
Thane News : किन्हवली : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. रासायनिक खतनिर्मिती करणाऱ्या कंपनीने ठाणे जिल्ह्यासाठी युरिया, सुफला या खतांचा पुरवठा दोन महिन्यांपासून बंद केला आहे. त्यातच सध्या वारंवार बदलत्या हवामानामुळे रोपांची विकास क्षमता कमी होत आहे. योग्य वेळी खते न मिळाल्यास रब्बी हंगामातील उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाणे जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ तालुक्यांतील ग्रामीण भागात ऑक्टोबरपासून रब्बी हंगाम जोरात सुरू झाला आहे. रब्बी पिकाची लागवड केलेले शेतकरी खतविक्री केंद्रात दररोज हेलपाटे मारत आहेत, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून खतेच मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंपनीने खतपुरवठा करावा, यासाठी ठाणे ॲग्रो डिलर असोसिएशनने आरसीएफ कंपनीच्या कोकण विभागीय व्यवस्थापनाला पत्रव्यवहार केला आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानेसुद्धा याबाबत गंभीर दखल घेत त्वरित खतपुरवठा सुरू करा, अन्यथा शेतकरी वर्गात उद्रेक निर्माण होण्याची शक्यता असल्याचे खरमरीत पत्र लिहित लवकर खतपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
रासायनिक खते उत्पादन करणाऱ्या कंपनीने ठाणे जिल्ह्यात खतपुरवठा बंद केला असला तरी पालघर जिल्ह्यात मात्र पुरवठा नियमित सुरू आहे. ठाण्यातील शेतकऱ्यांसाठीसुद्धा खतपुरवठा सुरू करावा, म्हणून ठाणे ॲग्रो डिलर असोसिएशनने आरसीएफच्या कोकण विभागीय व्यवस्थापनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
प्रशासनाकडून कंपनीला पत्र
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विनाविलंब खतपुरवठा सुरू करावा, अन्यथा शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होण्याची शक्यता आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आरसीएफ कंपनी व्यवस्थापनच त्याला जबाबदार असेल, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरमरीत भाषेत कंपनीला पत्र लिहिले आहे. ठाणे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक यांच्या कार्यालयाला पत्र दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.
आरसीएफ कंपनीच्या व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, खत वाहतूक यंत्रणेत तांत्रिक अडचणी होत्या. आता दोन-चार दिवसांत ठाणे ग्रामीण भागात खतपुरवठा सुरू करण्यात येईल.
- रामेश्वर पाछे, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.