ॲग्रोवन वृत्तसेवा
Crop Insurance Scheme : अकोला ः नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर पाऊस झाल्याने इतर पिकांसह कपाशीचेही अतोनात नुकसान झाले होते. कृषी खात्याने या नुकसानीची आकडेवारी शासनाला कळवली. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी विमा कंपनीला पूर्वसूचना देत नुकसानाबाबत कळवले होते.
मात्र, ही सूचना देताना कापणी पश्चात असा पर्याय निवडल्याने विमा कंपनीने नियमावर बोट ठेवत अनेक शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना नामंजूर केल्या आहेत. त्यामुळे आता महिना लोटला तरी विमा कंपन्यांचे प्रतिनिधी सर्वेक्षणासाठी असंख्य शेतकऱ्यांच्या बांधावर पोचलेले नाहीत.
नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली होती.
या वेळी वादळी वारा, जोराचा पाऊस झाल्याने शेतांमध्ये उभे असलेले कपाशीचे पीक नुकसानग्रस्त झाले होते. प्रामुख्याने त्या काळात वेचणीचा हंगाम जोरावर सुरू होता. हजारो क्विंटल कापूस या पावसात तीन दिवस भिजला.
काही ठिकाणी कापसाच्या बोंडातून कोंबही निघाले. हा कापूस पिवळसर झाला. या आपत्तीबाबत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तत्काळ विमा कंपन्यांना पूर्वसूचना दिल्या आहेत. ही सूचना देताना काही शेतकऱ्यांकडून चुकीने पोस्ट हार्वेस्टींग असा पर्याय निवडल्या गेला होता.
एखादे पीक काढणीनंतर वाळवत असताना झालेले नुकसान या पर्यायात समाविष्ट आहे. मात्र, कापूस पिकाला वेचणी करून वाळवण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे हा पर्याय निवडलेल्यांना कंपन्यांनी पूर्वसूचना नामंजुरीचे संदेश पाठवले. परिणामी कापूस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
या घटनेला महिना लोटला तरी विमा कंपन्यांकडून तातडीने पाऊले न उचलल्याने सर्वेक्षणाला मुहूर्त सापडलेला नाही. अकोला जिल्ह्यात मध्यंतरी शेतकऱ्यांनी आंदोलन करीत अकोटमध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही पाठवले.
जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याला सूचना करीत विमा कंपनीला यामध्ये मार्ग काढण्याचा सांगितले. त्यावरून जिल्हा अधीक्षक कार्यालयानेही विमा कंपनीला निर्देश देत ही पोस्ट हार्वेस्टींग प्रकारात आलेल्या पूर्वसूचना या एलसी प्रकारात समाविष्ट कराव्यात, असे सूचवलेले आहे.
त्यावर काय कार्यवाही झाली याचा तपशिल मिळू शकलेला नाही. सर्वेक्षणाचे काम पुढे जाऊ शकलेले नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. वाशीम जिल्ह्यातही बऱ्याच शेतकऱ्यांना या पोस्ट हार्वेस्टिंग पर्याय निवडीचा फटका बसलेला आहे.
‘पिकाशी निगडीत पर्याय हवे’
कृषी विभागाकडून कपाशीचे पंचनामे झालेले आहेत. पण पीकविमा कंपनीला तक्रार करून आज एक महिना लोटूनसुद्धा विमा कंपनीचे प्रतिनिधी कपाशीचा सर्व्हे करायला आलेला नाही. विमा कंपनी प्रतिनिधीला विचारले असता पूर्वसूचना देताना चुकीचे ऑप्शन निवडले असल्याने सर्वेक्षणासाठी वरिष्ठ स्तरावरून नावे आमच्याकडे आलेली नाहीत.
त्यामुळे आम्ही सर्व्हे करायला प्रतिनिधी पाठवू शकत नाही. मुळात कपाशी पिकाची ऑनलाइन तक्रार करताना त्यामध्ये कपाशी पिकाशी निगडीत पर्याय द्यायला पाहिजे होते. शेतकरी ऑनलाइन तक्रार करतो त्यावेळेस त्यामध्ये पूर्ण पर्याय दिल्या जातात आणि सर्व शेतकऱ्यांना ते कळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चुका झालेल्या आहेत, असे सुदी (जि. वाशीम) येथील शेतकरी विनोद भोयर यांनी सांगितले.
ऑनलाइन तक्रार करताना जर शेतकऱ्यांकडून चुकीची माहिती भरल्या गेली असेल तर पीकविमा कंपनीने २४ तासांच्या आत त्या शेतकऱ्याला संदेश देत कळवणे गरजेचे होते. नुकसान झाल्यानंतर ७२ तासांची मुदत दिली आहे.
पीकविमा कंपनीला सुद्धा वेळेचे बंधन असायला पाहिजे. आज आम्हाला कपाशी काढून उन्हाळी मूग आणि भुईमूग लावायचा आहे. मी ते पीक काढू शकत नाही. शासनाने व कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
-विनोद भोयर, शेतकरी, सुदी, जि. वाशीम
ऑनलाइन तक्रार करताना जर शेतकऱ्यांकडून चुकीची माहिती भरल्या गेली असेल तर पीकविमा कंपनीने २४ तासांच्या आत त्या शेतकऱ्याला संदेश देत कळवणे गरजेचे होते. नुकसान झाल्यानंतर ७२ तासांची मुदत दिली आहे. पीकविमा कंपनीला सुद्धा वेळेचे बंधन असायला पाहिजे. आज आम्हाला कपाशी काढून उन्हाळी मूग आणि भुईमूग लावायचा आहे. मी ते पीक काढू शकत नाही. शासनाने व कृषी विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे.
-विनोद भोयर, शेतकरी, सुदी, जि. वाशीम
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.