Indian Agriculture : आनंद भरला आपल्या घरी...

शेतकऱ्यांकडे शेतातील कामे सोडून बाकी जगभरातील फालतू गोष्टींसाठी रिकामा वेळ नसल्यामुळे तो त्याच्या मेंदूचा योग्य वापर करून आनंदी राहत असतो. याउलट एरंडाच्या गुऱ्हाळात गुरफटलेले आनंदाच्या भरकटणाऱ्या मार्गाने जाणारेही अनेक आहेत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Indian Agriculture ‘आनंद भरला आपल्या घरी, तू का फिरशी बाजारी?’ असे उद्‍बोधक संत वचन आहे. पण आपला मेंदू संथ ठेवून जगणाऱ्यांची संख्या आता जास्त होताना प्रकर्षाने जाणवते आणि दिसतेही. मोबाईलमध्ये तासन् तास मुखदर्शक रेंगाळताना दिसतात. पण बाजूला असणाऱ्याला ते शब्दानेही बोलणार नाहीत.

‘जग लई बिघडले हो!’ असा दांभिकपणा सांगत सुटणार. मग ताण मनावर आणि शरीरावर आपसूक येणारच की! याचा उलगडा होण्यासाठी ते बाबा - बुवांकडे पळापळी करणार. शरीर - मन आपले, मेंदू गहाण ठेवून त्यांचे ऐकणे म्हणजे हा शाब्दिक हिंसा स्विकारण्याचाच प्रकार आहे.

शेतकरी अशा प्रकारापासून चार हात लांब असल्यामुळे आणि त्याच्यावर शेतातील कामे (Agriculture Work) सोडून बाकी गोष्टींसाठी रिकामा वेळ नसल्यामुळे तो त्याच्या मेंदूचा योग्य वापर करून आनंदी राहत असतो.

मला एक नोकरदार मित्र फोन करून म्णाला, की चल, त्र्यंबकेश्‍वरला माळावर चढ-उतरणीचा खेळ खेळायला! मी म्हटले, ‘‘मी दररोज माझ्या शेतात कामे करत फिरतो. न चुकता जनावरांना चारा टाकतो, पाणी पाजतो. आईचे चमकुऱ्याचे पानं बिटात नेऊन टाकतो. मांजरीच्या पिलांना चपाती-भाकरी व दूध खाऊ घालतो.

कुत्र्याला मांसाहार टाकतो. गड्या सोबत रानातले उपटतण उपटतो. विहिरीचे ताजे पाणी पितो. विहिरीतील माशांना सोयाबीन - शेंगदाणे खायला टाकून त्यांचे सूर, महासूर मारणे आनंदाने पाहतो. बोरं, हुरडा, सीताफळ (Custard Apple), रामफळ, पेरू (Guava), हुळा, भाजीपाला (Vegetable), पपई, काळा चहा आणि शिळी भाकरी व ठेचा खातो.

Indian Agriculture
Farmer Company : विभागीय कृषी सहसंचालकांकडून शेतकरी कंपनीचा आढावा

या सरळ - सरळ आणि साध्या व सोप्या जगण्यातच मला आनंद वाटतो. पूर्वी मी माझ्या शेतातला गाजर गोंडा उपटताना माझे शेजारी असलेले आणि आताही खासदार असलेले मित्र बंडू बॉस आणि माजी कृषी राज्यमंत्री सुरेशराव वरपूडकर म्हणायचे, ‘गुरुजीने हे काम करणे बरं दिसतंय का?’ आता मात्र माझा मुलगा इंजिनिअर व मुलगी परदेशात एमबीबीएस होत आहे हे पाहून ते म्हणतात, ‘तू आता तर वावर कसायचे सोडणार नाहीस. डॉक्टर आणि इंजिनिअरचा तू बाप. त्यालाच पहिल्यापासून आनंद मानत आलास.’’’

एवढे बोलून मी मित्राला म्हणालो, की तू प्रत्येकी पाच हजार रुपये भरून पत्नी, सासू आणि मेव्हणा व त्याची बायको तुम्हा सर्वांचे २५ हजार रुपये भरून आणि परत कारचे पेट्रोलचे पैसे खर्च करून तीन दिवस माळावर फिरून चढणार आणि उतरणार.

महाराज सांगतो म्हणून हिरवा भाजीपाला खाणार आणि आनंद विकत घेणार? माझ्या या प्रश्‍नाने तो सरकला आणि चरकलाही. पण तिकडे जाऊन आलाच. खरंच, अशी तकलादू माणसं शाश्‍वत आनंदाचा झरा स्वतः निर्माण करू शकतील का? जगण्यातले आभासीपण त्यांना खरे वाटू लागते. गोड बोलणारे चाटू त्यांना चटकदार वाटतात.

