

Alibag News : अलिबाग : बांधकाम क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा फटका वीटभट्टी व्यावसायिकांना बसत आहे. मातीच्या विटांऐवजी आता चिरांच्या विटा आणि सिमेंट ठोकळ्यांना बांधकाम व्यावसायिकांकडून मागणी वाढली आहे. त्यामुळे वीटभट्टी व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. खनिकर्म विभागाच्या माहितीनुसार, मातीच्या विटांना आता फक्त २० टक्के मागणी राहिल्याने हा व्यवसाय डबघाईला आला आहे. त्यामुळे या व्यवसायातील ७० टक्के कामगारांनी रोजगारासाठी अन्य पर्याय निवडला आहे.
वीटभट्टी व्यवसाय या परिसरात जास्त वाढत गेला, मात्र चार-पाच वर्षांपासून बदलत्या तंत्रामुळे तो संकटात आला. यात किनारपट्टीवरील वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. मातीच्या विटांना सिमेंट, जांभा दगडाच्या विटांचा पर्याय उपलब्ध झाला. या विटा स्वस्त आणि बांधकाम करण्यासाठी जास्त सुलभ असतात. त्यामुळे या विटांचा वापर जास्त प्रमाणात होऊ लागला आहे.
मोठमोठ्या इमारती बांधण्यासाठी सिमेंटच्या विटांचा वापर प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक करू लागले आहेत. यामुळे मातीच्या विटांच्या मागणीत अचानक ६० टक्क्यापर्यंत घट झाली. तयार झालेल्या विटांच्या राशी तशाच पडून आहेत. वीटभट्टी व्यवसाय डबघाईला जात असल्याचा सर्वाधिक फटका पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड या तालुक्यांतील आदिवासीबांधवांना सोसावा लागत आहे. मुंबईतील गृह उद्योगाला कच्चा माल म्हणून मातीच्या विटांचे कारखाने पनवेल आणि त्यानंतर लगतच्या तालुक्यांमध्ये वाढत गेले, मात्र दोन-तीन वर्षांत वीटभट्टी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
सरकारी धोरण जबाबदार
विटा भाजण्यासाठी पूर्वी जंगलातून मुबलक लाकूडफाटा मिळत असे. तोडण्याची मजुरी आणि वाहतुकीचा खर्च द्यावा लागत असे; पण आता जंगलातून असा लाकूडफाटा वन विभागाच्या बंदीमुळे आणू शकत नाही. बाजारातून विकत घेतलेला लाकूडफाटा परवडणारा नाही. मातीवरील रॉयल्टी सक्तीने वसूल केली जाते.
कुंभार समाजाला मातीच्या रॉयल्टीमध्ये सूट आहे, त्याप्रमाणेच या व्यवसायालाही रॉयल्टीमध्ये सूट मिळावी, ही अनेक वर्षांची मागणी वीटभट्टी व्यावसायिकांची आहे, मात्र ही रॉयल्टी वाढतच जात आहे. पाणीटंचाई, मजुरांचा वाढता खर्च, प्रदूषणाचा मुद्दा, वाहतुकीचा खर्च आणि यातच अचानक येणाऱ्या पावसाने तयार विटा खराब होण्याची भीती अशी अनेक कारणे या व्यवसायासमोर उभी आहेत. ही संकटे भविष्यात कमी होतील, अशी कोणतीच लक्षणे दिसत नसल्याचे वीटभट्टी मालक संदेश पाटील यांनी सांगितले.
अवकाळी पावसाचा फटका
चिरा व सिमेंटच्या ठोकळ्यांमुळे वीट व्यवसाय अडचणीत सापडत असताना वीट व्यावसायिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. शुक्रवारी सायंकाळी अलिबागसह पेण, महाड या भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. या पावसात तयार केलेल्या कच्च्या विटा पाण्यात भिजल्या. त्यामुळे विटांचे प्रचंड नुकसान झाले. पावसापासून बचाव करण्यासाठी त्या विटांवर प्लॅस्टिकचे आवरण टाकण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.