Political Journey: एका कारखान्याचे संचालक ते सहा वेळा उपमुख्यमंत्री असा पल्ला गाठलेला, वेगळ्या धाटणीचे राजकारण करताना ग्रामीण भागाची नसन् नस ओळखणारा नेता म्हणून अजित पवार महाराष्ट्राला परिचित होते. त्याही पलीकडे स्पष्ट बोलणारा खमक्या नेता अशी त्यांची ओळख होती आणि त्यासाठी त्यांना अनेकदा किंमतही मोजावी लागली. जे काम होणार त्यासाठी पूर्ण प्रयत्न आणि जे होणार नाही त्याला स्पष्ट नकार असा त्यांच्या कामाचा खाक्या होता. स्फटिकासारखा स्वभाव असलेले दादा खासगीत खुलत असत. काटेकोरपणा, वक्तशीरपणा, टापटीप आणि स्वच्छतेसाठी प्रचंड आग्रही असलेल्या अजितदादांच्या अकाली जाण्याने मंत्रालयातील अनेकांचे डोळे पाणावले..सलग आठ वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा आणि सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी अनाोखा विक्रम केला होता. विधिमंडळात त्यांनी ११ अर्थसंकल्प सादर केले. शेषराव वानखेडे यांनी १३ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला होता. हा विक्रम मी मोडणार असे ते अनेकदा सांगत. राज्याचे मुख्यमंत्रिपद हुलकावणी देत असले, तरी त्या तोडीचा असलेला हा नेता प्रचंड स्पष्टवक्ता होता. या स्वभावामुळे अनेकदा ते अडचणीत आले. ते पट्टीचे वक्ते नव्हते..पण त्यांच्या स्वभावातला मोकळेपणा आणि स्पष्टवक्तेपणा लोकांना भावत असे. ते संवादी होते. कार्यकर्त्यांना त्यांच्या या स्वभावाची जाण असल्यानेच दादा रागावले, चिडले तरी त्यांना काही वाटत नव्हते. शब्दाचा पक्का अशी ओळख तयार करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. ज्यांना जे आश्वासन दिले ते पूर्ण केले. भीडभाड न ठेवता सभागृह, सभा, बैठका कुठेही ते बोलत असत. त्यांना एखादा विषय समजावून सांगितला की ते मन लावून ऐकत. अधिकाऱ्यांना फोन केला, तर पदाचा दबाव त्यांच्यावर येणार नाही अशा भाषेत संवाद साधत. त्यातून माहिती जमा करणे आणि त्याचा वापर करणे ही हातोटी त्यांनी अंगी बाणवली होती..Ajit Pawar Passes Away: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विमान अपघातात निधन .वक्तशीर, टापटीपबैठका असो की अधिवेशन, अजित पवार नेहमी वेळेत, टापटीप असत. आवाजातील जरब आणि प्रशासनावर हुकूमत त्यांनी कष्टातून मिळविली होते. पहाटे उठून काम करण्याची त्यांची पद्धत सर्वपरिचित होती. नागपूर येथे पत्रकारांच्या निवासाची जेथे सोय असते, तेथे सर्व नेते गप्पांसाठी सकाळी ८ वाजता येतात. एरवी नेते आगावू माहिती देऊन येतात. पण अजित पवार पाच किंवा २ मिनिटे आधी यायचे. एरवी कडक शिस्तीचे वाटणारे पवार दिलखुलास बोलत. जे आहे ते सांगून टाकत. आडपडदा न ठेवता, तमा न बाळगता बोलत. एखादे काम सार्वजनिक हिताचे असेल तर लगेच फोन करून मार्गी लावायचे, असा त्यांच्या कामाचा झपाटा होता. त्यांच्या याच कार्यशैलीवर कार्यकर्ते फिदा होते. अजित पवार यांची बैठक म्हटले, की अधिकारी अतिशय अलर्ट असत. कोणती माहिती कधी मागवतील याचा नेम नसे. या बैठकीत केवळ माहितीच नव्हे, तर कपड्यांपासून ते फायलीतील कागदही नीटनेटके असण्याची दक्षता अधिकारी घेत. प्रशासन वरचढ होण्याच्या काळामध्ये अजित पवार यांची प्रशासनावरील ही पकड अखेरपर्यंत ढिली झाली नाही..कोविड काळात केले नेतृत्वकोविड काळात अजित पवार यांनी धोका पत्करून काम केले. भल्या पहाटे मंत्रालयात येत आणि काम सुरू करत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत त्यांनी मंत्रालय सोडले नाही. आर्थिक शिस्त आणि मेहनतीमुळे त्यांनी आपल्या राज्याची घडी नीट ठेवली. कोविड काळात राजकोशीय तूट तीन टक्क्यांहून कमी ठेवल्याबद्दल कॅगच्या अहवालात अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक करण्यात आले. अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून केलेल्या कामाची पावती त्यातून मिळाली होती. पवार यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नेतृत्व केले होते..Ajit Pawar Passes Away: अजित पवारांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही; शेतकरी नेत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली.