Sameer gaikwad : फुफाट्याचे दिवस-सायबू राठोडची गोष्ट

नव्वदीपार केलेला म्हातारा सायबू राठोड अजूनही रोज गावात येतो. उदास झालेल्या पाराच्या कट्ट्यावर फिकट चेहऱ्याने बसून असतो, तेव्हा अस्ताला जाणारा सूर्य त्याच्या डोळ्यात उतरतो, कानाकोपरा धुंडाळतो.
rural Stroy
rural StroyAgrowon

-समीर गायकवाड


सायबू म्हणजे वठलेल्या लिंबाचा बुंधा. वय झाल्यानं त्याच्या अंगाची कातडी लोंबत होती, पाठीत बाक आला होता, ढोपरांची हाडं वर आली होती. पायातलं बळ मात्र टिकून होतं.

नडगीच्या हाडावर चटका दिलेला डाग वागवत मिशांना पीळ देत दिवस मावळायच्या बेतात असताना तो गावात यायचा.

चोरखिसे असणारा अंगरखा, सैल चोळणा हा त्याचा वेश. लालजर्द रेशमी फेट्याखाली डोईवरचे चांदी झालेले राठ केस दडून असत. कपाळावर आठ्यांची नक्षी असे, त्यात केसांच्या बटा डोकावत.

टोकदार तरतरीत लांब नाकाखालच्या झुपकेदार मिशा त्याच्या राकट चेहऱ्याला शोभून दिसत. हनुवटीवरची म्हस लक्ष वेधून घेई. दाट जाड्याभरडया भुवयाखालचे मिचमिचे डोळे गोंधळात टाकत. डोळे वटारल्यावरच त्याच्या नजरेतली जरब कळे.

पहाडी घोगऱ्या आवाजानं माणूस दचके. बोलताना कानाच्या पाळ्यातल्या सोन्याच्या बाळ्या लकालका हलत. निम्मेअर्धे दात पडले असले तरी बोलताना खालच्या जबड्यातले सोनेरी दात चमकत. रासवट काळ्या ओठामुळे तो अधिकच रानटी वाटे.

पारावर बसून पाय हलवू लागला की त्याच्या पायातली चांदीची जाडजूड घडीव तोडी किनकिनत. हातातलं कडं थेट कोपरापर्यंत मागं रेटून घातल्यानं मनगटापर्यंतच्या धमन्या तटतटून फुगलेल्या दिसत.


त्याला पहिल्यांदा पाहणारा माणूस त्याच्याबद्दल वेगळाच विचार करे. म्हातारा रासवट, कणखर, खडूस असावा असं वाटे. पण वस्तुस्थिती तशी नव्हती.

झिजलेल्या चंदनाबद्दल सगळेच बोलतात पण वर्षानुवर्षे घरदारासाठी झिजणाऱ्या सहाणेबद्दल कुणीच बोलत नसतं, सायबूचं जगणं त्या सहाणेसारखं होतं!

गावाबाहेरच्या तांड्यावरल्या वस्तीत सायबू राठोडचं घर होतं. त्याच्या कळत्या वयापासून बापासोबत दारू गाळायचं काम तो करायचा. त्याचा बाप चरणू राठोड एक नंबरचा तरकटी माणूस. दारू गाळता गाळता कधी दारुडा झाला, हे त्यालाच कधी उमगलं नव्हतं.

एकदा चार पिंपं भरुन दारू तयार करून झाल्यावर चरणू तर्र होऊन गेला होता. तांड्यावर आलेल्या माणसात काही नवाडे होते. त्यांची नजर वाईट होती. त्यातल्या एकाने चरणूला डिवचले.

पिसाळलेला चरणू होलगडत उठला, झोकांड्या खात घरात शिरला. आपल्या पोलादी हातानं तारीबाईच्या दंडाला करकचून धरत तिला हिसके देत त्यानं बाहेर खेचलं.

ती माणसं चेकाळली, त्यांनी सायबूला आपल्या कह्यात केला. चरणूनं आधी तारीच्या मुस्कडात दोन ठेवून दिल्या, नंतर तिच्या चुनरीला हात घातला. दारूड्यांनी कनपटीला बांधलेल्या नोटा चरणूपुढे ढिल्या केल्या, मग तर त्याला जास्तच चेव चढला.

इतका वेळ दाराआड दडून आपल्या बापाची आगळीक पाहणारा सायबू त्वेषानं पुढे झाला आणि त्यानं आईला मागे ओढत चरणूच्या पेकाटात लाथ घातली.

चवताळलेल्या चरणूने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता त्यानं दारूभट्टीच्या चुलीतलं जळतं लाकूड बाहेर ओढून सायबूच्या नडगीवर धरलं.

