के. एच. शिरगापुरे , संजय बडेतुती लागवडीनंतर आपल्याकडे सुमारे तीन महिने मिळतात. या कालावधीमध्ये कीटक संगोपन गृहाची उभारणी व अन्य कामे करू घेऊ शकतो. शेतकऱ्यांनी रेशीम कीटकांच्या सुधारित वाणाचा वापर करावा. म्हणजे उत्पादनात वाढ मिळू शकते. .बायव्होल्टाइन संकरित वाणबायव्होल्टाइन म्हणजे एका हंगामात दोन पिढ्या किंवा दोनदा जीवनचक्र पूर्ण करणारा. बायव्होल्टाइन कीटक हे एका हंगामात दोनदा रेशीम कोशांची निर्मिती करू शकतात. यामुळे रेशीम उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांच्या फायद्यात वाढ होते.CSR२ × CSR४, CSR१८ × CSR१९, KSO१ × SP२बायव्होल्टाइन दुहेरी संकरित वाणया प्रगत संकरित जातींमुळे वाढीचा दर सुधारतो. किटकांची पर्यावरणीय ताणांसाठी सहनशीलता वाढते. त्यामुळे ते शाश्वत आणि उत्पादक रेशीम शेतीसाठी महत्त्वाचे ठरतात.(CSR२ × CSR४) × (CSR६ × CSR२७)दक्षिण भारत व महाराष्ट्र या समशीतोष्ण प्रदेशासाठी केंद्रीय रेशीम बोर्डाने CSR२ × CSR४ या संकरित वाणाची शिफारस केलेली आहे..त्याची वैशिष्ट्येप्रति १०० अंडीपुंज रेशीम कोष उत्पादन ६५-७० किलो१ किलो धागा निर्मितीसाठी रेशीम कोष ५.५-६ किलोप्रतिकोष धाग्याची लांबी १२०० ते १३०० मीटरधाग्यामधील उपलब्ध रेशीम टक्केवारी २५आंतरराष्ट्रीय दर्जाचे २A-४A रेशीम.चॉकी (बाल कीटक) संगोपनअंडी पुंजाची उबवण झाल्यापासून तर अळ्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत रेशीम अळ्यांच्या एकूण पाच अवस्था असतात. पहिल्या दोन अवस्थांच्या रेशीम अळ्यांच्या संगोपनास चॉकी कीटक संगोपन असे म्हणतात. या अवस्थेत अळ्यांना प्रामुख्याने जास्त पाण्याचे प्रमाण असलेली व प्रथिनयुक्त कोवळी पाने खाद्य म्हणून वापरावी. बाल अवस्थेतील कीटक रोगाला लवकर बळी पडतात. त्याच प्रमाणे वातावरणातील प्रतिकूल परिस्थितीमुळे लवकर प्रभावित होतात. त्यामुळे चॉकी कीटक संगोपनात विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यासाठी चॉकी संगोपन केंद्राची (चॉकी रेअरिंग सेंटर) उभारणी करण्यात येते. म्हणून शेतकऱ्यांनी दोन अवस्थेपर्यंत (मोल्टिंग) वाढ झालेल्या अळ्या पुढील संगोपनासाठी खरेदी कराव्यात. चॉकी कीटक संगोपन व प्रौढ अळ्यांचे संगोपन परस्पर वेगळे आहे..चॉकी (बाल कीटक) संगोपन केंद्रबाल अवस्थेत संगोपन करीत असताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण बॅच बाद होण्याची किंवा अत्यल्प कोश उत्पादन होण्याची शक्यता असते. रोगमुक्त व गुणवत्ता युक्त चॉकी, अर्थात बाल कीटकांची उत्पत्ती करणे ही बाय व्होल्टाइन प्रजातीच्या कीटक संगोपनाची एक मुख्य आवश्यकता आहे. उत्तम प्रतीच्या कोष उत्पादनासाठी चॉकी रेअरिंग ही प्रमुख पायरी आहे. शेतकऱ्यांना सदृढ व स्वस्थ बाल कीटक पुरविण्याच्या उद्दिष्टाने चॉकी केंद्राची स्थापना केली जाते. एखाद्या रोपवाटिकेमध्ये रोपांची काळजी ज्या प्रकारे घ्यावी लागते, त्याच प्रमाणे बाल