
टीम ॲग्रोवन
पुणे : प्रसन्न वातावरणात ‘ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स ॲवॉर्डस’ (Agrowan Business Excellence Awards) चा सोहळा मंगळवारी (ता.१३) उत्साहात पार पडला. या वेळी रोपवाटिका व्यावसायिकांचे (नर्सरी) जणू छोटेखानी स्नेहसंमेलनच भरल्याचा भास होत होता. व्यवसाय वाढीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चाही रंगली होती.
राज्यभरातील नर्सरी व्यवसायिक आपले नातेवाईक, हितचिंतक, मित्रपरिवार यांच्यासह सायंकाळी सुरेल संगीताच्या वातावरणात भारलेल्या कार्यक्रम स्थळी दाखल झाले. त्या वेळी ‘ॲग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या यशोगाथांचे अंक ते नातेवाइकांना आवर्जून दाखवत होते.
कार्यक्रम स्थळावरील क्षण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होते. महेश गायकवाड यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला बहार आणली. नर्सरी व्यवसायिकांना प्रोत्साहन देणारी त्यांची मैफिल प्रमुख आकर्षण ठरले. त्यांनी ॲग्रोवनच्या आजवरच्या प्रवासात शेतकऱ्यांविषयी केलेल्या विस्तार कार्याचा उल्लेख केला. ढोल- ताशा वाद्यांच्या गजरात सम्नानचिन्ह व ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध यशोगाथेची फ्रेम या स्वरूपात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. यशस्वी व्यावसायिकांनी या वेळी स्वअनुभव सांगून इतरांना प्रेरणा दिली. टाळ्यांच्या कडकडाटासह त्यास प्रतिसाद मिळाला. राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड, कृषी विभागाच्या फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांचे मार्गदर्शन उपस्थितांसाठी मोलाचे ठरले.
ॲग्रोवनचे संचालक- संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्तविकामध्ये ॲग्रोवनची ध्येयधोरणे व वाटचालीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना पुढे नेण्याचे काम ॲग्रोवन करीत असल्याचे ते म्हणाले. नर्सरी उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर नक्कीच मदत करतील असे आश्वासन देत फलोत्पादनाला वेग देण्यासाठी प्रश्न सुटले पाहिजे असे मतही त्यांनी मांडले.
मोते यांनी फलोत्पादन विभागाकडून केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. भाजीपाला, फुलशेती, फळबागाच्या नर्सरीचे मापदंड, नियमांमधील बदल व संरक्षण शेतीसाठी आवश्यक ‘नर्सरी’साठी निधी या मुद्यांचे मुद्देसूद विश्लेषण केले. कार्यक्रमाच्या समारोपानंतर नर्सरीधारकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शेखर गायकवाड यांनीही शेतकऱ्यांच्या जीवनात नर्सरीइतकेच ऊस शेतीचे महत्त्व विषद केले.
राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांचे प्रयोग राज्यभर पोहोचविण्याचे काम ॲग्रोवनने केले असल्याचा उल्लेख त्यांनी केला. बाळासाहेब खवले यांनी पुरस्कारार्थीचे आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.