कमी- अधिक थंडीसोबतच पावसाची शक्यताहिमालयीन प्रदेशात हिमवर्षाव होताच उत्तरेकडून दक्षिणेकडे येणारे वारे हे थंडी घेऊन येतात. याचमुळे द्राक्ष विभागामध्ये कडाक्याची थंडी येण्याचे संकेत मिळत होते. मात्र उत्तरेकडील पश्चिमी प्रक्षेपावेळीच बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात ‘ला निना’च्या प्रभावामुळेही काही हवामान घडामोडी घडत होत्या. त्यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांसोबत ढगही आले. त्यांनी उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना राजस्थान व गुजरातमध्येच रोखले. परिणामी, महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीची लाट आली नाही..ढगांच्या प्रमाणानुसार आपल्या येथील थंडीचे प्रमाण कमी-अधिक होत गेले. पुढील आठ दिवसांत वातावरणातही अशाच घडामोडी अपेक्षित आहेत. त्यामुळे वातावरणात सतत बदल होत राहतील. आज व उद्या (ता. ८ व ९) महाराष्ट्रातील सर्वच द्राक्ष विभागांमध्ये आकाश निरभ्र राहील. दिवसभर चांगला सूर्यप्रकाश मिळेल. पण रात्रीचे तापमान वेगाने खाली जाईल. पहाटेचे तापमान रोजच्या पेक्षा २ अंशांनी अधिक खाली जाईल. विशेषतः नाशिकच्या बागायतदारांनी दक्षता घ्यावी..Grape Farming: मातीशी नाते अन् अस्मानीशी झुंज.बंगालच्या उपसागरात व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. याच हलक्या दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर लहान चक्री वादळात होण्याची शक्यता आहे. या वादळाच्या प्रभावाने शनिवार (ता. १०) नंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकाच्या काही भागात हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. याच वेळी महाराष्ट्राच्या द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुन्हा ढगाळ होण्याची शक्यता आहे. या वेळी ढग भरपूर व गडद असणार आहेत. त्यामुळे सकाळचे तापमान नेहमीपेक्षा कमी व पहाटेच्या तापमानात वाढ होणार. विशेषतः ११ तारखेनंतर कर्नाटकाच्या विजापूर- बागलकोट भागात व महाराष्ट्राच्या सांगली, सोलापूर व लातूर.पट्ट्यात ढग घन आणि काळे असतील. १२ ते १३ तारखेस या भागात काही ठिकाणी एक दोन चांगल्या पावसाच्या सरीसुद्धा मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आजूबाजूस कुठेही पाऊस पडल्यास संपूर्ण भागातील आर्द्रता बऱ्यापैकी वाढणार. मागच्या आठवड्यात मुंबई व धाराशिव भागात स्थानिक वातावरण तयार होऊन रिमझिम पाऊस झाल्याचे कळले. यामुळे वरील अंदाज खरे ठरण्याची शक्यता अधिक आहे..Grape Farming: द्राक्ष बागेतील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन.१७-१८ तारखेनंतर आणखी एक चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता दर्शविली जात आहे. या वादळाच्या प्रभावामुळे पुन्हा पाऊस देणारे ढग सर्वच द्राक्ष विभागांवर येण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी २१ ते २५ तारखेच्या दरम्यान पुन्हा हलक्या पावसाची शक्यता वर्तविली जात आहे. या अंदाजाबाबत अधिक नेमकेपणाने पुढील आठवड्यात आढावा नक्कीच घेऊ. पण तोपर्यंत सावध राहणे आवश्यक आहे..