Fish Production : रायगड जिल्ह्यात मत्स्य उत्पादनात घट बदलते हवामान, वादळ, प्रदूषणाचा परिणाम; उपाययोजना तोकड्या

Fish Production : मत्स्यव्यवसाय उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात, पावसाळ्यात प्रजनन काळात मासेमारी बंद असते. तरी वर्षभरात ८१ हजार टनाने घट झाली आहे.
Fish Rate
Fish RateAgrowon
Published on
Updated on


Aalibag News : अलिबाग : मत्स्यव्यवसाय उत्पादनात वाढ होण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जातात, पावसाळ्यात प्रजनन काळात मासेमारी बंद असते. तरी वर्षभरात ८१ हजार टनाने घट झाली आहे. याचा परिणाम मच्छीमारांच्या आर्थिक उत्पन्नावर होत असून २०२४-२५ या वर्षातही  मत्‍स्‍य उत्‍पादन कमी होण्याची भीती जिल्ह्यातील मच्छीमारांना सतावत  आहे.

खोल समुद्रात जाऊनही मासे मिळत नसल्याने जीवना बंदर, आगरदांडा, एकदरा, साखर-आक्षी, बोडणी बंदरात काही दिवसांपासून अनेक नौका नांगरून ठेवल्‍या आहेत. मासेमारीला गेल्यानंतर होणारा खर्चही निघत नाही. वाढलेले इंधनाचे दर, भरमसाठ मजुरी आणि बोटींच्या डागडुजीसाठी होणाऱ्या खर्चात मच्छीमारही कर्जबाजारी होत आहेत.

Fish Rate
Fish Production : सुधारित मत्स्य प्रजाती उत्पादनवाढीसाठी फायदेशीर

शेतीबरोबरच मासेमारी करूनही उदरनिर्वाह होत नसल्‍याने अनेक मच्छीमारांनी  पारंपरिक व्यवसाय बाजूला ठेवून अन्य क्षेत्र निवडले. याचा परिणाम कोकणातील  मासेमारीच्या टक्केवारीवर होत आहे.

रायगडात २८ हजार टन उत्‍पादन
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात वर्षभरात ४९ हजार मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले. मुंबई उपनगरात ६१ हजार टन, मुंबईमध्ये सर्वाधिक एक लाख ३८ हजार   टन, रायगड जिल्ह्यात २८ हजार  टन, रत्नागिरीत ६९ हजार टन तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ हजार ९७६ टन मत्स्य उत्पादन झाल्याचा अहवाल मत्स्यव्यवसाय विभागाने प्रसिद्ध केलेला आहे. या जिल्ह्यांमध्येही मासेमारी कमी होत आहे. किनारी भागातील अर्थव्यवस्था ही मासेमारीवर अवलंबून असल्याने त्याचा परिणाम लोकजीवनावरही होत असल्याचे दिसून येत आहे.

घटत्या उत्पादनाची कारणे
मत्स्य उत्पादन घटण्यामागे नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत.  हवामानात बदल, किनारपट्टीवर येणारी वादळे आणि प्रदूषण या घटकांचा समावेश आहे, तर मानवनिर्मित कारणांमध्ये अनियंत्रित आणि बेसुमार मासेमारी, परप्रांतीय नौकांकडून राज्याच्या सागरी हद्दीत केली जाणारी मासेमारी, एलईडी दिव्यांच्या साह्याने पर्ससीन नेटच्या वापरामुळे मासेमारीवर परिणाम होतो.  वादळात समुद्र खवळतो. मासे खोल समुद्रात निघून जातात, त्यामुळे किनारपट्टीवरील भागात मासे मिळण्याचे प्रमाण कमी होते.

राबविण्यात आलेल्या उपाययोजना
  सागरी मत्स्यव्यवसाय समित्यांची स्थापना, स्वच्छ सागर, निर्मळ सागर
  समुद्री शेवाळ, कालवे, शिंपल्यांचे पालन,  समुद्रामध्ये पिंजऱ्यातील मत्स्यपालन
  समुद्रीकिनारी मत्स्य पर्यटन विकास,  समुद्रात प्लॅस्टिक निर्मूलन मोहीम
  शाश्वत मासेमारी व उपजीविकेसंदर्भात जनजागृती
  संरक्षित दुर्मिळ सागरी प्रजातींची जनजागृती, मॉन्सूनमधील मासेमारी बंदीची जनजागृती
  मासेमारी अधिनियमांची काटेकोर अंमलबजावणी

किनारपट्टी प्रदूषणाच्या विळख्यात
कोकण किनारपट्टीवर २५ वर्षांपूर्वी जेवढे मासे मिळत होते तेवढे  आता मिळत नाहीत. त्यासाठी खोल समुद्रात मासेमारीसाठी जावे लागते. तीन दशकांत कोकणात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या. ज्यातील बहुतांश वसाहतींमध्ये रासायनिक कंपन्यांचा समावेश आहे. रसायनी, तळोजा, पाताळगंगा, नागोठणे, रोहा, महाड, लोटे, अलिबाग परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या उभारल्या गेल्या. ज्यांचे सांडपाणी प्रक्रिया करून समुद्रात, नदीत आणि खाड्यांमध्ये सोडले गेले, त्यामुळे किनारपट्टीवरील पाणी प्रदूषित होत गेले.
मत्स्य उत्पादन कमी होण्यामागील नैसर्गिक कारणांबरोबरच मानवनिर्मित कारणेही तितकीच परिणामकारक आहेत. मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी योजना राबवल्या जातात, परंतु यात लोकसहभागही महत्त्वाचा असून योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे.
- संजय पाटील, सहउपायुक्त,
मत्स्यव्यवसाय विभाग, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com