Jalgaon Electricity News : खानदेशात रविवारी (ता. ४) जोरदार वादळी पाऊस झाला. यामुळे गावोगावी किंवा शिवारांमध्ये विजेचे खांब कोसळले आहेत. त्यांची दुरुस्ती न झाल्याने शिवारात वीजपुरवठा बंदच आहे. यामुळे कापूस, केळी व इतर भाजीपाला पिकांची स्थिती बिकट बनत असून, शेतकरी पिके कशी जगवतील, असा प्रश्न आहे.
नंदुरबार, जळगाव, धुळ्यात वादळी पाऊस झाला. त्यात वृक्ष उन्मळले. विजेचे खांब पडले. नुकसान झाले, पण कोणी लोकप्रतिनिधीने प्रशासनासोबत बैठक घेतलेली नाही.
प्रशासन मस्तवाल आहे. पंचनामे तत्काळ सुरू करण्याची गरज आहे. पण पंचनामेही बंदच आहेत.
नंदुरबारात, शहादा, नवापूर, अक्कलकुवा, तळोदा, जळगावात जळगाव, धरणगाव, भडगाव, यावल, चोपडा, धुळ्यात शिरपूर, साक्री, धुळे तालुक्यांत शेकडो विजेचे खांब शिवारात कोसळले आहेत. मुख्य वीजवाहिन्याही बंद आहेत. पण दुरुस्ती सोमवारी (ता. ५) झाली नाही.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अनेक गाव-पाड्यांमध्ये वीज बंदच आहे. नागरिकांची घरे, शेतीशिवारात मोठे नुकसान झाले. मात्र विजेअभावी ग्रामस्थांची पाण्यासाठी शोधाशोध होत आहे, तर शेतकऱ्यांची देखील पीक वाचविण्यासाठी धडपड सुरू आहे.
एकंदरीत वादळी वाऱ्यांमुळे सर्वांनाच मोठा फटका बसला आहे. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, कानळदा, आव्हाणे, खेडी खुर्द, पिलखेडा आदी भागांत सोमवारीदेखील शिवारातील वीज बंदच होती. शेतकरी शेतात विजेची प्रतीक्षा करीत होते.
वीज कंपनीकडून मात्र उडवाउडवीची माहिती दिली जात होती. तळोदा शहरासह तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, चिनोदा, रोझवा पुनर्वसन, गढीकोठडा, लक्कडकोट, आंबागव्हाण, केलवापानी, राणीपूर, ढेकाठी, धनपूर, सावरपाडा आदी परिसरांत आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यात असंख्य नागरिकांची घरे, शेतीशिवारात मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर वाऱ्यांमुळे वीजखांबही मोठ्या प्रमाणावर उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून काही दिवस लागण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणावर पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे.
नागरिक स्थानिक परिसरातील हातपंप, विहिरी येथून पाणी आणत असून, पाणीसाठा करून ठेवण्यात येत आहे.काही शेतकऱ्यांकडून आपली पिके वाचविण्यासाठी टँकरचा उपयोग केला जात आहे.
काही शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच बागायती कापसाची लागवड केली होती, त्यामुळे ते कोवळे पीक वाचविण्यासाठी त्यांच्याकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून, कापूस पिकाला चुहा देण्यात येत आहे. परिसरातील रोपवाटिकांमध्येही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, वारावादळामुळे शेडनेट अस्ताव्यस्त झाले आहे. त्यातील रोपही सैरभर झाल्याचे चित्र आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.