
Pune News: निर्यातक्षम फूल उत्पादनासाठीचे क्लस्टर विकसित झालेल्या तळेगाव दाभाडे (जि. पुणे) येथे पणन मंडळाच्या वतीने सुमारे १०० कोटी रुपये खर्चून आंतरराष्ट्रीय फुलबाजार उभारण्यात येत आहे. या फुलबाजाराचा अंतिम आराखडा तयार झाला असून, उत्पादन ते निर्यातीसाठी पुष्पसंशोधन संचालनालयाचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे. हा अंतिम आराखडा लवकरच भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) सादर केला जाणार असल्याचे पणन मंडळातील सूत्रांनी सांगितले.
शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त व्हावा आणि याद्वारे शेतकरी निर्यातदार व्हावा या उद्देशाने पणन मंडळाने काही वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने फ्लोरिकल्चर पार्क उभारले आहे. या पार्क प्रमाणेच मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी पॉलिहाउसच्या माध्यमातून निर्यातक्षम फुलांचे उत्पादन घेत आहे.
या पार्कमधून आणि मावळ तालुक्यातून ‘व्हॅलेंटाइन डे’साठी वर्षभरातून लाखो गुलाब फुलांची निर्यात होते. मात्र फ्लोरिकल्चर पार्कमध्येच आंतरराष्ट्रीय फुल बाजार उभारण्याची मागणी पार्कमधील शेतकरी अनेक वर्षांपासून करत होते. यानुसार पणन मंडळाने पुढाकार घेत, मंडळाच्या राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये आंतरराष्ट्रीय फुलबाजार उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
या बाबत पणन मंडळाने भारतीय कृषी संशोधन परिषदेला (आयसीएआर) समन्वय साधत सविस्तर प्रकल्प आराखडा करण्याचे हाती घेतले आहे. प्रकल्प आराखड्यात विविध तज्ज्ञांसोबत सल्लामसलत करून, आराखडा अंतिम टप्प्यात आला असून, तो पुढील ८ दिवसांत अंतिम मान्यतेसाठी ‘आयसीएआर’ला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
‘डीएफआर’चे मार्गदर्शन मोलाचे
पुष्पसंशोधनासाठी देशपातळीवरील संशोधन संस्था मांजरी (ता. हवेली) येथे कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध फुलांची मागणी ध्यानात घेऊन, नवनवीन वाणांचे संशोधन केले जात आहे. यामुळे संस्थेचे मोलाचे मार्गदर्शन आंतरराष्ट्रीय फुलबाजार उभारण्यासाठी होणार आहे.
फ्लोरिकल्चर एक्सलन्स सेंटर
डच तंत्रज्ञानाने फ्लोरिकल्चर एक्सलन्स सेंटर देखील राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये उभारण्यात आले आहे. यामुळे फुलशेतीमधील आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होत आहे. तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचे फूल निर्यातीचे हब या ठिकाणी विकसित होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.