
बोर्डी : कोरोना संक्रमणाच्या (Corona Virus) निर्बंधांमुळे दोन वर्ष डहाणूतील प्रसिद्ध चिकू महोत्सवात खंड पडला होता. पण कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्याने तसेच सामाजिक निर्बंध कमी केल्याने यंदा बोर्डीत मोठ्या दिमाखात चिकू महोत्सव पार पडणार आहे.
यंदाचा चिकू महोत्सव १८ व १९ फेब्रुवारी असे दोन दिवस बोर्डी येथील समुद्रकिनारी आयोजित करण्यात येणार आहे.
स्थानिक पर्यटनाला (Tourist) चालना मिळावी, तसेच बोर्डी परिसरातील चिकू उत्पादकांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे या चिकू महोत्सवात खंड पडला होता.
पण कोरोना नियंत्रणात आल्यानंतर निर्बंध मागे घेण्यात आल्याने यंदा या चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा महोत्सव बोर्डी येथील समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या एस. आर. सावे कॅपींग ग्राऊंड येथे १८ व १९ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
रूरल एंटरप्रेनर वेल्फेअर फाउंडेशन, विविध स्थानिक संस्थांच्या सहकार्याने बोर्डी येथे नवव्या चिकू महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ या संकल्पनेवर महोत्सवामधील सजावट केली जाणार आहे.
यामध्ये स्थानिक उत्पादने, कलाविष्कार यांना ‘वोकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर उपक्रमांवर प्राधान्य देण्यात येणार आहे.
तसेच स्थानिक शेतकरी व बागायतदारांसाठी कृषी प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या सोबतीने या महोत्सवात स्थानिक कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात आदिवासी चित्रकला, मातीची भांडी बनवणे, टोपल्या व नारळाच्या झावळ्या विणणे, हस्तकला, व्यंगचित्र बनवणे इत्यादी कार्यशाळांचा समावेश आहे.
या महोत्सवात कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा समावेश असून लहान मुलांसाठी पपेट शो, मेट्रो मॅजिक व इतर कार्यक्रमांचा समावेश आहे.
या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच महोत्सवाचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन महोत्सवाच्या जनसंपर्क अधिकारी दीप्ती राऊत यांनी केले.
‘चिकू पॅवेलियन’ कट्टा
विशेष म्हणजे या फेस्टिवलमध्ये चिकू फळ व त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनांच्या विक्रीसाठी व प्रदर्शनासाठी ‘चिकू पॅवेलियन’ असा विशेष कट्टा थाटण्यात येणार आहे.
खवय्यांसाठी पर्वणी
दोन दिवसाच्या या महोत्सवामध्ये स्थानिक खाद्यसंस्कृतीला चालना देणारे स्टॉल मांडले जाणार आहेत. यात शाकाहारी आणि मांसाहारी असे विविध प्रकारचे खाद्य पदार्थ असणार असून ते खवय्यांसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.