Nagpur News : आंतरराष्ट्रीयस्तरावर कापसाच्या साठ्यात सातत्याने होणाऱ्या घटीच्या परिणामी मागणी वाढल्याने सध्या कापसाच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. शेतकऱ्यांनी देखील बाजारावर लक्ष ठेवत कापूस विक्रीचा निर्णय घ्यावा, असा सल्ला या क्षेत्रातील विपणन तज्ज्ञांनी दिला आहे. सध्या कापूसदर ७००० ते ७५०० रुपयांवर आहेत.
कापूस विपणन तज्ज्ञांच्या माहितीनुसार, देशभरात यंदा ३०० लाख गाठी (१५०० लाख क्विंटल कापूस) उत्पादकतेचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यापैकी ८० टक्के कापूस बाजारात आला आहे. याचे प्रमाण सुमारे १२०० लाख क्विंटल आहे. महाराष्ट्राचा विचार करता ८० लाखांपैकी ६० लाख गाठी कापसाची आवक प्रक्रिया उद्योजकांकडे झाली आहे.
कच्च्या कापसाचा विचार करता महाराष्ट्राची उत्पादकता ४०० लाख क्विंटल कापसाची असताना ३०० लाख क्विंटल कापूस बाजारात (Cotton Market) आला आहे. सध्या २० लाख गाठी म्हणजेच १०० लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे आहे. हा शिल्लक कापसाचा साठा असलेल्या शेतकऱ्यांना वाढीव दराचा फायदा मिळणार आहे.
आंतरराष्ट्रीयस्तरावर कापसाचा (Cotton) साठा सातत्याने कमी होत आहे. त्याच्याच परिणामी दरात तेजी आली आहे. गेल्या आठवड्यापूर्वी कापसाचे दर ६२०० ते ६५०० रुपयांवर होते. आता हे दर ७००० ते ७५०० रुपयांवर पोहोचले आहेत. अकोट (अकोला) बाजार समितीत ८००० रुपयांवर दर पोहोचल्याच्या काही पावत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.
त्यावरूनच दरात सातत्याने चढउतार होत असल्याची स्थिती असल्याने शेतकऱ्यांनी विक्रीबाबत निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यापुढील काळात आणखी तेजीची शक्यता नसल्याचे संकेत आहेत.
त्यामुळे ज्या काळात ८००० रुपयांपर्यंतचा दर मिळेल तेव्हा विक्रीचा निर्णय घेण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. अमरावती बाजार समितीअंतर्गत बुधवारी (ता. २८) कापसाची केवळ ८० क्विंटल आवक नोंदविण्यात आली. या वेळी कापसाला ७३०० ते ७४०० रुपयांवर दर मिळाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.