Butterfly research: फुलपाखरांना रंगज्ञान असते; पण त्यांना तांबडा रंग दिसत नाही

डॉ. डोरा इल्झे यांनी आपले गुरू, प्रोफेसर फॉन फ्रिच, यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुण्यात फुलपाखरांवर संशोधन केले आणि फुलपाखरांना कोणते रंग ओळखता येतात, हे शोधून काढले. फुलपाखरे फुलांमधला मकरंद पितात.
Butterflies
Butterflies Agrowon

डॉ. आनंद कर्वे

माझी आई डॉ. इरावती कर्वे १९५१-५२ मध्ये लंडनमधील एका संस्थेत कार्यरत असताना तिची डॉ. डोरा इल्झे या बाईंशी ओळख झाली. डॉ. इल्झे या मूळच्या जर्मन आणि फॉन फ्रिच या नोबेल पारितोषिक (Nobel Awardee) विजेत्या जर्मन प्राणिशास्त्रज्ञाच्या शिष्या.

पण त्या धर्माने यहुदी असल्याने त्यांना हिटलरच्या राजवटीत बराच त्रास सहन करावा लागला होता. युद्धसमाप्तीनंतर त्या इंग्लंडात आल्या. माझ्या आईला जर्मन भाषा अवगत होती आणि प्रोफेसर फॉन फ्रिचच्या कामाचीही तिला माहिती होती.

त्यामुळे त्या दोघींची बऱ्यापैकी मैत्री झाली. पुणे विद्यापीठाची (आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) (Savitribai Phule Pune University) नुकतीच स्थापना झाली होती.

विद्यापीठात प्राणिशास्त्र विभागाच्या प्रमुखाची जागा भरावयाची होती. माझ्या आईच्या सांगण्यावरून इल्झेबाईंनी पुणे विद्यापीठात नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यांना ती नोकरी मिळाली.

त्या वेळी भारतात प्राणिशास्त्रात मुख्यतः प्राण्यांची शरीररचना आणि शरीरातील विविध संस्थांच्या कार्याचा अभ्यास, वेगवेगळ्या जातींच्या प्राण्यांचा फलित पेशिकेपासून पूर्ण वाढ होईपर्यंत होत जाणारा विकास, प्राण्यांचे जैवरसायनशास्त्र, अशा प्रकारचे विषय शिकवले जात.

जिवंत, हिंडत्या फिरत्या प्राण्यांचे निरीक्षण करणे, ते राहतात कसे, आपले भक्ष्य कसे मिळवतात, कळपाने राहणारे प्राणी परस्परांशी कसे वागतात इ. विषयांचा त्या काळी भारतात अभ्यास केला जात नसे.

याउलट युरोपातील प्राणिशास्त्रात जिवंत प्राण्यांचा अभ्यास हा एक नवा पायंडा पडला होता. प्रोफेसर फॉन फ्रिचने मधमाश्या एकमेकींशी संवाद कसा साधतात हे शोधून काढले होते.

डॉ. इल्झे यांनी आपले गुरू, प्रोफेसर फॉन फ्रिच, यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुण्यात फुलपाखरांवर संशोधन केले आणि फुलपाखरांना कोणते रंग ओळखता येतात, हे शोधून काढले.

Butterflies
Honey : मध पंचामृतातील एक अमृत

फुलपाखरे फुलांमधला मकरंद पितात. फुलपाखराला एकदा एखाद्या फुलामध्ये मकरंद मिळाला, की ते मकरंदाच्या आशेने त्याच जातीच्या आणखी फुलांना शोधून काढते. या शोधमोहिमेत त्याला त्या फुलांचा रंग उपयोगी पडतो.

डॉ. इल्झे यांनी विद्यापीठाच्या बागेत आढळणाऱ्या एका विशिष्ट जातीची फुलपाखरे वाढविली. मग त्यांनी त्यांचे वेगवेगळे गट पाडले आणि प्रत्येक गटाला एका विशिष्ट रंगाच्या बशीत साखरेचे द्रावण दिले. ज्या बशीत मकरंद मिळाला त्या बशीचा रंग फुलपाखरांच्या लक्षात राहिला.

आणि जेव्हा त्या फुलपाखरांना सर्व सात रंगांच्या रिकाम्या बशा दाखविल्या गेल्या, तेव्हा आधीच्या सत्रांमध्ये ज्या रंगाच्या बशीत मकरंद मिळाला होता त्याच रंगाच्या बशीवर ती फुलपाखरे गोळा व्हायची.

या प्रयोगाद्वारे डॉ. इल्झे यांनी असे दाखवून दिले, की फुलपाखरांना सप्तरंगांपैकी तांबडा सोडून बाकी सर्व रंग ओळखता येतात. अशा प्रकारचे संशोधन तोपर्यंत भारतात कुणीच केले नव्हते.

कीटकांना तांबड्या रंगाचा प्रकाश दिसत नाही, हे आता सगळ्यांनाच माहीत झाले आहे; पण त्या वेळी तो नवा शोध होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला रात्री आपल्या घरातल्या दिव्यांवर हजारोंच्या संख्येने किडे येतात.

ते जर यायला नको असतील तर आपल्या विजेच्या बल्बला किंवा ट्यूबला लाल रंगाच्या सेलोफेनचा पारदर्शक कागद गुंडाळावा. माणसांना लाल प्रकाशात दिसते, पण कीटकांना मात्र लाल प्रकाश हा अंधारासारखाच वाटतो.

