Pune News : महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाला भरभराटीला आणणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाऱ्यावर सोडण्यात आले आहे. प्रलंबित मागण्यांसाठी बुधवारी (ता. २१) कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा आंदोलन करीत संताप व्यक्त केला.
महाराष्ट्र कृषिउद्योग कर्मचारी संघाने आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली आहे. त्यानुसार एक दिवसाचे सामुदायिक रजा आंदोलन यशस्वी झाले. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचारी व अधिकारी विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहेत. परंतु, समस्या सुटलेली नाही. त्यामुळे येत्या २९ ऑगस्टच्या धरणे आंदोलनात सर्व निवृत्त कर्मचारी, अनुकंपा प्रतीक्षा यादीतील उमेदवार तसेच महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभागी होतील, असे संघाने म्हटले आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासनाला २१ मागण्यांची यादी दिलेली आहे. चर्चेसाठी आम्हाला प्रशासन बोलावते; परंतु, या मागण्या सोडवत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रशासन तातडीने बढत्या देते. बढत्यांना आमचा विरोध नाही. परंतु, चतुर्थश्रेणी, तृतीयश्रेणी, तांत्रिक संवर्ग, उपव्यवस्थापक, व्यवस्थापकांना बढत्यांपासून वंचित ठेवले गेले आहे. सातव्या वेतन आयोगाचा फरक देण्यात आलेला नाही.
महामंडळाचे अध्यक्ष स्वतः कृषिमंत्री असले तरी त्यांच्याकडे पाठपुरावा करुन प्रश्न सुटत नाही व त्यांच्याकडे आम्हाला भेटण्यासाठी वेळदेखील नाही. आश्वासित प्रगती योजना लागू न करता प्रशासनाने आम्हाला वेठीस धरले आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन दिलेले नाही.
महामंडळातील कर्मचारी नेत्यांनी एक होत ठामपणे आंदोलन सुरू केल्यामुळे प्रशासन आता नेमके काय भूमिका घेते, याकडे क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे. सुभाष पवार यांच्यासह रवींद्र पाटील, पीतांबर पाटील, संदीप जोंधळे, दीपक बांधे, पी.बी.निजवंते, सचिन बाहेकर आदी पदाधिकारी या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.