Unseasonal rain : राज्याला चांदा ते बांदा अवकाळीने झोडपले; शेतकरी हवालदील

Unseasonal rain In State : मागील दोन आठवड्यांपासून राज्यात अवकाळी आणि वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी हैराण झाला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Unseasonal Rain
Unseasonal Rain Agrowon

Pune News : राज्यात वाढत्या उष्णतेसोबतच अवकाळी पावसाने मागील दोन आठवड्यांपासून हजेरी लावली आहे. यामुळे चांदा ते बांद्यापर्यंत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अवकाळीमुळे अनेक जिल्ह्यात हाताला आलेले पीक जाण्याची भीती असल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. शनिवारी (ता.२०) सोलापूर, पुणे, धाराशीव, लातूर, रत्नागिरी, कणकवलीसह इतर जिल्ह्यात अवकाळीचा तडाखा बसला. यामुळे ज्वारी, हळद, द्राक्ष, आंब्यासह भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

कोकणातील जिल्ह्यांना अवकाळीने झोडपले

कोकणासह संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानवाढ होत आहे. एकीकडे उष्णतेची लाट असतानाच दुसरीकडे अवकाळीने विविध जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. कोकणातील रायगड, सिंधुदूर्ग, रत्नागिरी आणि कणकवली जिल्ह्यात अवकाळीने हजेरी लावली. रायगडमधील महाड, वरंध घाट, बिरवाडी परिसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपल्याने येथे आंबा, भुईमूग, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. सिंधुदूर्गमधील मालपे आणि पोंभुर्लेसह इतर ठिकाणी झालेल्या पावसामुळे आंबा पिकाचे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा, काजू बागांवर संकट

सोलापूरात फळबागांचे नुकसान

सोलापूर जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दोन गावांची वाहतूक बंद झाली. बसलेगाव ते गरोळगी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने येथील रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. तसेच विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने येथे केळी, पपई, टोमॅटो, आंबा, द्राक्ष, खरबूज व कलिंगड खरबूज, फळबागांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील कर्जाळ, सलगर जेऊर, मैंदर्गी, शेगाव, आळगे, करजगी, वागदरी, चपळगाव या गावांना अवकाळीने झोडपून काढले.

तुळजाभवानी मंदिरात पाणीच पाणी

उमरगा, लोहारा तालुक्यात पावसाने शेतकऱ्यांनी काढून ठेवलेल्या ज्वारीसह आंबा, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. तर धो-धो पावसामुळे तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील याचा फटका बसला.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत ‘अवकाळी’ पावसाचा वादळी जोर कायम

धारशिव जिल्ह्यात पशुधन दगावले

राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत असतानाच ऐन उन्हाळ्यात धारशिव जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या. अवकाळीने हजेरी लावल्याने गर्मीने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र पावसामुळे आंबा, द्राक्ष फळबागांसह काढून ठेवलेल्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे तलमोड, तुरोरी, तुगावसह मुरुम येथे वीज पडल्याने तीन पशुधन आणि शेळ्या दगावल्या. तसेच वीज पडून एक व्यक्ती जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी झालेल्या नुकसानिची पाहणी केली. तसेच नुकसानीचे पंचनामे लवकर करण्यात यावेत, अशा सुचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात अवकाळीचे थैमान

लातूर जिल्ह्यातही अवकाळीने थैमान घातला. येथे गाराचा पाऊस पडल्याने काढणीस आलेल ज्वारी पिक भूईसपाट झाले आहे. यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. येथील कोपेगाव आणि गंगापूर भागात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुणेकरांना दिलासा

उन्हाच्या तडाक्याने हैराण झालेल्या पुणेकरांना शनिवारी अवकाळी पावसाने दिलासा दिला. जिल्ह्याच्या बहुतांश भागात विजांच्या गडगडाटासह अवकाळीने हजेरी लावली. यामुळे आंबा, काजू बागांवर नुकसानीचे संकट अधिक गडद झाले असून अवकाळीने आयुक्तलयासमोर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

हवामानशास्त्र विभागाचा इशारा

दरम्यान हवामानशास्त्र विभागाने राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. अवकाळी पावसामुळे नागरिकांना गरमी पासून जरी दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकींच्या रणधुमाळीत नेते आणि प्रशासान अडकून असल्याने नुकसान भरपाई कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com