तूट-सिंचनाने कमी पाण्यातही मिळवा शाश्‍वत उत्पादन

हवामान बदलाची त्यातही तापमान वाढीची तीव्रता जाणवत आहे. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे शेतीच्या पाणीपुरवठ्यामध्ये अनेक ठिकाणी घट होत आहे
Irrigation
Irrigationagrowon

हवामान बदलाची त्यातही तापमान वाढीची तीव्रता जाणवत आहे. शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे शेतीच्या पाणीपुरवठ्यामध्ये अनेक ठिकाणी घट होत आहे. विशेषतः आधीच पाण्याची टंचाई असलेल्या भागात याच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. आधीच महाराष्ट्रातील सुमारे ८०% पीक क्षेत्र हे कोरडवाहू (पावसावर अवलंबून) आहे. सिंचन क्षेत्रापैकीही सर्वाधिक क्षेत्र हे भूजलावर अवलंबून आहे. अशा वेळी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रचंड धडपड करावी लागत आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकामध्ये बदल करावा लागतो. कमी क्षेत्रावर लागवड करावी लागते किंवा त्या हंगामापुरती जमीन पडीक ठेवावी लागते. या साऱ्या अडचणींमध्ये तूट-सिंचन(Deficit Irrigation) पद्धत आधार देऊ शकते.

तूट-सिंचन म्हणजे काय?
तूट-सिंचन ही पाणी बचतीसाठीची सिंचन पद्धत असून, पूर्ण-सिंचनाच्या तुलनेत ५० टक्क्यांपर्यंत सिंचन (Irrigation)कमी करता येते. मात्र सिंचनात करावयाची घट ही पीकनिहाय वेगळी असून, पीकवाढीच्या अवस्थेनुसार बदलत जाते.
या सिंचन पद्धतीमध्ये दोन प्रकारचे धोरण राबवता येते.
१) पिकाच्या गरजेनुसार केवळ पाण्यासाठी संवेदनशील असलेल्या वाढीच्या अवस्थेत पाणी दिले जाते आणि इतर काळात त्याच्या गरजेपेक्षा थोडे कमी पाणी दिले जाते. अथवा
२) संपूर्ण वाढीच्या काळात पिकास पाणी हे त्याच्या गरजेपेक्षा थोडे कमी दिले जाते.

या दोन्ही धोरणांमुळे पाण्याची बचत होते. सोबतच सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याचा कार्यक्षम वापर होतो.
पीक उत्पादनामध्ये फारशी घट होत नाही किंवा झालीच तरी त्याचे प्रमाण खूप कमी राहते.
म्हणजेच योग्य वेळी सिंचनात घट केल्यास पिकाचे उत्पादन फारसे कमी न होता पिकास दिलेल्या पाण्याची उत्पादनक्षमता किंवा कार्यक्षमता ( Water Use Efficiency ) वाढते.
याउलट पूर्ण-सिंचन (Full-Irrigation) किंवा त्यापेक्षा अधिक पाणी देण्याच्या पद्धतीमुळे जमिनीमध्ये अतिरिक्त ओलावा राहतो. मुळांच्या क्षेत्रामध्ये अधिक काळ हवा खेळती राहत नाही. त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. सामान्य स्थितीपेक्षाही उत्पादन कमी येण्याचा धोका वाढतो.

साधारणतः तूट-सिंचन ही संकल्पना १९७०-७५ च्या सुमारास उदयास आली. मात्र बहुतांश पिकांच्या कृषी आणि आर्थिक विश्‍लेषण झालेले नव्हते. तसेच पायाभूत सुविधांच्या अभावी प्रत्यक्ष क्षेत्रावर तूट-सिंचनाची व्यावहारिकता तपासली गेलेली नव्हती. गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाची समस्या वाढत चालली आहे. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यावेळी असलेली पाणी उपलब्धता ५००० घनमीटर/प्रतिव्यक्ती/प्रतिवर्ष वरून कमी होत सध्या १५०० घनमीटर/प्रतिव्यक्ती/प्रतिवर्षपर्यंत आलेली दिसते. भविष्यात ती आणखी कमी होण्याच्या शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात येत आहेत.

ज्या भागामध्ये पाण्याची कमतरता आहे, अशा शुष्क आणि अर्ध-शुष्क भागांमध्ये तूट-सिंचन पद्धती अत्यंत उपयोगी ठरू शकते. तिचा अवलंब वाढवणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याच प्रमाणे ज्या भागामध्ये सिंचनाच्या सुविधा चांगल्या आहेत, अशा ठिकाणीही अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे जमिनी क्षारपड होण्याचा धोका वाढत आहे. हे सर्व अकार्यक्षम सिंचनाचा परिणाम आहे.

