Chana Disease : हरभरा पिकावरील मर, खोडकुज, मूळकुज नियंत्रण

Chana Disease Control : हरभरा पिकाच्या प्राथमिक अवस्थेत मर, खोडकुज व मूळकुज अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे.
Chana Disease
Chana DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. एम. एन. इंगोले, डॉ. एस. एस. माने, डॉ. एस. बी. ब्राह्मणकर

हरभरा पिकाच्या प्राथमिक अवस्थेत मर, खोडकुज व मूळकुज अशा रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. वातावरणातील बदल, वारंवार एकच एक पीक घेणे, बीज प्रकिया न करणे अशा अनेक कारणामुळे तो वाढत चालला आहे.

परिणामी, रोपांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या रोगांचा प्रसार प्रामुख्याने रोगग्रस्त बियाण्याद्वारे, जमिनीतून होतो. त्यामुळे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया केल्यास या रोगांचा प्रादुर्भाव रोखणे शक्य आहे.

लक्षणे :

मर रोग :

हा रोग फ्युजारिअम ऑक्झीस्पोरम सायसेरी या बुरशीमुळे होतो. प्रादुर्भाव होताच पाने पिवळी पडून कोमेजतात. शेंडा मलूल होतो. झाड हिरवे असतानाच वाळते. मर रोग पिकाच्या रोपावस्थेत व पीक प्रौढावस्थेत (म्हणजे ६ आठवड्यांच्या अवस्थेनंतर) असताना दिसून येतो.

अ) रोपावस्थेतील मर :

रोपावस्थेतील पिकामध्ये मर रोग पेरणीनंतर ३ आठवड्यांत दिसून येते. ३ ते ५ आठवड्यांतील अवस्थेतील पीक कोलमडते. जमिनीवर आडवे पडते. या अवस्थेत रोप हिरवेच असते. असे रोप उपटले असता जमिनीवरील व जमिनी खालील खोडाचा भाग बारीक झालेला आढळतो, परंतु खोड कुजलेले नसते. रोप उभे चिरले असता आतील उती काळपट तांबूस दिसतात. अशी रोपे काही दिवसांत वाळतात.

Chana Disease
Chana Crop : नेटक्या व्यवस्थापनातून वाढविली हरभरा पिकाची उत्पादकता

ब) प्रौढावस्थेतील मर :

पीक साधारण ६ आठवड्यांचे झाल्यानंतर दिसून येते. झाड शेंड्याकडून मलूल होऊन सुकते. झाडाची खालील पाने पिवळी पडतात. काही पाने मात्र हिरवीच असतात. २ ते ३ दिवसांनी हळूहळू सर्व पाने पिवळी पडतात.

ही पिवळी झालेली पाने पीक परिपक्व अवस्थेपर्यंतही झाडावर सुकलेल्या अवस्थेत दिसतात. रोगग्रस्त झाड उपटले असता झाड वाळलेल्या अवस्थेत दिसते. झाड उभे चिरले असता उतीमध्ये काळपट भाग दिसतो. कधी कधी संपूर्ण झाड न वाळता काही फांद्याच वाळलेल्या दिसतात. झाड वाढल्यानंतरही बुरशी उर्वरित अवशेषांमध्ये वास्तव्य करते.

Chana Disease
Chana Varieties : हरभरा लागवडीच्या सुधारित पद्धती

खोडकुज :

हा रोग स्क्लेरोशिअम रोलफसाय या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे पीक पेरणीनंतर ६ आठवड्यांपर्यंत दिसून येतात. ओलसर जमिनीमध्ये हा रोग जास्त दिसून येतो. रोपावस्थेतील पीक कोलमडते, परंतु प्रोढावस्थेतील पीक कोलमडत नाही. ठळकपणे पाने गळण्याची प्रक्रिया दिसत नाही.

झाड उपटले असता जमिनीलगतचा खोडाचा भाग कुजलेला व खालपर्यंत कुजत गेलेला दिसतो. कुजलेल्या भागावर पांढरी बुरशी वाढलेली दिसते. ही बुरशी बराच काळापर्यंत दिसते.

ओलसर जागेतील बाधित झालेली रोपे उपटली असता मोहरीच्या आकाराची बुरशीची बीजफळे (पांढरी बुरशी) खोडाभोवताली वाढलेली असते. या बुरशीचा प्रादुर्भाव शेतात सहज ओळखता येते. शेतात काही ठिकाणी अशी वाळलेली झाडे आढळतात.

मूळकुज :

हा रोग राझोक्टोनिया सोलानी किंवा राझोक्टोनिया बटाटीकोला या जमिनीत वास्तव्य करणाऱ्या बुरशींमुळे होतो. ज्या जमिनीत जास्त ओलावा असेल किंवा पाणी देऊन पेरला आहे, अशा शेतात (विशेषतः काळी, भारी जमिनीमध्ये) हा रोग जास्त आढळतो. परंतु ओलिताच्या हरभऱ्यात हा रोग प्रौढ अवस्थेतही दिसतो. यामध्ये झाडे पिवळी पडतात. पण झाड कोलमडत नाही.

जमिनीलगत मुळे कुजतात. असे झाड सहजासहजी उपटून येते. राझोक्टोनिया बटाटीकोला बुरशीमुळे कोरडा मूळकुज रोग होतो. यामध्ये संपूर्ण झाड वाळते. वाळलेली झाडे विखुरलेल्या स्वरूपात संपूर्ण शेतात दिसतात.

या रोगात टोकावरील पाने व देठ कोमेजतात. मुख्य मुळावर कुजलेपणा दिसतो. या रोगात मुळे कोरडी राहतात. मेलेली मुळे ठिसूळ होतात, तर मुळावरील साल अलगद निघून येते. झाड उभे चिरले असता अतिरिक्त धागेधागे झाल्यासारखी लक्षणे दिसतात. रोग साधारण ३० अंश सेल्सिअसच्या वर तापमान असल्यावर आढळतो.

नियंत्रणाचे उपाय :

रोगग्रस्त शेतात हरभरा पीक ३ ते ४ वर्षे घेण्याचे टाळावे, तसेच पिकाची फेरपालट करावी. रोगप्रतिकारक जाती उदा. विजय, जाकी ९२१८, पीडीकेव्ही कांचन (ओलिताखाली), पीडीकेव्ही कनक, पीडीकेव्ही काबुली २, पीडीकेव्ही काबुली ४ इ. वाणांचा पेरणीकरिता वापर करावा. वाण निवडताना जमिनीचा प्रकार व वाणाची अन्य वैशिष्ट्ये लक्षात घेणे गरजेचे आहे. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

पेरणीपूर्वी बियाण्यास टेब्युकोनॅझोल (५.४ टक्के एफ. एस.) बुरशीनाशक ४ मि.लि. किंवा प्रोक्लोराझ (५.७ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१.४ टक्के ई.एस.) (संयुक्त बुरशीनाशक) ३ मि.लि. किंवा टेब्युकोनॅझोल (१५ टक्के) अधिक झायनेब (५७ टक्के डब्ल्यू. डी. जी.) (संयुक्त बुरशीनाशक) ४० मि.लि. प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे प्रकिया करावी.

त्यानंतर बियाण्यास ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ४० ग्रॅम प्रति १० किलो या प्रमाणात बीजप्रकिया करावी. जास्त प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात ट्रायकोडर्मा एकरी २ किलो या प्रमाणात २०० किलो कुजलेल्या शेणखतात मिसळून द्यावा. (ॲग्रेस्को शिफारस).

डॉ. एम. एन. इंगोले, ९४२१७५४८७८ (वनस्पती रोगशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com