
Kolhapur News : महापुराला कारणीभूत असलेल्या नदीपात्रातील गाळ उपसण्याचे धोरण शासनाने दीड वर्षापूर्वी राबवले; परंतु तांत्रिक मुद्द्यांच्या नागमोडी वळणातून मार्गक्रमण करणारे हे धोरण अद्याप ‘गाळात’च अडकले आहे.
यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीला कधी मुहूर्त मिळणार, अशी विचारणा जनतेतून होत आहे. परिणामी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी या तीन नद्यांचे पात्र अजून गाळाने भरलेलेच आहे.
गाळ काढण्याच्या धोरणांतर्गत अनेक तज्ज्ञ पथकांकडून नद्यांची पाहणी केली. आता नदीतील गाळाचे परिमाण मोजण्यासाठी सर्व्हे सुरू झाला आहे. नदीपात्राचा टॉप, पाण्याखालील गाळ व उतार ठरवण्याचे काम एका खासगी संस्थेच्या पथकाकडे दिले आहे.
त्याचा डाटा संकलीत करून तो प्रस्ताव समितीकडे पाठवतील. गाळाची मोजणी क्युबिक मीटरमध्ये होणार असून गाळ, वाळूचे परिमाण किती आहे, तसेच त्याचा उतार घेऊन त्याच्या मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवावा लागतो. दरम्यान, या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कार्यवाही सुरू होईल.
गाळ उपशाची का आहे गरज?
चार दिवसांच्या मुसळधार पावसानेही नद्यांना महापूर येत आहे. परिणामी नद्यांवरील बंधारे, पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक कोंडी तर होतेच, शिवाय नदीकाठावरील घराघरासह शेतीपिकात पुराचे पाणी शिरून मोठे नुकसान होते. नदीपात्र गाळाने सपाट झाले आहेत. पाण्यातून चालत दुसऱ्या तिरावर जाता येईल इतका गाळ पात्रात भरला आहे.
लाल, निळी पूररेषा
२०१९ मधील महापुरानंतर पाटबंधारे विभागातर्फे प्रत्येक शहर आणि मोठ्या गावालगत पूररेषा निश्चित केली आहे. त्याच अंतरातील गाळ पहिल्या टप्प्यात काढण्याचे धोरण आहे. हिरण्यकेशीची पूररेषा गिजवणे बंधारा ते गडहिंग्लजच्या नदीघाटापर्यंत निश्चित केली आहे. यामुळे या तीन किलोमीटर अंतरातीलच गाळ निघणार आहे. घटप्रभा व ताम्रपणी नदी पात्रातील गाळ उपसाची कार्यवाहीसुद्धा तशीच आहे. वास्तविक, नदीपात्रातील सरसकट गाळ काढणे गरजेचे आहे.
गाळ साठ्याची जागा निश्चित
नदीतील गाळ डंपिंग करण्यासाठी महसूल विभागाने जागेची निश्चिती केली आहे. त्यात गायरान जमिनींचा समावेश आहे. हा प्रस्ताव तहसील कार्यालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवला आहे. गाळ काढण्याची कार्यवाही पाटबंधारेचा यांत्रिकी विभाग किंवा एनजीओमार्फत करण्यात येणार असून सर्व तांत्रिक कामे पूर्ण केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचा प्रयत्न असल्याचे पाटबंधारेचे उपअभियंता अविनाश फडतारे यांनी सांगितले.
गाळमुक्त धोरण जाहीर केल्यानंतरचा यंदाचा दुसरा पावसाळा
दीड वर्षापासून धोरणाच्या अंमलबजावणीचा कीस पाडला जातोय
पर्यावरणाच्या अनुषंगाने पाहणी पूर्ण, अहवाल सादर
बारमाही वाहत्या पाण्यामुळे गाळाचे परिमाण काढण्यात अडचणी
यंदाच्या पावसाळ्यापूर्वी गाळ निघेल की नाही याबाबत संभ्रम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.