तूट-सिंचनाचे शास्त्रीय तत्त्व
१) बहुतांश पिकांच्या वाढीचे काही टप्पे हे पाण्याच्या ताणाला सहनशील असतात, तर काही अत्यंत संवेदनशील असतात. संवेदनशील अवस्थेमध्ये पाणी कमी पडल्यास त्याचा उत्पादनावर त्वरित परिणाम दिसून येतो. मात्र पाण्याच्या ताणाला सहनशील असलेल्या काळामध्ये पाण्याचे प्रमाण काही टक्क्यांनी कमी करणे नक्कीच शक्य असते.
२) तूट-सिंचनाद्वारे हंगामात पिकाच्या सुरुवातीला पाण्याची कमतरता
निर्माण केल्यास रोपे किंवा पीक तणावपूर्ण दुष्काळी वातावरणाशी जुळवून घेण्यास शिकतात. त्यामुळे वाढीच्या पुढील टप्प्यात पाणी थोडे कमी दिले किंवा पडले तरी अशा दुष्काळी स्‍थितीचा सामना करण्यासाठी पीक अधिक सक्षम होते.
३) सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अनुत्पादक बाष्पीभवनाने होणारी पाण्याची हानी कमी करणे शक्य असते. त्यासाठी सूक्ष्मसिंचन पद्धती आणि आच्छादन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते. उदा. ठिबक आणि तुषार सिंचन.
४) सध्या पीकनिहाय पाण्यास संवेदनशील असलेल्या अवस्थांविषयी बरीच माहिती उपलब्ध होते. त्याचा शेतीत योग्य वापर होताना दिसत नाही. त्याचा योग्य वापर केल्यास सर्व पिकांमध्ये या पद्धतीचा वापर शक्य आहे. स्थानिक पातळीवर अधिक संशोधनाची आवश्यकता आहे. तशा शिफारशी उपलब्ध होण्याची गरज आहे.

कोणत्या पिकामध्ये यशस्वी ठरले आहे?
-द्राक्ष, आंबा, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सफरचंद आणि लिंबूवर्गीय अशा फळपिकांमध्ये तूट सिंचनाचा योग्य पद्धतीने अवलंब केल्यास उत्पादनामध्ये घट होत नसल्याचे राज्यातील कृषी विद्यापीठे व संस्थानी केलेल्या प्रयोगात दिसून आले आहे. उलट त्यामुळे पाणी वापर कार्यक्षमता वाढू शकते.
-कपाशीसाठी सिंचनाच्या पाण्याचा वापर एकूण गरजेच्या ४० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे. अर्थात, यात उत्पादनात थोडीशी घट येते.
-कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांचे पीक उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी किंवा घट कमी करण्यासाठी तूट-सिंचन पद्धतीचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे.


Irrigation
अमृत सरोवर अभियानातून पाझर तलाव होणार गाळमुक्त

फायदे :
-सामान्यतः पुरेशा कापणीयोग्य गुणवत्तेसह, पाण्याची उत्पादकता वाढवते.
-पूर्ण-सिंचनाच्या तुलनेत उच्च आर्द्रतेमुळे होणाऱ्या काही रोगांचा धोका कमी होतो. (उदा. बुरशी)
-तूट-सिंचनामुळे पिकांच्या मुळाच्या क्षेत्रातून होणारा अतिरिक्त पाणी निचरा कमी होते. परिणामी, पोषक तत्त्वांचा निचरा होण्याची शक्यता कमी होते. यामुळे भूजलाची गुणवत्ता चांगली राहण्यास मदत होते.
-तूट-सिंचनामुळे माती खराब होण्याची शक्यता कमी आणि नकारात्मक हवामान बदल प्रभाव कमी होतो.
- केवळ कोरडवाहू लागवडीच्या तुलनेत स्थिर उत्पादनाची खात्री मिळते.
- या पद्धतीमुळे वाचलेल्या पाण्यातून थोडी अधिक जमीन ओलिताखाली आणता येते.

अडथळे :
-या पद्धतीच्या वापरासाठी पाण्याच्या ताणासाठी पिकाचा नेमका प्रतिसाद किंवा अचूक ज्ञान गरजेचे असते.
-पिकासाठी पाण्याची किमान मात्रा दिली पाहिजे, ज्याच्या खाली तूट-सिंचनाचा लक्षणीय फायदेशीर परिणाम होत नाही.
- पाण्याचा अचूक व कार्यक्षम वापर होत असल्यामुळे जमीन क्षारपड होण्याचा धोका टाळता येतो.
-ज्यांच्याकडे जल संधारण अथवा शेततळ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सोय आहे, त्यांना पिकांचे शाश्‍वत उत्पादन मिळवता येईल.

डॉ. अरुण भगत, ७३८७१२६८९१
(वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com