याउलट माणसांना दिसत नाही असा अतिनील (अल्ट्राव्हायोल्ट) रंग मधमाश्यांना दिसतो, हेही आता माहिती झाले आहे. अतिनील प्रकाशात फुलांचे फोटो काढून त्यांचा अभ्यास केल्यावर असे आढळले आहे, की उडणाऱ्या मधमाशीला फुलावर कुठे उतरावयाचे अशी सोईस्कर जागा अतिनील रंगाने दर्शविली जाते.

ही झाली डॉ. इल्झे यांच्या पुण्यातील नोकरीतली जमेची बाजू; पण विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या बाबतीत मात्र त्या सपशेल अयशस्वी ठरल्या. विद्यार्थ्यानी त्यांच्याविरुद्ध कुलगुरूंकडे अशी तक्रार केली, की इल्झेबाई पाठ्यक्रमानुसार न शिकवता भलतेच काहीतरी शिकवतात.

कुलगुरूंनी त्याबद्दल इल्झेबाईंकडे विचारणा केली असणार, कदाचित त्यावर त्यांची वादावादीही झाली असेल; पण अखेर त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरीचा राजिनामा दिला. हे असे का घडले असावे, हे १९५६ मध्ये मी स्वतः उच्च शिक्षणासाठी जर्मनीत गेल्यावर माझ्या लक्षात आले.

त्या वेळी जर्मनीत विद्यापीठांच्या विज्ञानशाखेत डॉक्टर ही एकच पदवी मिळायची. त्यासाठी कोणताही ठरावीक अभ्यासक्रम नसे, पण विद्यार्थ्याला त्याच्या विषयाचे सखोल ज्ञान असावे अशी परीक्षकांची अपेक्षा असायची.

बहुतेक सर्व विद्यापीठे चारशे वर्षांहूनही जुनी. ती स्थापन झाले तेव्हा विज्ञानाचा अभ्यास करून कोणाचेही पोट भरत नसे, तर उलट सुखवस्तू घरातले लोक विरंगुळा म्हणून विज्ञान शिकत आणि पदरमोड करून संशोधन करीत. प्रोफेसर मंडळी आपापल्या आवडीच्या विषयावर व्याख्याने देत असत. त्यांनी काय व कसे शिकवावे हे त्यांना कोणी सांगत नसे.

मी जर्मनीत शिकत होतो तेव्हाही हीच प्रथा चालू होती. विद्यापीठांना एवढी स्वायत्तता असल्याने जर्मन सरकारची विद्यापीठांच्या पदव्यांना मान्यता नसते.

सरकारी नोकरीसाठी सरकार आपल्या स्वतंत्र परीक्षा घेते आणि नोकरी हवी असेल तर सरकारी परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागते. मेडिकल डॉक्टरलाही सरकारी परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय प्रॅक्टिस करता येत नाही.

Butterflies
Black Honey : जर्मनीतल्या काळ्याकुट्ट मधाची कहाणी

मी जर्मनीत गेलो तेव्हा मला माझ्या गुरूने वनस्पति‍शास्त्राच्या प्रथम वर्षाच्या वर्गात बसण्याचा सल्ला दिला. मला तो त्या वेळी अपमानास्पद वाटला; पण गुरूची आज्ञा म्हणून मी तिचे पालन केले.

पहिल्याच लेक्चरमध्ये आमच्या प्रोफेसरने फळ्यावर १० पाठ्यपुस्तकांची नावे लिहिली आणि त्यातले कोणतेही आम्ही वापरले तरी चालेल असे सांगितले. पण त्याने आम्हाला असेही संगितले, की त्या यादीमधील कोणत्याही पुस्तकात मिळणार नाही, अशी माहिती आम्हाला त्याच्या लेक्चरमध्ये मिळणार असल्याने त्याच्या लेक्चरला कोणी दांड्या मारू नयेत.

आणि खरोखरीच वनस्पतिशास्त्रातील या प्रारंभिक लेक्चरमध्ये मला पाठ्यपुस्तकांमध्ये नसलेली आणि तोपर्यंत न ऐकलेली अशी अद्ययावत माहिती मिळाली. माझ्या दृष्टीने ती एक ज्ञानगंगाच होती.

विद्यापीठांमध्ये जसे प्राध्यापकांना शिकवण्याचे स्वातंत्र्य होते, तसेच विद्यार्थ्यांना शिकण्याचेही होते. मी पीएच. डी.चे संशोधन करीत असताना वेगवेगळ्या विषयांची व्याख्याने ऐकत असे.

त्याचप्रमाणे जादा फी भरून अनेक प्रॅक्टिकल कोर्सेसही मी केले. एकदा तुम्ही विद्यापीठात विद्यार्थी म्हणून आलात, की तुम्ही कोणतेही लेक्चर आणि कोणताही प्रॅक्टिकल कोर्स करू शकता.

याचे एक कारण असे असू शकेल, की साधारण महाराष्ट्राएवढीच लोकसंख्या असलेल्या या देशात एकूण सुमारे ४०० विद्यापीठे आणि संलग्न संशोधन संस्था आहेत.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवावे, अशी तिथे परिस्थितीच नाही. ज्याला जे शिक्षण हवे ते मिळते, अगदी मेडिकल आणि इंजिनियरिंगचे सुद्धा. अशी परिस्थिती भारतात कधी येईल कुणास ठाऊक?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com