
Mumbai News: ‘‘शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकास अशा अनेक क्षेत्रांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) ज्ञान असलेल्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन ‘मायक्रोसॉफ्ट’ आणि संबंधित शासकीय विभागांनी चर्चा करून कौशल्य विकास प्रशिक्षण अभ्यासक्रम तयार करावेत,’’ असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (ता. ५) बैठकीत दिले.
नोएडा येथील मायक्रोसॉफ्ट सेंटर ऑफ एक्सलन्स आणि तेलंगणातील हैदराबाद इथल्या गुगलच्या आयटी पार्कच्या धर्तीवर बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकारातून शहरात आयटी पार्क किंवा इनोव्हेशन सेंटर उभारण्याचा प्रयत्न असून त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीला कौशल्यविकास, उद्योजकता, रोजगार व नावीन्यात मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन विकास विभागाचे अपर मुख्य सचिव तथा विकास आयुक्त राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कौशल्यविकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनुटीया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या वेळी विद्या प्रतिष्ठानच्या बारामतीतील प्रस्तावित सेंटर ऑफ एक्सलन्स ऑफ आर्टिफिशिअल इंटलिजन्स केंद्रासोबत राज्यात मायक्रोसॉफ्टच्या माध्यमातून जागतिक दर्जाच्या प्रयोगशाळा उभारणे, बारामतीतील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता वापराचे प्रशिक्षण सुरू करणे, कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मायक्रोसॉफ्ट व शासनाच्या सहकार्यातून ज्ञान व माहितीचे आदान-प्रदान, एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आदींबाबत बैठकीत चर्चा झाली.
‘कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज’
या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘‘आयटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम असावेत. अभ्यासक्रम तयार करण्यासाठी उद्योग, तंत्रशिक्षण, कौशल्यविकास विभागांनी मार्गदर्शक, समन्वयकाची भूमिका बजावावी. शासनाचे सर्व विभाग, शेती, उद्योग, व्यापार, सहकार अशा अनेक क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवणे ही काळाची गरज बनली असून या क्षेत्रात राज्याला मदत करण्यासाठी पुढे येणाऱ्या मायक्रोसॉफ्टसह सर्वांचे स्वागत करण्यात येईल. शक्य ते संपूर्ण सहकार्य, मदत केली जाईल.’’
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.