व्यवस्थापन - उपाययोजनाबहुतांशी द्राक्ष बागा आता छाटणीनंतरच्या ६५ ते ७० दिवसांच्या पुढे आहेत. लवकर सुरू झालेली थंडी आणि थोडी उशिरा झालेली छाटणी विचारात घेता आता सर्वच बागांमध्ये घडातील मण्यांची वाढ धण्याएवढी किंवा वाटाण्याएवढी निश्चितच झालेली असेल. येत्या काही दिवसांत पावसाची शक्यता वर्तविली असल्याने आता रोगनियंत्रण सावधपणे आणि विचारपूर्वक होणे आवश्यक आहे. रोग नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून विचार करता आता बागेतील अतिधोक्याचा काळ संपलेला आहे. बागेत शेंडा थांबलेला असतो..Grape Farming: वातावरणानुसार बागेमध्ये योग्य निर्णय घेणे आवश्यक.पाने जुनी होऊन त्यात काळोखी आलेली असते. थंडीच्या दिवसांत तुलनेने अशी कॅनोपी रोगास लवकर बळी पडत नाही. शेंडा थांबलेला असल्याने आता फवारणीनंतर नवीन पाने तयार होत नाहीत. म्हणूनच दोन फवारण्यांतील अंतर ५ ते ६ दिवसांपेक्षा जास्तही असू शकते. आता व यापुढे केल्या जाणाऱ्या फवारणीमुळे फळामध्ये अंश राहण्याचा धोका वाढत जातो. त्यामुळे बुरशीनाशकांच्या उर्वरित अंशाची समस्या टाळण्यासाठी प्रत्येक बागायतदाराने राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राने प्रसारित केलेली कृषिरसायनांच्या याद्या (अनेक्श्चर ५ आणि अनेक्श्चर ९) नेहमी आपल्याजवळ ठेवल्या पाहिजेत..अनेक्श्चर ५ या यादीमध्ये केंद्रीय इन्सेक्टिसाइड बोर्डाने द्राक्षामध्ये वापरण्यास परवाना दिलेल्या कृषी रसायनांचा समावेश आहे. तर अनेक्श्चर ९ मध्ये ज्या कृषी रसायनांचे द्राक्षामधील उर्वरित अंश निर्यातीआधी तपासली जातात, त्यांची यादी दिलेली आहे. या दोन्ही याद्यांमध्ये वेळोवेळी सुधारणा होत असतात. ताज्या नोव्हेंबर - डिसेंबर २०२५ मध्ये सुधारित केलेल्या याद्या ICAR_NRCG च्या संकेत स्थळावर (http://www.nrcgrapes.in/Annexure-५&९.htm) उपलब्ध आहेत. या यादीमध्ये कोणते रसायन कोणत्या रोग किंवा किडीच्या नियंत्रणासाठी किती मात्रेत वापरायचे, यासोबतच ते छाटणीनंतर किती दिवसापर्यंत वापरल्यास धोकादायक उर्वरित अंश द्राक्षामध्ये काढणीवेळी राहत नाहीत इ. माहिती दिलेली असते. प्रत्येक द्राक्ष बागायतदाराने या याद्यांचा वापर नियमितपणे व काळजीपूर्वक करणे अपेक्षित आहे..Grape Farming: भुरी नियंत्रणासाठी उष्णता राखण्यासाठी करावयाचे उपाय.सर्वसाधारणपणे विचार केल्यास बागेमध्ये किंवा बागेच्या जवळपास ज्या रोगाची लक्षणे कमीअधिक प्रमाणात दिसत आहेत, अशा रोगाच्या नियंत्रणास प्राधान्य दिले पाहिजे. येत्या काही दिवसांत येण्याची शक्यता असलेल्या संभाव्य पावसात तेच रोग बागेत वेगाने वाढण्याचा धोका राहू शकतो. सध्या तरी येत्या १० तारखेपर्यंत कुठल्याही रोगाचा धोका फारसा दिसत नाही. या काळातच बागेत असलेले रोगाचे इनॉक्युलम (रोगाचे बीजाणू) नष्ट करण्यासाठी अधिक प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी शक्यतो जैविक नियंत्रणासाठी जास्त अडथळा निर्माण होणार नाहीत अशा बुरशीनाशकाची निवड करावी..