डॉ. रोहिणी मुगळे, डॉ. राजीव राठोड, डॉ. प्रशांत तेलवेकर Aquaculture Business: मत्स्य संवर्धन क्षेत्र केवळ पारंपरिक ज्ञानावर अवलंबून नसून आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि वैज्ञानिक व्यवस्थापनावर आधारित अर्थव्यवस्था बनत आहे. त्यामुळे जल संपत्तीचे व्यवस्थापन, निर्यात दर्जाचे अन्नसुरक्षा मानदंड राखणे आणि शाश्वत समुद्री पायाभूत सुविधा विकसित करणे यासाठी विशेष तज्ज्ञांची आवश्यकता आहे. .केंद्र सरकारच्या विविध योजनांमुळे मत्स्य संवर्धन क्षेत्राला मोठी चालना मिळत आहे. विशेषतः प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (PMMSY) योजनेमुळे मत्स्य उद्योगाची प्रगती वेगाने होत आहे. पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्याऐवजी आता शास्त्रोक्त आणि अधिक उत्पादन देणाऱ्या मत्स्य संवर्धनाकडे सर्वांचेच लक्ष वळत असल्यामुळे या कामासाठी लागणाऱ्या कौशल्यपूर्ण तांत्रिक पदवीधारकांची मोठी गरज भासत आहे. .Fish Farming: मत्स्य सहकारी संस्थांसाठी विशेष योजना.हे क्षेत्र आता केवळ पारंपरिक ज्ञानावर अवलंबून नसून आधुनिक तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि वैज्ञानिक व्यवस्थापनावर आधारित अर्थव्यवस्था बनत आहे. त्यामुळे जल संपत्तीचे व्यवस्थापन, निर्यात दर्जाचे अन्नसुरक्षा मानदंड राखणे आणि शाश्वत समुद्री पायाभूत सुविधा विकसित करणे यासाठी विशेष तज्ज्ञांची आवश्यकता आहे. या उद्देशासाठी सक्षम शैक्षणिक व्यवस्थेचा पाया म्हणजे मत्स्य विज्ञान पदवी (B.F.Sc.) आहे. मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठी बारावी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तसेच एमएच-सीईटी परीक्षा दिलेली असावी..अभ्यासक्रमाचे स्वरूपआशिया खंडातील नामांकित मत्स्य शिक्षण क्षेत्रातील एक केंद्रीय प्रमुख संस्था म्हणजे आपल्या मुंबईमधील केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था. सध्या भारतामध्ये मत्स्य विज्ञान महाविद्यालये विविध राज्यांमध्ये कार्यरत असून, तिथे मत्स्य विज्ञान विषयातील पदवी अभ्यासक्रम- Bachelor of Fishery Science (B.F.Sc.), स्नातोकत्तर अभ्यासक्रम- Master in Fishery Science (M.F.Sc.) आणि आचार्य पदवी अभ्यासक्रम- Doctor of Philosophy (Ph.D.) अशा स्तरांवर शिक्षण दिले जाते..मत्स्य विज्ञान पदवी अभ्यासक्रम (B.F.Sc.) हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असून, त्यामध्ये मत्स्यशास्त्राशी संबंधित विविध विषयांचा समावेश असतो. विद्यार्थ्यांना मत्स्य संवर्धन, मत्स्य साधन संपत्ती व्यवस्थापन, मत्स्य पर्यावरण व्यवस्थापन, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान, मत्स्य अभियांत्रिकी, जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन, मत्स्य विस्तार अर्थशास्त्र सांख्यिकी, मत्स्यशेती, मत्स्य प्रजनन, मत्स्य पोषण यांचे सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक ज्ञान दिले जाते..सध्या भारतामध्ये एकूण ४० मत्स्य महाविद्यालये कार्यरत असून ३५ शासकीय, तर ५ खासगी मत्स्य महाविद्यालयांचा समावेश होतो. यामध्ये विविध राज्य कृषी विद्यापीठांबरोबरच दोन केंद्रीय कृषी विद्यापीठांचा समावेश आहे. केंद्र स्थरावर पाहता, केंद्रीय कृषी विश्वविद्यालय, इम्फाळ, मणिपूर; डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, बिहार आणि राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय, झाशी यांचा समावेश आहे. केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई हे एकमेव मत्स्य विज्ञानासाठी स्थापित मान्यताप्राप्त विद्यापीठ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे..चाळीस शासकीय मत्स्य महाविद्यालयांपैकी २१ महाविद्यालयांमध्ये पदवी (B.F.Sc.) तसेच पदव्युत्तर (M.F.Sc.) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. भारतामध्ये मत्स्य शिक्षणात (विशेषतः एम.एफ.एस्सी. व पीएच.डी. स्तरावर) विविध अधिकृत व मान्यताप्राप्त विशेष शाखा उपलब्ध आहेत, ज्या भारतीय कृषी संशोधन परिषद यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विकसित करण्यात आल्या आहेत. .यामध्ये मत्स्यपालन, मत्स्य अनुवंशशास्त्र व प्रजनन, मत्स्य पोषण व खाद्य तंत्रज्ञान, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान, मत्स्य रोगशास्त्र व सूक्ष्मजीवशास्त्र, जलपर्यावरण व्यवस्थापन, मत्स्य संसाधन व्यवस्थापन, मत्स्य विस्तार शिक्षण आणि मत्स्य अर्थशास्त्र या प्रमुख शाखांचा समावेश होतो. याशिवाय काही निवडक विद्यापीठांमध्ये प्रगत व विशेषीकृत शाखाही उपलब्ध आहेत, जसे की, मत्स्य औषधशास्त्र व विषशास्त्र, समुद्री मत्स्यपालन, शोभिवंत मासे पालन आणि मत्स्य जैवतंत्रज्ञान या उदयोन्मुख शाखांचा समावेश आहे..Fish Farming Support: कोल्हापूर जिल्ह्यात मत्स्य क्रांतीचे पाऊल.