कीटकांची जोपासना करावी लागते. अंडीपुंजांच्या पहिल्या दोन अवस्थांपर्यंत (मोल्ट) केंद्रावर वाढविल्या जातात. रेअरिंग केंद्रामध्ये स्वच्छतेची काळजी घेण्यासोबत निर्जंतुकीकरणाची काळजी घ्यावी लागते. बाल कीटकांच्या वाढीसाठी योग्य तापमान व आर्द्रता नियंत्रित करण्याकडेही लक्ष द्यावे लागते. त्यामुळे रेशीम अळ्या उत्तम प्रकारे व एकसमान विकसित होतात. दुसरे मोल्ट सफलतेने पार केलेली बाल कीटक (चॉकी) मिळाल्याने रोगाची प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते. त्या पुढील अवस्थांचे (मोल्ट) कीटक संगोपन सोपे होते. या कीटकांचे संगोपनातून कमी कालावधीत शेतकऱ्यांना भरघोस कोष उत्पादन मिळू शकते..प्रौढ कीटक संगोपनप्रौढ अवस्थेतील कीटक संगोपन तिसऱ्या अवस्थेपासून सुरू होते. दुसरी अवस्था (मोल्टिंग) पूर्ण करून चॉकी रेअरिंग केंद्रातून खरेदी केलेल्या अळ्या व्यवस्थितपणे शूट रेअरिंग रॅकवर ब्रशिंग (रॅकवर अळ्या सोडणे) करून घ्याव्यात. या अवस्थेमध्ये तुती पानाऐवजी तुती झाडांच्या फांद्या खाद्य म्हणून दिले जाते. म्हणून प्रौढ अवस्थेतील तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या अवस्थेदरम्यान खाद्याकरिता फांदी पद्धतीचा अवलंब करावा..Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून विकासाकडे वाटचाल.कीटक संगोपनगृहाची उभारणीतुती रेशीम कीटकसंगोपनासाठी स्वतंत्र कीटक संगोपनगृहाची उभारणी करावी. सदर कीटक संगोपनगृहातील वातावरण २४ ते २८ सेल्सिअस तापमान व आर्द्रता ७० ते ८५ टक्के ठेवण्यासाठी योग्य सुविधा कराव्यात. कीटक संगोपनगृहात खेळती हवा राहण्यासाठी खालच्या व वरील बाजूस भिंतींना खिडक्या ठेवाव्या. कीटक संगोपनगृहात पाला साठवणे, चॉकी कीटक संगोपन, प्रौढ कीटक संगोपन, कीटकांचे मोल्ड याकरिता भरपूर जागा ठेवावी. कीटक संगोपन गृहाची रचना ही स्वच्छता व निर्जन्तुकीकरण सहज करण्यायोग्य करावी. कीटक संगोपनगृहाची उभारणी अंडीपुंज घेण्याची क्षमता व संगोपनाची पद्धत यावर अवलंबून आहे. साधारणतः शंभर अंडीपुंजा करिता (१ अंडीपुंज = ५०० अळ्या म्हणजेच १०० × ५००= ५० हजार अळ्यांसाठी) ७०० ते ८०० चौरस फूट जागा आवश्यक आहे. १०० अंडीपुंजाच्या संगोपनाकरिता १ शूट रेअरिंग रॅक ४० × ५ फूट, ६० चंद्रिका, फवारणीकरिता एक पंप व एक हायग्रोमीटर संगोपन गृहात असणे आवश्यक आहे..निर्जंतुकीकरणकीटक संगोपनगृहाचे व साहित्याचे निर्जंतुकीकरण दोन वेळेस करावे.पहिली बॅच संपल्यानंतर एकदा ५ टक्के ब्लिचिंग पावडरने निर्जंतुकीकरण करावे.बॅच संपल्यानंतर रोगी अळ्या, पोचट व मृत कोष गोळा करून जाळून टाकावे.चंद्रिकेवरील फ्लॉस जाळून निर्जंतुक करावे.संपूर्ण कीटक संगोपनगृहाचे व साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे. त्यासाठी क्लोरीन डाय-ऑक्साइड (२.५ टक्के) द्रावणाने निर्जंतुकीकरण करावे.यामध्ये ब्रशिंगच्या (बेडवर अळ्या सोडणे) पाच दिवस आधी संपूर्ण साहित्य धुऊन स्वच्छ करावे. सूर्यप्रकाशात वाळवून घ्यावे.