सरकारला आरसा दाखविणारे नेतृत्वअजित पवार यांनी २०१९ मध्ये पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेत संपूर्ण महाराष्ट्राला धक्का दिला होता. त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचे बंड मोडून काढत घरी परत येण्यास भाग पाडले. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. पुन्हा सरकार गेल्यानंतर २०२२ मध्ये भर दुपारी शपथ घेत पुन्हा धक्का दिला होता. पवार यांच्याकडे दीर्घकाळ अर्थमंत्रिपद असल्याने त्यांना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची पक्की जाण होती. डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगितले होते. त्याच दिवशी एका प्रश्नावरील चर्चेदरम्यान आमची तिजोरी काही ओसंडून वाहत नाही, असे दादांनी स्पष्टपणे आमदारांना सांगितले होते. एका बाजूला धार्मिक राजकारण जोरात सुरू असताना आम्ही शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार आहोत. यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेली पायवाट आमच्यासाठी आदर्श आहे, असे अजित पवार वारंवार सांगत होते..सोबत घेणारा नेतामहाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री होते. सर्वांत तरुण मंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांना अजित पवार यांनी प्रशासनातील अनेक धडे दिले. महत्त्वाच्या बैठकांना त्यांच्या खात्याचा विषय नसतानाही ठाकरे यांना ते बोलावून घेत. केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर अधिकारी कर्मचारी आणि सर्व क्षेत्रांतील व्यक्तींना मदत करणे हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग होता. त्यांचे जनसंपर्क अधिकारी संजय देशमुख यांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या घरी जात त्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. राज्याच्या कानाकोपऱ्यात असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांप्रतीही त्यांची अशीच भावना असल्यामुळे आपलेपणातून ते संपूर्ण राज्याचे ‘दादा’ झाले होते. राजकारणातल्या अनेक अपरिहार्यता त्यांना माहीत होत्या. त्या कधी त्यांनी नाकारल्या नाहीत किंवा त्यांनी सोंग घेऊन लपविल्या नाहीत किंवा मुलामा देऊन त्यांचे उदात्तीकरण केले नाही. आम्ही राजकारणात आहोत, साधुसंत नाही, असे ते स्पष्टपणे पत्रकारांना सांगून टाकत..दादा गेले....!जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य चार जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. माझे सर्व कार्यक्रम मी रद्द केले आहेत.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.माझा मोठा भाऊ गेल्याची भावनाअजितदादांच्या अपघाती निधनाची बातमी अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठे होते. त्यांच्या निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची भावना माझ्या मनात आहे. महाराष्ट्रासाठी आजचा काळा दिवस असून एक दूरदर्शी, स्पष्टवक्ता आणि अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे. महायुती सरकारमधले ते केवळ माझे सहकारी नव्हते तर माझे चांगले मित्रही होते. त्यांचे अकाली जाणे जिवाला चटका लावणारे आहे. त्यांच्याकडे ‘वेळ’ साधण्याचा अप्रतिम गुण होता. त्यांच्या कामाचा झपाटा आणि निर्णयक्षमता आम्ही सगळ्यांनी अनुभवली आहे. मी केवळ सहकारी म्हणूनच नाही तरी मित्र म्हणून सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंना जवळून पाहिले आहे. अजितदादांच्या स्पष्ट आणि नर्म विनोदी, मार्मिक कोपरखळ्यांची वैशिष्ट्येसुद्धा सगळ्यांना आवडत. प्रारंभीपासून राज्याची आर्थिक घडी चांगली बसावी यासाठी राज्याचा वित्तमंत्री म्हणून अजितदादांनी विकासकामांना खीळ बसू न देता अतिशय हातोटीने निर्णय घेतले. राज्यातील अनेक पायाभूत विकास प्रकल्पांना चालना देण्यासाठी मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा इतर काही योजना असो, उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री म्हणून अजितदादा यांनी वेळोवेळी पाठबळच दिले.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.