Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Grape Production : शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे लक्ष देतात. केवळ युरोपच नव्हे तर भारतात सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते.
Grape News
Grape News Agrowon
Published on
Updated on

Nashik News : शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे लक्ष देतात. केवळ युरोपच नव्हे तर भारतात सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार द्राक्षांची गुणवत्ता असल्यास फायदा होऊ शकतो. यासह काढणीपश्‍चात शीतकरण, साठवणूक व विपणन ही काळाची गरज आहे, असा सूर मान्यवर व तज्ज्ञांच्या भाषणातून समोर आला.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ नाशिक विभाग आयोजित ‘द्राक्ष संघ आपल्या दारी’ कार्यक्रमाअंतर्गत ‘ऑक्टोबर द्राक्षबाग छाटणी व्यवस्थापन’ चर्चासत्राचे आयोजन गुरुवारी (ता. ३) पिंपळगाव बसवंत येथे करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले होते.

तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव आमले, कृषी उपसंचालक जगदीश पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय शेवाळे, द्राक्ष निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. मोगल, अशोक गायकवाड, दाभोळकर प्रयोग परिवाराचे मुख्य समन्वयक वासुदेव काठे, द्राक्ष मार्गदर्शक अनंत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

श्री. काटकर म्हणाले, की आता तंत्रज्ञान स्वीकारून नवे बदल स्वीकारताना कार्यक्षमता वाढावी लागणार आहे. मार्केटच्या अंगाने लक्ष केंद्रित करण्यासह भारतीय बाजारपेठेत स्पर्धा निर्माण करण्यासाठी दीर्घकालीन योजना व ग्राहक डोळ्यांसमोर ठेवून बदल करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा मार्केटिंगची समस्या मोठ्या प्रमाणावर येऊ शकते.

श्री. आमले म्हणाले, की द्राक्ष उत्पादनाच्या अनुषंगाने संघाने आजवर प्रयत्न केले आहेत. आता द्राक्षाचे ब्रँडिंग करण्यासाठी पुढाकार घ्यावा. निर्यात करताना युरोपकडे अपेक्षेने पाहतो; मात्र भारतीय बाजारपेठेत व आशियाई देशातही मोठ्या संधी आहेत. त्यामुळे मार्केटिंग व ब्रँडिंगकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Grape News
Grape Farming : द्राक्ष बागेत कलम करताना घ्यावयाची काळजी

विलास शिंदे म्हणाले, की द्राक्षाच्या उत्पादन वाढीबरोबरच आता मागणी वाढीसाठी आगामी काळात काम करावे लागणार आहे. ग्राहकांच्या पातळीवर द्राक्षाविषयी असलेली नकारात्मकता काढून त्यातील सकारात्मक बाबी पुढे आणल्या जाव्यात. उत्पादनाच्या अंगाने आजवर मोठी भांडवली गुंतवणूक झाली. आता काढणी पश्चात साठवणूक, शीतकरण अशा सुविधांसाठी गुंतवणुकीची गरज आहे.

Grape News
Grape Farming : द्राक्ष उत्पादकांनी द्राक्ष संघाच्या प्रयोगशाळेचा उपयोग करून घ्यावा

मोकल म्हणले, की द्राक्षाचे उत्पादन कमी खर्चात होण्यासाठी आता शास्त्रीय पद्धतीची जोड देणे गरजेचे आहे. द्राक्ष काढणीपश्‍चात पॅकेजिंग व त्यातून चांगले दर मिळाले पाहिजेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावाने द्राक्षाची विक्री होते त्याच पद्धतीने व्यवहार व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविक नाशिक विभागाचे अध्यक्ष बाळासाहेब गडाख यांनी केले. आभार प्रदर्शन मानद सचिव बबनराव भालेराव यांनी केले. संघाचे संचालक रवींद्र निमसे, भाऊसाहेब भालेराव, गणेश मोरे, शाम शिरसाठ, सुकृत बोराडे आदी उपस्थित होते.

द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याची गरज

विविध करांच्या माध्यमातून उत्पादन घेताना उत्पन्न मिळण्यापूर्वी द्राक्ष उत्पादक शेतकरी एकरी पन्नास हजार रुपये खर्च करतो. तरी त्याच्या उत्पन्नाचा परतावा नसताना खिशातून रक्कम जाते. राज्यातील द्राक्ष शेतीचा आढावा घेतल्यास ही कराची रक्कम २ हजार कोटी होते. मात्र तरीही इतर पिकांप्रमाणे द्राक्ष शेतीकडे पाहिले जात नाही. गेल्या वर्षात ९५०० कोटी परकीय चलन मिळवून दिले. मात्र परकीय गंगाजळी मिळवून देण्याची क्षमता असल्याने द्राक्ष उत्पादकांना दिलासा देण्याची गरज आहे, असे अध्यक्ष कैलास भोसले यांनी नमूद केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com