ब्रशिंगच्या तीन दिवसांपूर्वी संपूर्ण कीटक संगोपनगृहाचे व साहित्याचे निर्जंतुकीकरण करावे.ब्रशिंगच्या दोन दिवसांआधी कीटक संगोपनगृहाच्या सभोवताली निर्जंतुकाची धुरळणी करावी. ब्रशिंगच्या एक दिवसापूर्वी रिअरिंग रॅकवर ट्रे अथवा पेपर अंतरून घ्यावा. त्यावरही निर्जंतुकांची धुरळणी करावी..फांदी पद्धतफांदी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे मजुरीवरील खर्चात ५० टक्के आणि खाद्यामध्ये १५ ते २० टक्के बचत होते. या पद्धतीत अळ्या हाताळणी कमी होत असल्याने रोगजंतूंचा प्रसारही कमी राहतो. संगोपनगृह व संगोपन बेडमध्ये स्वच्छता राखणे सहज शक्य होते. या पद्धतीमध्ये पानाची प्रत चांगली राहते. उपलब्ध खाद्यामध्ये जास्त अंडीपुंजाचे कीटक संगोपन करणे शक्य होते. फांदी पद्धतीचा अवलंब केल्यामुळे बेडमध्ये हवा खेळती राहते. अळ्यांची वाढ चांगली होते. परिणामी, कोषाचे उत्पादन व दर्जा चांगला मिळते.तापमान व आर्द्रता नियोजनतिसऱ्या अवस्थेतील अळ्यांना २६ अंश सेल्सिअस तापमान व ८० टक्के आर्द्रता आणि चौथ्या व पाचव्या अवस्थेतील अळ्यांकरिता अनुक्रमे २५ व २४ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० टक्के आर्द्रता आवश्यक असते. तापमान व आर्द्रता नियंत्रण करण्यासाठी कूलर, हिटर, स्टोव्ह, ओले बारदाना किंवा पाण्याचा फवारे यांचा योग्य प्रमाणात वापर करावा. कीटक संगोपन गृहातील हवा खेळती ठेवावी. त्यामुळे अळ्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते..Reshim Sheti Success : रेशीम शेतीतून मिळाली शाश्वती.मोल्टमधील काळजीअळ्यांच्या कात टाकण्याच्या प्रक्रियेला मोल्ट म्हणतात. या दरम्यान कीटक संगोपनगृहातील हवा खेळती व कोरडी राहील, याची दक्षता घ्यावी. मोल्ट कालावधीमध्ये बेड पसरवून घेतल्यानंतर विरी गेलेल्या चुन्याची धुरळणी करावी. त्यामुळे बेड कोरडा होऊन कीटकांची कात निघण्यास मदत होते. कात टाकण्याच्या कालावधीत कीटक संगोपनगृहात जास्त तापमान व आर्द्रता राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. ९५ टक्के अळ्या मोल्टमधून निघाल्यानंतरच पुढील खाद्य द्यावे.निर्जंतुकाची धुरळणीरेशीम कीटकांना रोगांची प्रादर्भाव होऊ नये म्हणून विजेता, विजेता ग्रीन व अंकुश या निर्जंतुकांची धुरळणी करावी. निर्जंतुकांची धुरळणी ५ ग्रॅम प्रति चौरस फूट याप्रमाणे डस्टरमध्ये घेऊन कीटकांवर समान रीतीने पसरेल, अशी करावी..परिपक्व अळ्या कोष बांधणीसाठी सोडणेपाचव्या अवस्थेतील अळ्या ७ ते ८ दिवसांमध्ये परिपक्व होतात. खाद्य खाणे बंद करून कोष बांधण्यासाठी जागा शोधतात. परिपक्व झालेले कीटक त्वरित वेचून चंद्रिकेवर सोडावेत. चंद्रिकेवर अळ्या सोडताना जास्त गर्दी होऊ देऊ नये. कोष बांधण्याच्या अवस्थेदरम्यान संगोपनगृहातील तापमान २४ अंश सेल्सिअस व आर्द्रता ६० ते ७० टक्के ठेवावी. हवा खेळती राहील, याची काळजी घ्यावी. परिपक्व