Crop Damage: अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांत जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नाशिक : जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी तालुक्यांत पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. सुरगाणा तालुक्यात सर्वाधिक अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) झाली; मात्र आता पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. तर गुरुवारी (ता. १४) पेठ तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.

इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांत जोरदार पाऊस (Heavy Rain) बरसला. पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे; मात्र बाऱ्हे, मनखेड व सुरगाणा मंडळात जोरदार पाऊस झाला.

उंबरठाणा परिसरात गेल्या पाच दिवसांनंतर काहीसा जोर कमी झाला आहे. इगतपुरी तालुक्यात इगतपुरी महसूल मंडळात सर्वाधिक १६५ मिमी पावसाची नोंद झाली. उत्तरेला कसमादे भागातील कळवण तालुक्यात पावसाने काहीशी उसंत दिली आहे.

दिंडोरी तालुक्यातील ननाशी महसूल मंडळात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टीची (Extremely Heavy Rain) नोंद झाली. जिल्ह्याच्या पश्चिम भागाला पावसाने झोडपले. असे असताना पूर्व भागातील अनेक शेतकरी अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

सततच्या पावसामुळे पेठ, सुरगाणा, दिंडोरी, कळवण तालुक्यांत शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक ठिकाणी ओढे, नाले व नदीमधून वाहून आलेले पूरपाणी शिवारात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर शेतातील सुपीक माती वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी कळविले.

आदिवासी भागात भात, नागली व वरई पिकांचे नुकसान वाढले. तर शेताचे बांध फुटल्याने दाणादाण उडाली. जिल्ह्यात ९ ते १२ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमध्ये १ हजार २४० हेक्टर ६० आर क्षेत्रावरील पिकांची दाणादाण उडाली.

त्यामध्ये सोयाबीन, मका, भात, भुईमूग, भाजीपाला आणि उसाचा समावेश आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक नुकसान कळवण आणि त्याखालोखाल निफाड तालुक्यातील पिकांचे झाले. तर दिंडोरी देवळा व सटाणा तालुक्यांत तुलनेत कमी नुकसान झाले.

१४ धरणांतून विसर्ग सुरू

पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) संततधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दारणा धरण समूहातील भावली धरण १०० टक्के भरले. तर आतापर्यंत जिल्ह्यांतील एकूण ६ धरणे तुडुंब भरली आहेत. गंगापूर, गौतमी, गोदावरी, पालखेड, करंजवण, वाघाड, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, दारणा, भावली, कडवा, चणकापूर, हरणबारी व केळझर या धरणांतून विसर्ग सुरू आहे. तर नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरीत पुढे ३२ हजार ८२२ क्युसेक विसर्ग सुरू होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com