
Chhatrapati Sambhajinagar : निसर्गचक्र आणि गेल्या अनेक वर्षांतील आपल्याला शेती करताना आलेल्या अनुभवातून आपल्या शेतीच्या पुढील वाटचालीची दिशा ठरवण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे यांनी दिला.
‘ॲग्रोवन’च्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त शेकटा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथे बुधवारी (ता. १९) आयोजित ‘ॲग्रोवन संवाद’ कार्यक्रमात ठिबक सिंचनाचे महत्त्व आणि विद्राव्य खत व्यवस्थापन याविषयी डॉ. झाडे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते.
अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तर ‘फिनोलेक्स ठिबक’चे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रशांत जाधव व जनरल मॅनेजर ललितसिंग भंडारी, उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त शेतकरी सिकंदर जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविकातून ‘ॲग्रोवन’चे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी ‘ॲग्रोवन’च्या आजवरच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.
डॉ. झाडे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षाचा पाऊसकाळ बघता पाच ते सात वर्षांत दोन ते तीन वर्षे दुष्काळाचे तर दोन-तीन वर्षे चांगल्या पावसाची राहतात. फळबागांच्या व्यवस्थापनात शेतकऱ्यांनी तीन वर्षांच्या पुढच्या फळबागांना दोन ड्रीपरद्वारे पाणी द्यायला हवे. उत्पादनक्षम फळझाड वाढीसाठी हे आवश्यक आहे.
झाडाच्या बुंध्यापासून किमान एक फुटावर ड्रीपर असायला हवे. रान वापश्यावर येत नाही तोवर कोणतेही पीक त्याला आवश्यक पाणी घेत नाही. त्यामुळे वापसा आल्याशिवाय पाणी देऊ नये. वापसा येण्याआधीच पाणी दिले जात असल्याने बुरशीचे प्रमाण वाढते आहे. ठिबक तंत्राद्वारे क्षारयुक्त पाणी वहन केले जात असल्यास ड्रीपरची ॲसिड ट्रीटमेंट करून घ्यावी.
तळ्यातून, कॅनॉलमधून पाणी घेत असल्यास सेंड फिल्टर स्क्रीन फिल्टर वापरणे आवश्यक आहे. ठिबक असेल तर विद्राव्य खताचा वापर करायलाच हवा. ठिबकने दिलेली विद्राव्य खते ९० टक्के पीक घेतात तर जमिनीतून दिलेली खते फक्त ३० ते ४० टक्केच पिकं घेतात. हे समजून घ्यायला हवे.
‘फिनोलेक्स’चे श्री. जाधव म्हणाले, की पाणी व्यवस्थापन दुर्लक्षित विषय राहिला आहे. परंतु तो समजून घेतल्याशिवाय पर्याय नाही. पाणी किती द्यायचे, कुठे द्यायचे, ड्रीपर कोणते वापरायचे हे समजून घ्यायलाच हवे. जमीन वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात.
त्यामुळे कोणत्या जमिनीत किती पाणी दिले म्हणजे ते पिकासाठी चांगले याचेही शास्त्र समजून घ्यायला हवे. खास करून उन्हाळ्यात पाण्याची वाफ होण्याचे प्रमाण किती हे ठरवूनच ड्रिपरद्वारे पाण्याचा डिस्चार्ज निश्चित करायला हवा.
श्री. भंडारी म्हणाले, की विद्राव्य खते चांगली कशी हे ओळखणे शेतकऱ्यांनी शिकले पाहिजे. विद्राव्य खतांचे पाच चांगले गुणधर्म समजावून सांगत कमी पीएचचे विद्राव्य खते द्यायला हवी.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. देशमुख म्हणाले, की निसर्गातील बदलाने पाणी मातीचे महत्त्व अधोरेखित केल आहे. ठिबकवर गव्हाचे पीक घेणारे शेतकरी आपल्याकडे दिसत आहेत.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विभागाचे संजीव साठे यांनी केले. फिनोलेक्सचे डीलर योगेश वाघ आणि बबनराव वाघ, ‘ॲग्रोवन’चे वितरण प्रतिनिधी सुनील दाभाडे, ‘फिनोलेक्स’चे एरिया मॅनेजर संदीप कावले, संग्राम अडसूळ, गणेश पोकळे, शिवम ढाकणे, विनोद पितळे, रामेश्वर तायडे आदींनी परिश्रम घेतले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.