
Parbhani News: खरीप हंगाम २०२४ मधील पीक विम्याचे ५०० कोटी रुपये तत्काळ अदा करा, पीकविमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा, आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, आदी मागण्यांचे फलक हातात घेऊन जोरदार घोषणा देत मंगळवारी (ता. १८) परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘शेतकरी हक्क’ मोर्चा काढला.
सातत्याने पाठपुरावा करूनही विमाभरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्यामुळे विमा कंपनी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचे नाराज असलेले विविध तालुक्यांतील शेतकरी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतीमाल लिलाव निवाऱ्यांमध्ये मंगळवारी मोठ्या संख्येने एकत्र आले.
तेथून पीकविमा आमच्या हक्काचा, नाही कोणाच्या बापाचा आदी मागण्यांचे फलक हातात घेतलेल्या शेतकऱ्यांचा मोर्चा नवा मोंढा, गव्हाणे रोड, नारायण चाळ कॉर्नर, स्टेशन रोड मार्गे जोरदार घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मैदानावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
डॉ. सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे आदींची भाषणे झाली. पीकविमा भरपाई देण्यास जाणीवपूर्वक विलंब करून कायदेभंग केल्याबद्दल आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करावेत, कंपनीला काळ्या यादीत टाकावे, कपाशी, सोयाबीन, तूर पिकांचा मंजूर २५ टक्के अग्रिम पीकविमा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान, पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळून ५०० कोटी रुपयांवर अधिक विमा परतावा शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करावा.
प्रभारीऐवजी पूर्णवेळ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी. हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नव्याने ऑनलाइन शेतकरी नोंदणी सुरू करून खरेदीस मुदतवाढ देण्यात यावी. पीकविमा योजनेत सुधारणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घेण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.