निसर्गापासून पळ काढणारे, स्वतःच्या वावरात काम न करणारे, आल्हाददायक जीवन जगण्याचे नाटक करून माणसांपासून फटकून वागणारे, मायबापाच्या आजारपणाला आर्थिक सहकार्य न करणारे हे ‘साहेब’ अपवाद म्हणून सोडले, तर हेच माणूसपणाचा आनंद घेत असतील का?

शेतकरी पहाटं उठतो. आखाड्यावर झाडझूड करतो. लगेच जनावरांना चारा टाकून दुधाच्या धारा काढतो. असल्या तर, रानभाज्या व भाजीपाला घेतो. हरभऱ्याचा घोळाणा करण्यासाठी शेंडे खुडून घेतो.

करडई - मेथीची भाजीच उपटून घेतो अन् सकाळ, दुपारच्या भाकरीची-भाजीची सोय करतो. चांगले दूध, सकस भाजीपाला, चवदार ज्वारी, गहू आणि पौष्टिक डाळदाणा खाऊन तो कष्ट करून जगतो. दिवसभर खाली-वर वाकणं हीच त्याची योगासनं असतात.

न कुठला व्यायाम, ना कुठे ट्रेकिंग. त्याचा रामप्रहरापासून सूर्यनारायण निघेपर्यंत सगळा घाम अंगातून निघून मोकळा होतो. काबाडकष्टांचा सुगंध मातीला आणि शेतकऱ्याला आनंद देत असतो.

या उलट शहरात चालताना - बसताना- जेवतानाही मोबाइल सोबतच असतोच. अदानीने देश कर्जात लोटला का? ‘भारत जोडो’ने काय साध्य केले? अशा एरंडाच्या गुऱ्हाळापेक्षा खेड्यातील शेतकरी आपल्या सोयाबीन, कापूस, हरभरा, राजमा, तीळ, ज्वारी, गहू, मूग, उडीद, तूर, केळी, हळद, ऊस, तंबाखू , फुले - फळे, भाजीपाला, दुधाला आणि तुपाला आजचा भाव किती लागला? हे वस्तुनिष्ठ जगणे हा त्यांचा स्थायिभाव असतो.

सध्या खेड्यातही खासकरून तरुण वर्गात मोबाइल वापरण्यांची संख्या वाढली असून, तेही त्याच आनंदाच्या भरकटलेल्या मार्गाने जात आहेत. जे पीक आले ते आले, जे कमी प्राप्त झाले त्यात सुधारणा करून पुढच्या पिकांचा हंगाम चांगला घेण्याच्या नादात तो कष्टात बुडतो.

पंडित आणि विद्वान चर्चेच्या फेरीत, ब्लॅक टी की ग्रीन टी यामध्ये अडकून सकाळी दुधाचा चहा पिऊन रात्रीला ‘दोन घोटाच्या’ विचारात गुंतलेले असतात. इन्कम टॅक्स लागला म्हणून कुढत राहतात. महागाई भत्ता वाढून काही उरत नाही, हे त्याच्या नंतर लक्षात येते.

शेतकऱ्यांनी हिशेब लावले, तर जग जागीच थंडगार होईल. पण ‘डोकं शांत ठेवून तोच शेती करतो.’ हा त्याचा कमीपणा नाही. पण ‘जगाचा पोशिंदा’ हा भार जाणून तो कष्टतो. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्यावर अवघे जग जगते.

Indian Agriculture
Milk Processing : दूग्ध उत्पादन, प्रक्रिया विषयावर ‘केव्हीके’च्या पुढाकाराने प्रशिक्षण

शेषाच्या फण्यावर पृथ्वी तरली नाही, तर शेतकऱ्याच्या जिवावर जगाचा जीव जगतो. भाकर इमानदारपणा जपते. हे जगाला कळते पण दुसरे कोणी लुटू देत नाही म्हणून व्यवस्था शेतकऱ्यांना लुटते.

‘सबका साथ, सबका विकास’ देशाचे पंतप्रधान सांगतात. पण ‘अदानी का विकास, लपटा गया देश का विकास’ हे देशाचे आजचे चित्र आहे.

मध्यमवर्गीय घोड्यांना दाणापाणी आणि उद्योगपतींना बँक पाणी देऊन कृषिप्रधान भारत देशात शेतकऱ्यांचा आनंद व समाधान बरबाद करणारे असे लोक टाळलेले बरे! कारण तेही कही आनंद देणारे नाहीत.

चंगळवाद म्हणजे आनंद नव्हे, हे असे आनंदाचे बनिया आनंद विकणारे आणि विकत घेणारे देशाला काय देणार?

अरुण चव्हाळ, ७७७५८४१४२४, (लेखक रानमेवा शेती साहित्य मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com