झालेले रेशीम ओळखण्याच्या काही खुणा - असे कीटक खाद्य खाणे बंद करतात. त्यांच्यात संगोपन ट्रेच्या कोपऱ्यांकडे जाण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यांचे शरीर आकुंचन पावत असताना पारदर्शक पिवळे दिसू लागते. बाय व्होल्टाइन तुती कीटकांची कोष बांधण्याची अवस्था ८ ते १० दिवसांची असते. अशा प्रकारे एक बॅचच्या कीटक संगोपनासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागतो..कोष काढणी (हार्वेस्टिंग)चंद्रिकेवर अळ्या सोडल्यानंतर सुमारे ८ दिवसांनी कोष काढावे. पतंग बाहेर येण्यापूर्वी रेशीम धागा पकडण्यासाठी कापणी ही एक महत्त्वाची पायरी आहे. कापणीस उशीर झाल्यास पतंग कोषास छिद्र पाडून बाहेर पडतो, परिणामी कोषातील एकसंध धागा तुटून गुणवत्ता कमी होते. कोषाचे बाजारमूल्य कमी होते. कापणीनंतर कोषांची वर्गवारी आणि प्रतवारी करावी. प्रतवारीमध्ये फिकट, डाग असलेले किंवा सदोष कोष काढून टाकावेत. शेवटी गोळा केलेले कोष आठव्या दिवशी थोडेसे वाळवून आणि सैल पॅक केलेल्या पिशव्यांमध्ये वाहून नेल्यानंतर बाजारात न्यावेत. दिवसाच्या थंड वेळेत कोषांची वाहतूक आणि विक्री करावी.मिळणारे आर्थिक उत्पन्नबाय व्होल्टाइन कीटक संगोपनामध्ये एका बॅचसाठी साधारणतः ३५०० किलो खाद्य लागते. बाय व्होल्टाइन कीटक संगोपनामध्ये प्रति १०० अंडीपुंज ६५ ते ७० किलो रेशीम कोष उत्पादन भेटते. साधारणतः बाय व्होल्टाइन तुती रेशीम कोषास ५०० ते १००० रु प्रति किलो दर मिळतो..प्रौढ अवस्थेतील रेशीम अळ्यांचे खाद्य व्यवस्थापनअळ्यांना खाद्य देण्याकरिता ५० ते ५५ दिवस वाढ झालेल्या तुती झाडांच्या फांद्या सुरुवातीला ३ ते ४ फूट उंचीवरून कापून तिसऱ्या अवस्थेतील अळ्यांना द्याव्यात. उर्वरित ६० ते ६५ दिवसांच्या जुन्या फांद्याचा उपयोग चौथ्या व पाचव्या अवस्थेतील अळ्यांना खाद्य म्हणून करता येतो. फांद्यांची तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावी. छाटणी केलेल्या फांद्या उभ्या जमिनीवर स्वच्छ पातळ ओलसर कपड्याने झाकून ठेवाव्यात. बाय होल्टाइन रेशीम कीटकांमध्ये तिसऱ्या अवस्थेचा (मोल्ट/इनस्टार) कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो.यामध्ये १०० अंडीपुंजाच्या अळ्यासाठी ४० ते ५० किलो खाद्य लागते. तसेच बाय व्होल्टाइन कीटक संगोपनामध्ये ४६० किलो फांद्या चौथ्या अवस्थेकरिता (मोल्ट/ इनस्टार) व २८८० किलो फांद्या पाचव्या अवस्थेकरिता खाद्य म्हणून लागतात. बाय व्होल्टाइन कीटक संगोपनामध्ये चौथ्या अवस्थेचा कालावधी ४ ते ५ दिवसांचा असतो. पाचव्या अवस्थेचा कालावधी ७ ते ८ दिवसांचा असतो. चौथ्या व पाचव्या अवस्थेतील अळ्यांना दिवसातून दोन वेळा खाद्य द्यावे. मातीयुक्त रोग, किडीयुक्त, पिकलेली पाने काढून टाकावीत.के. एच. शिरगापुरे ९५४५६९५१४१सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय, दहेगाव, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.