Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

Collector Dilip Swamy : शेतकऱ्यांना पीकविमा साक्षर केले पाहिजे, तसेच वेळेत पीककर्ज उपलब्धता करण्यासाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहीम राबवावी.
Collector Dilip Swamy
Collector Dilip SwamyAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : खरिपाच्या पेरण्या सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना पीककर्ज, बियाणे व खतांचा पुरवठा झाला पाहिजे या पद्धतीने सर्व नियोजन करावे. शेतकऱ्यांना पीकविमा साक्षर केले पाहिजे, तसेच वेळेत पीककर्ज उपलब्धता करण्यासाठी ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ मोहीम राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.

जिल्हा नियोजन सभागृहात खरीप हंगाम २०२४ पूर्व आढावा बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी भोकरे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक मंगेश केदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसेच अन्य विभागप्रमुख, विमा कंपनी प्रतिनिधी, खते- बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

Collector Dilip Swamy
Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

जिल्ह्यात ६ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीसाठी नियोजन शनिवारी (ता. २७) सादर करण्यात आले. त्यात सर्वाधिक ३ लाख ९५ हजार ५५ हेक्टरवर कपाशी, १ लाख ७२ हजार १५३ हेक्टरवर मका या पिकांचे नियोजन करण्यात आले. बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या उपलब्धताही पुरेशी असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले. प्रास्ताविक व सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले. कृषी अधिकारी साहेबराव जेधे यांनी आभार प्रदर्शन, तर संजीव साठे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

२ लाख ८८ हजार टन खतांचे आवंटन उपलब्ध

यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ३ लाख २० हजार २६३ टन खतांची मागणीवरून २ लाख ८८ हजार ७०० टन खतांचे आवंटन मंजूर आहे. गतवर्षीचा शिल्लक साठा १ लाख २ हजार ५२१ टन इतका आहे.

गुणनियंत्रणासाठी सज्ज

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा व्हावा यासाठी जिल्ह्यात १० भरारी पथके तयार करण्यात आले आहेत. ३० गुणनियंत्रण निरीक्षक नियुक्त आहेत. जिल्ह्यात बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा विक्रेत्यांची संख्या ६५५७ इतकी आहे. यांच्याद्वारे शेतकऱ्यांना खात्रीशीर बियाणे निविष्ठांचा पुरवठा केला जाईल, असे सांगण्यात आले.

Collector Dilip Swamy
Pre-Kharif Review Meeting : खरीप हंगामात राबवणार ‘कृषी वसंत’ अभियान

घरचेच सोयाबीन बियाणे वापरण्याचा सल्ला

कापूस आणि सोयबीन पिकासाठी बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यात कापूस पिकाच्या नियोजित क्षेत्रावर पेरणीसाठी बियाण्यांची २० लाख ८४ हजार पाकिटे लागणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना घरचे बियाणे तयार करण्याचे आवाहन करण्यात आले असून, त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी २५ हजार ५३९ क्विंटल बियाणे तयार ठेवले आहे. अशी माहिती देण्यात आली. यासोबतच पीककर्ज वाटप, पीकविमा बाबतचे नियोजनही सादर करण्यात आले.

आपत्कालीन नियोजनाची आवश्यकता

एकंदर हवामानाचे बदलते स्वरूप पाहता एक आपत्कालीन नियोजनही तयार केले पाहिजे. पावसाने अधिक ओढ दिली तर काय करायचे, किंवा पावसाचे दिवस कमी होऊन जादा पाऊस झाला तरी काय करावे, हे नियोजन तयार करायला हवे, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.

३९ हजार २६४ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता

जिल्ह्यात प्रस्तावित पेरणी क्षेत्रापैकी सर्वाधिक ३ लाख ९५ हजार ५५ हेक्टर कपाशी, १ लाख ७२ हजार १५३ हेक्टर मका, ३७ हजार ९८५ हेक्टर तूर, १८ हजार ४५७ हेक्टर बाजरी यासोबतच संकरित ज्वारी, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ या पिकांच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पिकांच्या लागवडीसाठी ३९ हजार २६४ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com