Chhatrapati Sambhajinagar News : अवेळी आलेल्या पावसामुळे मराठवाड्यातील मोसंबी बागांना दिला जाणारा ताण मध्येच तुटला. एवढेच नाही तर अनेक बागांमध्ये ‘सिट्रस ग्रीनिंग’चा प्रादुर्भाव वाढला आहे.
तज्ज्ञ सल्ला देत असले, तरी ताणाचे बिघडलेले ताळतंत्र, सिट्रस ग्रीनिंगचे संकट अपेक्षित आंबिया बहराने न फुटलेल्या बागा व पुढे पाण्याविना बाग वाचविण्याचे संकट पाहता मोसंबीवरील संकटांचे ढग आताच गडद होऊ लागले आहेत.
मराठवाड्यात मोसंबीचे उत्पादनक्षम क्षेत्र किती हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे चार वर्षांत मोसंबी बागायतदारांना अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे ते हैराण झाले आहेत. कायम असलेली फळगळीची समस्या व शंखी गोगलगायीने केलेल्या आक्रमणामुळे उत्पादकांनी अपेक्षित पक्व होण्याआधीच काढल्याचा अलीकडचा अनुभव आहे.
आता पुन्हा दुष्काळाचे संकट दारात असल्याने मोसंबी संकटात सापडण्याची चिन्ह आहेत. मोठ्या मुश्किलीने ३० ते ४० टक्के बागायतदारांना पाण्याचा मोठा ताण सहन करावा लागणार नाही. परंतु ५० ते ६० टक्के बागायतदारांना बागांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी नुकत्याच काही बागांमध्ये केलेल्या पाहणीत सिट्रस ग्रीनिंगचा प्रादुर्भाव बहुतांश बागात दिसून आला. त्यांच्या माहितीनुसार, हा रोग जिवाणूमुळे होतो. झाडाची पाने शिराच्या बाजूने पिवळी पडतात. मातृवृक्षाच्या कलमकाडी व सीट्रस सायला किडीमुळे फळबागेत प्रसारित होतो.
याशिवाय अनेक बागांमध्ये सूक्ष्म मूलद्रव्याची कमतरता मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून आली. झाडाची पाने पिवळी पडून पानावर तपकिरी डाग पडत आहे. जादा पाण्यामुळे मुळाजवळ वाफसा न राहता अन्नद्रव्याचे वहन थांबल्याचे दिसले.
एकच बहर अपेक्षित असताना काही ठिकाणी एकापेक्षा दोन बहर दिसले. जास्त पाऊस झाल्यामुळे नवीन फुटीवर बागा जात असून, रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे डॉ. पाटील म्हणाले.
उत्पादनापेक्षा फळबागा वाचविणे महत्त्वाचे...
मराठवाड्यातील मोसंबी पट्ट्यात यंदा संपूर्ण पावसाळ्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने मोसंबी फळांचा आंबिया बहर घेण्यापेक्षा बागा वाचविण्यावर भर देणे आवश्यक असल्याचे मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी स्पष्ट केले.
कृषी विभाग अन् मोसंबी संशोधन केंद्रातर्फे गुरुवारी (ता. २१) लाडसावंगी येथे प्रक्षेत्र भेटीदरम्यान डॉ. पाटील म्हणाले, की यंदा मराठवाड्यात दुष्काळाची झळ अधिक तीव्र राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फळपिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही, झाडे जिवंत ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
बहर घेतल्यास पाणी जादा लागते. प्रकल्पातील पाणीसाठा पिण्यासाठी राखून ठेवल्यास फळबागांना पाणी देणे जिकिरीचे होणार आहे. त्यामुळे झाडाखाली सेंद्रिय आच्छादन, मटका सिंचन, हायड्रोजेल आदी बाबींचा वापर करून बागा जिवंत ठेवणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात बागांना पाण्याचा ताण बसला. मॉन्सूनोत्तर पावसामुळे ताण तुटून, बहुतांशी बागांमध्ये फुले येण्यास सुरुवात झाली.
पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शिफारशीत खतांचा डोस देऊन बहर पूर्ववत करणे फायदेशीर ठरेल, असेही डॉ. पाटील म्हणाले. या वेळी तालुका कृषी अधिकारी घनशाम गुळवे, कृषी अधिकारी रोहीदास राठोड, वि. का. स. सोसायटीचे अध्यक्ष विजय काळे, मोसंबी बागायतदार बंडूभाऊ पडूळ, जितेंद्र डेरे, कल्याण पडूळ, रामेश्वर बचाटे, बाबासाहेब पडूळ आदींची उपस्थिती होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.