Bogus Seed : वर्धा, नांदेडला निकृष्ट बियाण्यांचे रॅकेट उद्ध्वस्त

Agriculture Department : कृषी विभागाने वर्धा व नांदेड भागांत निकृष्ट बियाण्यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमांमध्ये अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Bogus Seed
Bogus SeedAgrowon
Published on
Updated on

Pune News : कृषी विभागाने वर्धा व नांदेड भागांत निकृष्ट बियाण्यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमांमध्ये अडीच कोटीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

खरीप तोंडावर असल्यामुळे अप्रमाणित बियाण्यांच्या विरोधात राज्यभर मोहीम चालूच राहील, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

वर्धा जिल्ह्यातील महाकाळ गावातील एका घरात नामांकित कंपनीच्या नावे निकृष्ट बियाणे असल्याची गुप्त माहिती कृषी अधिकारी व पोलिसांना मिळाली. त्यांनी संयुक्त कारवाई करीत सात जणांची कसून चौकशी केली. जयस्वाल नामक व्यक्ती अहमदाबाद येथून बियाणे मागवून विविध कंपन्यांच्या लोकप्रिय वाणांच्या बनावट पिशव्या तयार करीत होता.

या बियाण्यांची विक्री तो राज्यात करत होता. या कारवाईत १५ टन खुले बियाणे व कापूस बियाण्यांच्या ८३८ पिशव्या, यंत्रसामग्री व ट्रक असा १.५२ कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Bogus Seed
Bogus Seed : राज्यात बोगस बियाण्यांच्या रॅकेटमुळे शेतकऱ्यांची फसवणूक

आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, दुसरी कारवाई नांदेडच्या नायगाव भागात केली गेली. मौजे कोलंबी येथे एका ट्रकमध्ये निकृष्ट सोयाबीन भरले जात होते. या छाप्यात बियाण्यांचे उगम प्रमाणपत्र, ग्रामबीजोत्पादक शेतकऱ्यांची यादी, साठापुस्तक, राज्यस्तरीय बियाणे विक्री परवाना आढळून आला नाही. त्यामुळे ३४.५० लाख रुपयांचे १७९ क्विंटल बियाणे जप्त करण्यात आले. हे बियाणे मध्यप्रदेशात जाणार होते.

याच कारवाईत कृषी विभागाने एका गोदामाचीही तपासणी केली. त्या वेळी २४.६५ लाखांचे २७३ क्विंटल संशयास्पद बियाणे आढळून आले. याच ठिकाणी १६० रिकाम्या पिशव्या, थायरमचा साठा, पिशव्या सील करण्याची साधनेही होती.

परवाना न घेताच बियाण्यांचा कारखाना चालविला जात असल्याचे उघड झाल्यामुळे कृषी विभागाने गोदाम सीलबंद केले. तसेच ट्रकसहित बियाण्यांच्या ६९० गोण्या नायगाव पोलिस ठाण्यात जमा केल्या गेल्या. या छाप्यात ९९.१५ लाख रुपयांचा माल जप्त केला गेला आहे.

कृषी आयुक्तालयाच्या निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक विकास पाटील, मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर गुणनियंत्रण विभागाकडून मोहिमा राबविल्या जात आहेत.

येत्या खरिपात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्यासाठी मोहिमा चालू ठेवल्या जातील. संशयास्पद ठिकाणी तपासणी व कायदेशीर उल्लंघन असल्यास पोलिस कारवाई केली जाईल, असा इशारा गुणनियंत्रण विभागाने दिला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

- अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त

- १५ टन खुले बियाणे व कापूस बियाण्यांच्या ८३८ पिशव्यांचा समावेश

- विविध कंपन्यांच्या लोकप्रिय वाणांच्या बनावट पिशव्या तयार करून बियाण्यांची विक्री

- अप्रमाणित बियाण्यांच्या विरोधात राज्यभर मोहीम चालूच राहणार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com