Cotton Market : जागतिक अस्थिरतेचा कापूस बाजाराला फटका

Cotton Export : रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे युरोपात इंधन व अन्नासंबंधी वाढलेली महागाई, अमेरिकेतील वाढते व्याजदर यामुळे कापडाचा बाजार संकटात आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Jalgaon News : रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे युरोपात इंधन व अन्नासंबंधी वाढलेली महागाई, अमेरिकेतील वाढते व्याजदर यामुळे कापडाचा बाजार संकटात आहे. परिणामी कापूस किंवा कापूसगाठींचा उठाव रोडावला आहे. देशातील कापूस निर्यातीलाही याचा मोठा फटका बसला असून, निर्यात कमालीची घटल्याची माहिती मिळाली.

भारत कापूस लागवडीत जगात क्रमांक एकचा देश आहे. परंतु निर्यातीत भारत अमेरिकेच्या मागेच राहीला. उत्पादकताही भारतात नैसर्गिक समस्या व गुलाबी बोंड अळीच्या संकटामुळे कमी होत आहे.

अशातच देशातील कापूस निर्यातही कमी झाली आहे. निर्यातीमधील घट देशातील कापूस बाजाराला अडचणीत आणणारी ठरली असून, त्यात मागील काही वर्षांत तब्बल ९० टक्के घट झाल्याची माहिती अभ्यासकांनी दिली.

महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशनचे सदस्य अविनाश काबरा यांच्यानुसार देशातून २०२१ मध्ये ३५ लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) निर्यात झाली. २०२२ मध्ये ही निर्यात २८ लाख गाठी झाली. २०२३ मध्ये १५ लाख २० हजार गाठींची निर्यात झाली आहे.

यंदाही निर्यात १५ लाख गाठींचा आकडा कसाबसा गाठेल, असे संकेत कापूस उद्योगातील विविध संघटना, संस्थांनी दिले आहेत. २०१० ते २० या दशकात देशातून कापसाची निर्यात सरासरी ४५ लाख गाठी राहिली आहे.

Cotton Market
Cotton Market: कापूस उत्पादनात घट, निर्यातीमुळे बाजाराला आधार

बांगलादेशकडून अल्प खरेदी
देशातील कापसाला सर्वांत मोठा खरेदीदार बांगलादेश राहीला आहे. एकटा बांगलादेश भारताकडून दरवर्षी २५ ते ३० लाख गाठींची खरेदी करायचा. बांगलादेशमधील कापड उद्योग पाकिस्तानच्या पुढे पोहोचला होता.

तेथील नारायणगंज भाग हा कापड उत्पादनासंबंधी जगभरात प्रसिद्ध आहे. कारण तेथे चीननेदेखील गुंतवणूक केली होती. तेथे दरवर्षी १२० ते १३० लाख गाठींचा वापर कापड निर्मितीसाठी केला जायचा. तसेच सुताचीदेखील मोठी आयात बांगलादेश करायचा. परंतु चीन व अमेरिकेचे संबंध खराब झाले.

अमेरिकेने चीनच्या कापडावर बंदी घातली. यानंतर बांगलादेशचा वस्त्रोद्योग काहीसा संथ झाला. परंतु बांगलादेशला गरीब देशाचा दर्जा असल्याने तेथून निर्यात व इतर बाबींसंबंधी सवलती आहेत. यामुळे अमेरिका व युरोपातील बाजारात बांगलादेशी कापडाची पाठवणूक सुरू होती.

कोविड काळातही बांगलादेशने वस्त्रोद्योगात चांगली कामगिरी केली. बांदलादेशला भारतातून रस्ते व समुद्रमार्गे कापूस आयात परवडणारी असल्याने तेथून कापसाला मोठी मागणी असायची. परंतु रशिदा व युक्रेनचे युद्ध सुरू झाल्याने युरोपातील ग्राहकांची क्रयशक्ती खालावली. तेथे इंधन, वीज महाग झाले. अन्नही परवडेनासे झाले.

त्यात अमेरिकेतील वाढते व्याजदर व काही महिन्यांपूर्वी आखाती देश व इस्त्राईलमधील ताणलेल्या संबंधांची भर पडली. परिणामी बागंलादेशसह इतर देशांमधील वस्त्रोद्योग संकटात सापडला.

स्थानिक मागणीवरच या देशांमधील वस्त्रोद्योगाला अवलंबून राहावे लागत असून, कापड गिरण्या, सूतगिरण्यांचे कामकाज कोलमडले आहे. परिणामी भारतातून परदेशातील कापसाची पाठवणूक कमी झाली आहे.

बांगलादेशसह चीन, पाकिस्तानच्या कापडाची मोठी बाजारपेठ युरोप, अमेरिकेत आहे. परंतु युरोप व अमेरिकेत वित्तीय स्थिती हवी तशी नसल्याने कापडाचा उठाव अत्यल्प आहे, असे सांगण्यात आले.

सरकी दरांत घसरण
सरकीदर २७५० ते २८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. सरकीदरात १५ दिवसांत २०० रुपयांची घट झाली आहे. खंडीच्या (एक खंडी ३५६ किलो रुई) दरात एक महिन्यात एक हजार रुपयांची घट झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी कमी आहे. सध्या देशात प्रतिदिन सरासरी दोन लाख गाठींची आवक (एक गाठ १६५ किलो रुई) होत आहे. राज्यात सध्या रोज ३५ हजार कापूस गाठींची आवक होत आहे. बाजारात आवक चांगली आहे.

मागील वर्षी कापसाची आवक जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रतिदिन ४० ते ४५ हजार गाठी होती. सध्या खंडीचे दर ५४ हजार रुपये आहेत. देशातील कापूस परकीय खरेदीदारांना परवडत नाही. कापसाचा दर्जा चांगला आहे.

परंतु उठाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सोयाबीनचे तेल तुलनेत स्वस्त आहे. पशुखाद्यासाठी सोयाबीन, मका मुबलक आहे. परिणामी सरकी तेल व सरकीस देशातील बाजारात उठाव कमी आहे.

कापड ही बाब जीवनाश्यक बाबींत गणली जात नाही. कोविडच्या काळात रुग्णालये, घरांमध्ये कापडासंबंधी मोठी मागणी होती. या काळात कापूस बाजार स्थिर होता. परंतु कोविडनंतर आयटी क्षेत्रात मंदी आली.

तसेच रशिया व युक्रेमध्ये युद्ध सुरू झाले. अमेरिका, चीनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली. याचा परिणाम कापूस बाजारावर दिसत आहे.
- अरविंद जैन, कापूस विषयाचे जाणकार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com