
Amaravati News : नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास लागू करण्यात आलेल्या विमा संरक्षण योजनेत अमरावती जिल्ह्यात विमा कंपनीला २७८ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या हिस्स्यावर ६१ कोटी आलेत. यामध्ये नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात झालेल्या नुकसानाची विमा परतावा शेतकऱ्यांना मिळाला आहे. यंदा विमा पद्धत बदलण्यात आली असून शेतकऱ्यांना विम्याचा पूर्ण प्रीमियम भरावा लागणार आहे.
खरीप हंगाम २०२४ मधील पीकविम्याची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास प्रारंभ झाला आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ६१.१३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ५०.६१ कोटी रुपये आणि १०.५२ कोटी रुपये काढणीपश्चात नुकसानीचे आहेत.
या हंगामात जिल्ह्यातून ९७ महसूल मंडळांतील २ लाख ६७ हजार ९९ शेतकऱ्यांनी ४ लाख ७६ हजार ७४८ अर्ज पीकविमा योजनेत दाखल केले. ४ लाख ९ हजार ८५१ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले होते. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४.७६ कोटी रुपये प्रीमियम भरला. शेतकऱ्यांना एक रुपया इतकाच प्रीमियम होता, तर राज्य सरकारने १९७.७० कोटी व केंद्राने १४१.७९ कोटींचा हिस्सा दिला.
खरीप हंगाम २०२४ साठी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात झालेल्या नुकसानाचीच भरपाई मंजूर झाली आहे. सर्वांत कमी भरपाई पीक काढणीपश्चात झालेल्या नुकसानाची आहे. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या १ लाख ७० हजार ३५१ सूचना विमा कंपनीकडे आल्यात.
त्यातील २५ हजार ९ अपात्र ठरविण्यात आल्या, तर काढणीपश्चात नुकसानीच्या १३ हजार ६८५ सूचना होत्या. त्यापैकी ९ हजार ३०६ अपात्र ठरविण्यात आल्या. दोन्ही ट्रिगरमधील ३४ हजार ३१५ सूचना नुकसानभरपाईसाठी अपात्र ठरविण्यात आल्या आहेत.
खरीप २०२५ पासून पीकविम्यातून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारितच भरपाई मिळणार आहे. नैसर्गिक आपत्तींसह पेरणीपूर्व, काढणीपश्चात, प्रतिकूल हवामान, उत्पादन आधारित हे ट्रीगर वगळण्यात येणार आहेत. याशिवाय एक रुपयांऐवजी पूर्ण प्रीमियम भरावा लागणार आहे.
खरीप २०२४ मधील पीकविमा योजनेची स्थिती
एकूण सहभागी शेतकरी ः २,६७,०९९
विमा अर्ज दाखल ः४,७६,७४८
संरक्षित क्षेत्र ः ४,०९,८५१
शेतकरी हिस्सा ः ४.७६ कोटी
राज्य सरकारचा हिस्सा ः १९७.७० कोटी
केंद्र सरकारचा हिस्सा ः १४१.७९ कोटी
एकूण ः ३३९.५५ कोटी
भरपाई
एकूण दावे दाखल ः
१) नैसर्गिक आपत्ती ः १,७०,३५१ - भरपाई ः १,४५,३४२
२) काढणीपश्चात ः १३,६८३ - भरपाई ः ४३७७
३) नुकसानीचा परतावा ः नैसर्गिक आपत्ती ः ५०.६१ कोटी रुपये
४)काढणीपश्चात ः १०.५२ कोटी रुपये
कंपनीला लाभ ः २७८.४२ कोटी रुपये
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.