विद्यापीठे व प्रशिक्षण संस्थांमध्ये डिप्लोमा व प्रमाणपत्र अभ्यासक्रमदेखील उपलब्ध आहेत, ज्यामध्ये मत्स्यबीज उत्पादन, हॅचरी व्यवस्थापन, मत्स्यपालन पद्धती, मत्स्य प्रक्रिया व मूल्यवर्धन, शोभिवंत मासेपालन यांसारखे कौशल्याधारित अभ्यासक्रम दिले जातात. तसेच मत्स्य व्यवस्थापन, मत्स्यपालन व्यवसाय व्यवस्थापन, मत्स्य विस्तार व्यवस्थापन यांसारखे व्यवस्थापनाशी संबंधित अभ्यासक्रमही विद्यार्थ्यांना उद्योजकता व उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध करून देतात..केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था, मुंबई वगळता भारतातील १७ मत्स्य महाविद्यालयांमध्ये तीन वर्षांचा पीएच.डी. अभ्यासक्रम उपलब्ध आहे, ज्यामध्ये एक वर्षाचा अभ्यासक्रम आणि दोन वर्षांचा संशोधन समाविष्ट असतो. या सर्व महाविद्यालयांमध्ये सेमिस्टर पद्धतीनुसार शिक्षण दिले जाते. कोची (केरळ) येथे केरळ मत्स्य आणि महासागर विज्ञान विद्यापीठ (KUFOS) आहे. हे भारतातील पहिले पूर्ण विकसित मत्स्य विद्यापीठ आहे. यापूर्वी केरळ कृषी विश्वविद्यालय अंतर्गत असलेले कॉलेज ऑफ फिशरीज, पननगड (कोची) हे आता KUFOS शी संलग्न आहे. त्यानंतर दुसरे मत्स्य विद्यापीठ तमिळनाडूमध्ये डॉ. जे. जयललिता मत्स्य विद्यापीठ, नागपट्टिनम (TNJFU) येथे स्थापन करण्यात आले. तिसरे विद्यापीठ आंध्रप्रदेश मत्स्य विद्यापीठ, विजयवाडा (आंध्र प्रदेश) येथे स्थापन करण्यात आले..महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर हे २००० मध्ये स्थापन झालेले राज्यातील एक महत्त्वाचे कृषिसंलग्न विद्यापीठ आहे. हे पशुवैद्यकीय, दुग्ध तंत्रज्ञान व मत्स्य शिक्षणाच्या विकासासाठी कार्यरत आहे. मत्स्य शिक्षणाच्या क्षेत्रात या विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विद्यापीठांतर्गत तीन मत्स्य विज्ञान महाविद्यालये आहेत. यामध्ये मत्स्य विज्ञान महाविद्यालय, नागपूर (२००६), मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर (२००७) तसेच मत्स्य विज्ञान महाविद्यालय, मोर्शी, जि. अमरावती (२०२५). या मत्स्य विज्ञान महाविद्यालयांच्या माध्यमातून बी.एफ.एस्सी. (B.F.Sc.) हा पदवी अभ्यासक्रम चालविला जातो..रोजगाराच्या संधीमहाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी भारतीय कृषी संशोधन परिषद-कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळ (ASRB) मार्फत शास्त्रज्ञ म्हणून वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांमध्ये भारतभर कार्यरत आहेत..काही विद्यार्थी केंद्रीय कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या मत्स्य विज्ञान महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागात अनेक विद्यार्थी वर्ग १ मध्ये सहायक आयुक्त (मत्स्य व्यवसाय), वर्ग २ मध्ये मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आणि वर्ग ३ मध्ये सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी या पदांवर कार्यरत आहेत..पदवी धारक विद्यार्थी उच्च शिक्षण व नोकरीच्या संधींसाठी परदेशात स्थायिक झाले आहेत, तर अनेक विद्यार्थी बँकिंग क्षेत्रात कार्यरत आहेत. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (MPEDA), राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळ (NFDB), राष्ट्रीय सहकारी विकास निगम (NCDC), राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, भारतीय मत्स्यकी सर्व्हेक्षण (FSI)इ. संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत तसेच केंद्र सरकारच्या मत्स्य विभागामध्ये कार्यरत आहेत..काही पदवीधारक विद्यार्थी हे खाजगी महाविद्यालयात, विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र या विभागामध्ये सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याच बरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या स्पर्धा परीक्षा देऊन नायब तहसीलदार व तहसीलदार इत्यादी पदावर कार्यरत आहेत. याशिवाय, काही पदवीधारक विद्यार्थी खाजगी फार्मवर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. काही विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून मत्स्यपालन (फार्म) तसेच शोभिवंत मत्स्य उत्पादन युनिट्स, मत्स्य प्रक्रिया युनिट्स, मत्स्य बीज उत्पादन सेंटर यशस्वीपणे स्थापन केले आहेत.mafsu.ac.in- डॉ. राजीव राठोड, ९७६६३१३९२०(सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य विज्ञान महाविद्यालय, मोर्शी, जि. अमरावती).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.