
Chh. Sambhajinagar News : पाणी व्यवस्थापन, सिंचनाचे निकष, वॉटर ऑडिट या संकल्पनांवर काम करण्याची गरज आहे. सिंचनाचे नवे तंत्र आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून, आहे त्या पाण्याचा अधिक व प्रभावी वापर करण्याविषयी आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले पाहिजे, असे मत राज्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे पारितोषिक वितरण डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २३) पार पडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला. त्या वेळी डॉ. पाटील बोलत होते.
या वेळी कार्यकारी संचालक, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ संतोष तिरमनवार, मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, मुख्य अभियंता लाभ क्षेत्र विकास जयंत गवळी, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता इलियास चिस्ती, अधीक्षक अभियंता पल्लवी जगताप, अजय दाभाडे, भारत शिंगाडे यांची उपस्थिती होती.
ते म्हणाले, की राज्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण होण्याची कालमर्यादानिहाय आपण नियोजन केले पाहिजे. पाण्याच्या गळतीसारख्या बाबींवर नियंत्रण मिळवले पाहिजे. जलसंपदा विभागामध्ये प्रचंड क्षमता आहे. आपल्या विभागाच्या क्षमतेचा पुरेपूर वापर केल्यास महाराष्ट्र दुष्काळमुक्त करता येईल.
हा विभाग महाराष्ट्राला जलसमृद्ध करून शेतकऱ्याला सुखी आणि महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू शकतो. त्यासाठी आपण साऱ्यांनी एकजुटीने काम करावे. विभागाच्या कर्मचारी अधिकाऱ्यांचा ताण तणाव निवळावा यासाठी अशा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे.
ताणतणावात काम केल्याने विकासाच्या प्रक्रिया मंदावतात. त्यासाठी परस्पर संवाद वाढविणे आवश्यक आहे. हा संवाद वाढविण्यात अशा सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांचे मोठे योगदान असते, असेही जलसंपदामंत्री डॉ. पाटील म्हणाले.
डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांना मानद डॉक्टरेट पदवी मिळाली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविणा कन्नडकर यांनी केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.