१० तारखेनंतर ढगाळ वातावरण व त्याच बरोबर सापेक्ष आर्द्रता वाढण्याची शक्यता दिसते. त्यात पुन्हा भुरीचाच धोका वाढू शकतो. सांगली, सोलापूर, लातूर भागात हलका पाऊस झाल्यास केवडा रोगाचा धोका वाढू शकतो. पाऊस पडल्यानंतर लगेच काही दिवस भुरी वाढणार नाही. पण पुढे पाऊस थांबल्यास व सकाळी दव पडत नसल्यास भुरी वेगाने वाढू शकते..Grape Farming Registration: द्राक्ष निर्यातीसाठीच्या शेतकरी नोंदणीला सांगलीत प्रारंभ.जास्त आर्द्रतेमध्ये जैविक नियंत्रण चांगले काम करते. जैविक नियंत्रणाचा वापर पाऊस झाल्यानंतर प्राथमिकतेने करावा. थंडी वाढत असताना भुरीच्या नियंत्रणासाठी ॲम्पिलोमाइसेस बुरशीचा वापर आम्ही पुन्हा पुन्हा सुचविला होता. आता प्रामुख्याने सांगली, सोलापूर भागातील सकाळचे तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस आहे. या तापमानात आता जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा बुरशीचा वापर शक्य आहे. या पुढील अंदाजाप्रमाणे संभाव्य पावसाच्या वातावरणात व पुढे थंडी कमी झाल्यास केवड्याचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे..ॲम्पिलोमायसेस हे फक्त भुरीच्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे, तर ट्रायकोडर्मा केवडा, करपा व भुरी या तीनही रोगांच्या जैविक नियंत्रणासाठी उपयोगी आहे. म्हणूनच ज्या ज्या ठिकाणी हलका पाऊस व त्याच बरोबर तापमानात हळूहळू होणारी वाढ अनुभवण्यास मिळेल, तिथे ट्रायकोडर्माचा वापर प्राधान्याने करावा..कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत झाडांची आंतरिक प्रतिकारशक्ती महत्त्वाची असते. सध्याच्या परिस्थितीत पोटॅशचे महत्त्व आहे. पोटॅशच्या कमतरतेमुळे पानांच्या वाट्या होण्याचा प्रकार याच काळात पाहायला मिळतो. पाऊस झाल्यानंतर लगेच पोटॅशची कमतरता वाढते. यासाठी पावसाची मोठी सर येऊन गेल्यानंतर लगेच पहिल्या फवारणीत पोटॅश (०:५२:३४) देणे महत्त्वाचे आहे. पोटॅशच्या फवारणीने भुरीचे बऱ्यापैकी नियंत्रण मिळते. विशेष म्हणजे त्याचा जैविक नियंत्रणामध्ये अजिबात अडथळा येत नाही..महत्त्वाच्या बाबीगुरुवार, शुक्रवारी (ता. ८ - ९) बागेची चांगली पाहणी करावी. बागेत किंवा जवळपासच्या बागेत ज्या रोगाची लक्षणे दिसत असल्यास त्या रोगाच्या नियंत्रणासाठी अनेक्श्चर ५ प्रमाणे योग्य बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. त्याद्वारे बागेतील रोगाचे इनॉक्युलूम नष्ट करण्याचा प्रयत्न करावा.रविवार - सोमवारी (ता. ११ -१२ ) भुरीचा धोका कमी करण्यासाठी सल्फर (८० डब्ल्यूडीजी) १.५ ग्रॅम अधिक कायटोसॅन २ मि.लि. प्रति लिटर प्रमाणे फवारणी घेता येईल.मंगळवारी (ता. १३) अंदाजाप्रमाणे पाऊस झालेला असल्यास ट्रायकोडर्माची फवारणी घ्यावी.बागेत पोटॅशची कमतरता दिसत असल्यास ०: ५२: ३४ दोन ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी.- डॉ. एस. डी. सावंत९३७१००८६४९(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.