
Palghar News : वाणगाव : पालघर जिल्ह्यामधील डहाणू, घोलवड या भागातील चिकू फळाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जिल्ह्यातील चिकू बागायतदार आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करतो. वातावरण बदलामुळे चिकू पिकाची अवस्था आणि हवामान लक्षात घेता चिकू पिकामध्ये बी पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृषी विभाग, कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्राला वेळोवेळी भेटी देऊन जागृती करीत आहेत.
साधारणतः ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीमध्ये बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो. ऐन फळधारणेच्या अवस्थेमध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाला तर कीडग्रस्त फळांची गुणवत्ता खालावते आणि मोठ्या नुकसानीस तोंड द्यावे लागते. किडीचा प्रादुर्भाव वर्षभर आढळून येतो; परंतु ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान तीव्रता जास्त असते. जानेवारीनंतर या किडीचा प्रादुर्भाव कमी होत जातो; परंतु पुढे मार्च, एप्रिलमध्ये पुन्हा या किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. हे नुकसान टाळण्यासाठी जिल्ह्यातील चिकू बागायतदारांनी आपल्या बागेचे फळातील बी पोखरणाऱ्या अळीपासून संरक्षण करावे, असे कृषी संशोधन केंद्र, पालघर येथील कीटकशास्त्रज्ञ डॉ. एल. के. गभाले यांनी सांगितले आहे.
सरंबळवाडीमध्ये शेतकरी मेळावा
फळे लिंबाच्या आकाराची असताना पहिली फवारणी करावी आणि त्यानंतर मुख्य पीक हंगामाच्या वेळेस १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. डेल्टामेथ्रीन २.८ ई.सी. एक मिली प्रति लिटर किंवा प्रोफेनोफॉस ४० ई.सी. एक मिली प्रति लिटर किंवा लॅमडा सायहॅलोथरीन १.५ मिली प्रति लिटर किंवा प्रोफेनोफोस ५० इ.सी. १.५ मिली प्रति लिटर किंवा बी.टी. एक मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून एका महिन्याच्या अंतराने फवारणी करावी.
अळी नियंत्रणासाठी बागेची स्वच्छता राखून झाडांची योग्य छाटणी करून बागेत पुरेसा सूर्यप्रकाश येईल, असे पाहावे. चिकू बागेतील प्रादुर्भावग्रस्त पालापाचोळा व चिकूचे अवशेष, बंद हंगामात आलेली पक्व फळे गोळा करून नष्ट करावीत. बागेमध्ये निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
- डॉ. एल. के. गभाले, कीटकशास्त्रज्ञ
अळीच्या प्रादुर्भावाची प्रमुख कारणे
एकमेकांत मिसळलेल्या
जुन्या फांद्या.
घनदाट बागेमुळे पुरेसा सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचू शकत नाही.
बागेची वेळोवेळी
स्वच्छता न राखणे.
बागेमध्ये योग्य अंतरमशागत, फवारणीची कामे होत नाहीत.
बागेमध्ये खोल नांगरणी आणि इतर नांगरणीची कामे वेळोवेळी होत नाहीत.
अशी करा अळीवर मात
चिकू बागेतील प्रादुर्भावग्रस्त पालापाचोळा व चिकूचे
अवशेष जागोजागी ढीग
करून नष्ट करावेत.
फळांची काढणी झाल्यानंतर बंद हंगामात आलेली पक्व फळे गोळा करून नष्ट करावी.
हंगामात बागेमध्ये निळ्या रंगाच्या प्रकाश सापळ्यांचा वापर करावा.
निसर्गात आढळणारे परजीवी आणि परभक्षी मित्र कीटक संवर्धन करावे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.