
Nashik Rain News : मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यातील उत्तर भागाला सोमवार (ता.२९) चांगलेच झोडपून काढले. सुमारे एक तास वादळी वारा व विजांचा कडकडाट करत गारांचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
काढलेला उन्हाळ कांदा ओला झाला आहे. मिरची टोमॅटो लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पावसाचा मोठा फटका बसला.
वादळी वाऱ्यासह पावसाला सुरवात होताच नेहमीप्रमाणे वीजपुरवठा खंडित झाला होता. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसोबत शेतकऱ्यांचीही एकच तारांबळ उडाली. पावसामुळे नुकताच काढून ठेवलेला कांदा भिजला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दाट लग्नतिथी असल्याने दुपारनंतर लग्नविधी सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने वऱ्हाडी मंडळींची चांगलीच धावपळ झाल्याचे पहायला मिळाले. दुपारी ३ वाजेच्या सुमारास मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटात करत पावसाला सुरुवात झाली.
सुरुवातीला पावसाच्या हलक्या सरी पडल्या; मात्र त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि जोरदार पावसाने गारांसह एक तास झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकाची तारांबळ उडाली. अगोदरच कांद्याला भाव नाही.
त्यात कांदा भिजल्याने खराब झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील विखरणी येथील बापूसाहेब विठ्ठलराव शेलार यांनी एक एकर कारले लागवड केली होती. ऐन काढणीच्या अवस्थेत वादळ व पावसाने बाग भुईसपाट झाली आहे.
पाच महिने जिवापाड जपलेले पीक ऐन काढणीच्या काळातच नष्ट झाल्याने शेलार यांचे सुमारे २ लाखाचे नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
तांदूळवाडी परिसरात गारपीट
येवला तालुक्याच्या उत्तर भागात सोमवारी (ता.२९) दुपारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. अनकाई, अनकुटे, धनकवाडी, तांदूळवाडी, आहेरवाडी आदी परिसरात मान्सूनपूर्व वळवाच्या पावसाने हजेरी लावली. तांदूळवाडी फाटा, अनकुटे येथे गारांचा पाऊस झाला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.