
Pune News: कृषी विभागात वर्षानुवर्षे मलाईदार पदांवर वेटोळे घालून बसलेल्या काही महाभागांना पुन्हा मोक्याच्या पदांवर बदल्या हव्या होत्या. परंतु, कृषी आयुक्तांनी रोखठोक भूमिका घेत आर्थिक स्पर्धेला चाप लावला. त्यामुळे यंदा ‘गुणनियंत्रण’सह सर्व मोक्याच्या जागांवर ‘मोफत’ बदली मिळाल्यामुळे अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कृषी विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, समुपदेशन प्रक्रिया यंदा तीन दिवस चालली व पारदर्शकपणे पार पडली.
विशिष्ट पदांवर संशयास्पदपणे बदल्या होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या कडक सूचना कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या होत्या.नागरी सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. कैलास मोते तसेच कृषी संचालक आयुक्तालयाच्या आस्थापना विभागाचे सहसंचालक गणेश घोरपडे यांनी समुपदेशन प्रक्रिया अत्यंत सावधपणे पार पाडली. समुपदेशनात एकही बदली संशयास्पद होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचा दावा आस्थापना विभागाने केला आहे.
समुपदेशनाला आक्षेप; मात्र नियम पाळल्याचाही दावा
दरम्यान, समुपदेशन प्रक्रियेवर काही अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतले. मात्र, आस्थापना विभागाने आक्षेप फेटाळले आहेत. समुपदेशनात दिव्यांग, असक्षम, आजारी, विधवा, परितक्त्या तसेच पती-पत्नी एकत्रिकरण असे सर्व निकष बदल्या करताना विचारात घेतले गेले आहेत. बदल्यांबाबत निकष विचारात घेताना प्राधान्यक्रमांची यादीदेखील आधी जाहीर करण्यात आली.
त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय सोयीनुसार, नियमात बदल्या देण्यात आल्या आहेत, असा दावा प्रशासनाने केला आहे.याबाबत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की बदल्यांबाबत कृषी खात्यात वर्षानुवर्षे काही टोळ्यांनी दुकाने थाटली होती. याच टोळ्या आयुक्तालयापासून मंत्रालयापर्यंत व्यूहरचना करीत होत्या.
त्यात अधिकाऱ्यांना अडकवत होत्या. त्यासाठी नागरी सेवा मंडळाच्या बैठका आणि अहवालदेखील ‘मॅनेज’ केले जात होते. यंदा, मात्र समुपदेशनामुळे टोळ्यांचा धंदा पुरता बसला आहे. बदल्यांच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचेही प्रयत्न झाले. परंतु, प्रशासनाने कोणालाही भीक घातली नाही. पारदर्शक बदल्यांमध्ये कोणाला गैर वाटत असल्यास त्यांनी न्यायालयात जावे, असाही सल्ला या अधिकाऱ्याने दिला.
आयुक्तांची रोखठोक भूमिका
एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले, की काही विभागांतील अधिकाऱ्यांना विशिष्ट पदांवर सलग काम केल्यानंतर पुन्हा मोक्याच्या जागी जाण्यासाठी धडपड सुरू ठेवली होती. परंतु, यंदा कृषिमंत्री, कृषी सचिव व कृषी आयुक्त यांनी कोणत्याही बदलीत हस्तक्षेप केला नाही. वरिष्ठांकडूनच हस्तक्षेप नसल्यामुळे मधली लॉबीदेखील थंडावली.
आयुक्तांनी तर लेखी आदेश काढत गुणनियंत्रण विभाग, दक्षता विभागावर लक्ष ठेवले होते. ‘विशिष्ट विभागात काम केलेल्या अधिकाऱ्यांना त्याच कामाशी संबंधित सलग दुसरी पदस्थापना अजिबात देऊ नका,’ अशी ताकीद आयुक्तांनी समुपदेशन यंत्रणेला दिली होती. कृषी विभागातील प्रयोगशाळांशी संबंधित पदेदेखील मलईदार समजली जातात.
त्यामुळे या पदांवर बदली मिळण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असते. यंदा मात्र प्रयोगशाळांशी निगडित पदांवर बदली करताना वशिला विचारात घेण्यात आला नाही. त्याऐवजी अनुभव, शिक्षण व प्रशिक्षण विचारात घेतले गेले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.