पोरवयीन सायबू जिवाच्या आकांतानं ओरडत होता, हतबल झालेली तारीबाई पुढे झाली पण तशाही अवस्थेत सायबूने तिला मागे ओढले.

बापाने दिलेल्या डागण्या सायबूच्या नडगीवर जन्मखूण बनून आयुष्यभर सोबत राहिल्या, पण त्याचे व्रण त्याच्या मनावर उमटले. त्यानं पुऱ्या आयुष्यात बापाचा दुःस्वास केला.

तारीबाई दुखण्यात अकाली मरून गेली आणि त्याचं उरलं सुरलं सुखही करपून गेलं. रिवाजानुसार त्याचं लग्न झालं, झिलनसॊबत त्याचा संसार यथातथाच झाला. फारशा अपेक्षा नसणारी सामान्य विचारांची चौकटबद्ध स्त्रीत्वात चिणून गेलेली साधीभोळी पोर होती ती.

तिच्या तऱ्हेवाईक वागण्याने सायबू उदास झाला. बाकीच्यांना जशी खंडीभर पोरंबाळं झाली तशी त्यानं होऊ दिली नाहीत. तीन पोरं आणि एका पोरीवरच त्यानं हात आखडता घेतला.

सायबूचा थोरला पोरगा श्रीमंत्या हा चरणूच्या वाटेवरचा निघाला, धाकट्याला सायबूच्या प्रयत्नामुळे शाळेची गोडी लागली.

तर मधल्या पोरानं दोन्ही भावांना समान साथ दिली. दारू ढोसून पोटाचं खोकं झालेला चरणू मरून जाण्याआधी वयात आलेल्या श्रीमंत्यानं बापाचा विरोध झुगारत त्याचा धंदा सांभाळला. आपल्या पोराच्या कृतीनं सायबू खचला.

श्रीमंत्यानं चरणूच्या सगळ्या सीमा लांघत केमिकल वापरत गावठी दारूचा धंदा असा काही फॉर्मात आणला की गावानं तोंडात बोटं घातली. वशिंड उतरलेल्या बैलागत पडलेल्या मानेने सायबू बसून राहू लागला. अख्खं गाव झिंगू लागलं.

आयाबायांचे तळतळाट त्याच्या कानी येऊ लागले. बापाने जे केलं तेच पोराला करताना पाहून त्याला अपराधी वाटलं. पुढे जाऊन त्याची पोरं विभक्त झाली. आपण वस्ती सोडून गेलो तर श्रीमंत्या अजून बेपर्वा होईल आणि त्याच्या हातून काही तरी अघोरी कृत्य घडेल या धास्तीने तो त्याच्यापाशीच राहिला.


श्रीमंत्याचं लग्न लावून दिलं तरी त्याच्यात फरक पडला नाही. दारू अड्ड्यामुळे सायबूच्या घरादाराची लक्तरे वेशीवर केव्हाच टांगली होती त्यात भर पडू लागली होती लुटमारीची, लबाडीची, नशेखोरीची, दमदाटीची. पोलिसांच्या धाडी, भांडणतंटे नेहमीचं झालं. नंतर तर श्रीमंत्यानं सायबूवर देखील हात उचलायला मागेपुढे पाहिले नाही.

आधी बापाकडून आणि नंतर पोराकडून मार खाणारा सायबू घुमा झाला. त्याच्या मनात हजार विचारांचा जहरी नागफणा तोंड काढू लागला.

एके दिवशी श्रीमंत्यानं माणूसकीच्या सर्व सीमा ओलांडत कहर केला. किशोरवयीन मुलाला ढवळणीच्या दांडक्यानं गुरासारखं बदडून काढलं. आडव्या आलेल्या बायकोचे दात पाडले. सायबूने पोलिसात तक्रार देताच त्यांनी कारवाईचं नाटक केलं.

सायबू पुरता हताश झाला. गावात तोंड दाखवायला जागा उरली नाही. एके रात्री त्यानं मनात निश्‍चय केला आणि दिवस उजाडताच सगळं त्याच्या मनाजोगतं घडत गेलं.

तो वैशाखातला रखरखीत दिवस होता. श्रीमंत्याच्या अड्ड्यावर त्या दिवशी टेम्पो भरून मालाची आवक झाली. सगळी पिंपं उतरवून घेतली गेली. काळ्यापिवळ्या गुळाच्या माशांनी लगडलेल्या ढेपी, नवसागराच्या वड्यांचा ढीग, युरियाचं दुधाळ पाणी सगळं फेसाटून निघालं होतं.

