महिन्यांपासून या योजनांचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी तसेच या साहित्याचे विक्री करणारे अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांनी उसनवारीसारखे व्यवहार करीत साहित्याची खरेदी केली. अनुदान मिळाल्यानंतर ते परत करण्याबाबत हे व्यवहार ठरलेले आहेत.
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना पेरणीयंत्र, मळणीयंत्र, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर, विद्युत मोटरपंप, पाइप, यांसह अन्य अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते. मागील वर्षात शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण अभियानातून विविध कृषी अवजारे तसेच कृषी सिंचन सुविधेसाठी साहित्य खरेदी केले होते.
याची देयके सादर झालेली आहेत. परंतु या शेतकऱ्यांचे अनुदान मागील सात ते आठ महिन्यांपासून रखडले आहे. काही शेतकऱ्यांना तर आता वर्षपूर्ती होत आहे. अनुदानाबाबत शेतकरी कृषी कार्यालयांकडे विचारणा करीत आहेत. याबाबत कृषी विभागाकडे विचारणा केली असता शासनाकडून अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
वाशीम जिल्ह्यात सव्वा दोन कोटी, बुलडाण्यात साडेतीन कोटी तर अकोल्यातही दोन कोटींपर्यंत अनुदान प्रलंबित आहे. केंद्र हिस्सा रिलीज न झाल्याने ही मदत रखडलेली असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्षभरापूर्वी सिंचन साहित्य घेतले. योग्य ती बिले सादर केली. मात्र, अद्यापही अनुदान मिळालेले नाही, असे जळगाव जामोद तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.