MLA Ganpat Gaikwad
MLA Ganpat GaikwadAgrowon

Ganpat Gaikwad Firing : आमदार गणपत गायकवाड यांना अटक

Mahesh Gaikwad Shivsena : कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री उशिरा शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाइन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाच्या दालनात गोळीबार केला.

Mumbai News : कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी रात्री उशिरा शिंदे गटाचे कल्याणचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर हिललाइन पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाच्या दालनात गोळीबार केला.

या गोळीबारात महेश गायकवाड गंभीर जखमी झाला असून त्याचा साथीदार थोडक्यात बचावला. दरम्यान, आमदार गायकवाड यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली असून शनिवारी सायंकाळी उशिरा न्यायमूर्ती ए. ए. निकम यांच्या यांच्यासमोर सुनावणी सुरू होती.

जमिनीच्या वादातून झालेल्या या घटनेनंतर शहरांमध्ये प्रचंड तणाव असून दोन्ही गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस स्टेशनसमोर जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी गायकवाड यांच्यासह अन्य दोन आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्याची पोलिसांची मागणी उल्हासनगर न्यायालयाने अमान्य केली. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महासंचालकांना दिले असून या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान, आपल्या मुलाला मारहाण झाल्याने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याची कबुली आमदार गायकवाड यांनी दिली असून या प्रकरणानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

MLA Ganpat Gaikwad
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री म्हणतात राज्यातील शेतकऱ्यांना ४४ हजार कोटी रुपयांची मदत

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून विजय वडेट्टीवार यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर आमदार गायकवाड यांचा पोलिस ठाण्यातील गोळीबाराचा व्हिडिओ शेअर करत राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकाच्या दालनामध्ये आमदार गणपत गायकवाड महेश गायकवाड आणि अन्य तिघे चर्चा करत असताना अचानक आमदार गायकवाड यांनी थेट गोळीबार केल्याचे स्पष्ट दिसत आहे.

उल्हासनगर येथील एका जागेच्या वादातून आमदार गायकवाड आणि त्यांचेच नातेवाईक असलेले शिवसेनेच्या शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हा वाद शुक्रवारी (ता. २) रात्री उल्हासनगर पोलिस ठाण्यात पोहोचला होता.

मुख्यमंत्र्यांवर गायकवाड यांचा गंभीर आरोप

आमदार गणपत गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना गोळीबाराची कबुली दिली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला गुन्हेगार केले असा गंभीर आरोप त्यांनी केला. ‘‘मी गोळ्या झाडल्या असून मला याचा पश्चाताप नाही.

माझ्या मुलाला पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांसमोर मारहाण होत असेल तर मी काय करू, मी पाच राऊंड फायर केले. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर राज्यात केवळ आरोपी तयार होतील. आज त्यांनी माझ्यासारख्या एका चांगल्या माणसाला आरोपी केले आहे.’’

MLA Ganpat Gaikwad
Eknath Shinde : मातीचा गंध, सुगंध शेतीकडे खेचून आणतो

मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांवर विरोधकांकडून आरोपाच्या फैरी

शिंदे गटाचे शहरप्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांनी आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी, ‘‘राज्यात गुंड पोसले जात आहेत. दुसरीकडे केंद्रीय यंत्रणा आहेत.

यांचेही गुंड आणि त्यांचेही गुंड असा प्रकार सर्वत्र सुरू आहे.’’ शिवसेनानेते संजय राऊत यांनी, ‘‘पुणे, मुंबई, कोल्हापूरसह अनेक तुरुंगातील गुंडांना मोकाट सोडले आहे. गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. मी अनेक गुंडांची नावे देऊ शकतो,’’ असे आव्हान संजय राऊत यांनी दिले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, की ठाणे आणि आसपासच्या शहरांमध्ये गुंडांचा सुळसुळाट आहे. कायदा आणि संस्था कशा धाब्यावर बसवल्या गेल्या आहेत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शुक्रवारी झालेले गोळीबार प्रकरण आहे, असा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com