भकाभका आग ओकणाऱ्या भट्टीवरच्या लोखंडी बॅरेलमध्ये एकेक करून सामग्री ओतली गेली. हाताखाली राबणारी दोन टुकार पोरं मदतीला घेऊन श्रीमंत्या स्वतः रबरी ट्यूबमध्ये दारू भरून देत होता, सायकलवरून माल रवाना होत होता. दिवस मावळेपर्यंत दारू गाळली जात होती, घशाखाली उतरत होती.

चार बॅरल दारू चुलीवर तशीच ठेवून अंधार होताच श्रीमंत्या तिथंच लोळत पडला. त्याचे कामगार दारू ढोसून आणि वाट्याचे पैसे घेऊन चालते झाले.

किर्रर्र अंधार होताच तिथं छुप्या पावलांनी हालचाल झाली. आवाज न करता दोन पिंपं खाली ओतून दिली गेली. मातीत दारूचा चिखल झाला. काडी ओढल्याचा आवाज आला आणि फक्ककन भट्ट्या पेटल्या. दारू पेटली. कानठळ्या बसवणारा स्फोट झाला.

rural Stroy
Sameer Gaikwad Story : शेवंता म्हणजे अजब रसायन...

आगीचे लोळ उठले. दारूच्या नशेत तर्रर्र असलेला श्रीमंत्या आगीने होरपळू लागला, किंचाळ्या फोडू लागला. आवाजानं जाग आलेल्या त्याच्या बायकोच्या तोंडात कुणी तरी बोळा कोंबून ठेवला होता. श्रीमंत्याच्या अतिरेकी वागण्यानं वस्तीवरची भावकी कधीच दुसरीकडं निघून गेली होती. आगीचं तांडव बराच वेळ सुरु होतं. त्यात श्रीमंत्याची राखरांगोळी झाली.

पोलिसांनी शंभर प्रयत्न केले पण सायबूला काहीच सांगता आलं नाही. पेटत्या भट्टीत दारू सांडून स्फोट झाल्यानं श्रीमंत्या मरण पावल्याचा निष्कर्ष निघाला. श्रीमंत्याची बायको आपली पोरंबाळं घेऊन कायमची माहेरी निघून गेली.

सायबूच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच्या भाऊबंदांनी त्याला हात दिला. सायबूच्या बाकीच्या पोरांनी त्याला आपल्यासोबत येण्याचा खूप आग्रह केला; पण आपली चिता इथंच पेटवायची, या निर्धाराने भळभळणारा सायबू झिलनला सोबत घेऊन भावंडापाशीच राहिला. त्याची मुलं सणावाराला, बिरूदेवाच्या यात्रेला येत राहिली.

काळ पुढे जात राहिला. थकलेली झिलन देवाघरी गेली आणि सायबू खऱ्या अर्थाने एकाकी पडला. वेळ मिळेल तेव्हा तो गावात जाऊ लागला. आभाळाकडं बघत बसून राहू लागला. त्याच्या अंगाचं चिपाड झालं पण अंतःकरणातली मायेची ओल आणि अपराधीपणाची सल त्याला जगवत राहिली.

तिशीतल्या कुठल्याही पोराला सायबू आपला श्रीमंत्या समजतो. त्याच्या गळ्यात पडतो, ढसाढसा रडतो. चार-पाच वर्षांचं पोर वस्तीवरून उचलून आणून गावात येतो, आपला नातू सोबत आणलाय असं म्हणत वेड्यासारखा हसतो आणि हसता हसता रडतो.

रात्री झोप लागल्यावर आजूबाजूला आग लागल्याचं स्वप्न पडतं. श्रीमंत्याच्या किंकाळ्या त्याच्या कानात घुमत राहतात, मग लाल घागरा चोळी घातलेली, कशिदा कवड्यांनी, आरशाच्या तुकड्यांनी सजवलेली भडक रंगाची ओढणी घेतलेली झिलन नाहीतर तारीबाई त्याला गोंजारत राहतात.

दंडात वाकी घातलेल्या त्यांच्या हातात कधी हस्तिदंती, शिंगाच्या किंवा पितळी बांगड्या असतात. त्यांना घट्ट कवेत धरत घामेजलेला सायबू डोळे घट्ट मिटून घेतो. मग भल्या पहाटेस त्याला डोळा लागतो.


अस्ताला जाणारा सूर्य जेव्हा सायबूच्या डोळ्यात उतरतो तेव्हा त्याला त्या रात्रीच्या आगीची धग जाणवते. तो कासावीस होतो आणि बाहेर पडतो. खरंच सायबूच्या अंतःकरणात खूप मोठी धग होती; जी त्याला जगवत होती आणि झिजवून खंगवतही होती...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com