Pune News : ‘‘इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातल्यानंतर संघाचे तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे येरवडा कारागृहात बंदी होते. या काळात देवरस यांनी तुरुंगातून इंदिरा गांधी यांना काही पत्र लिहून, संघ सर्वधर्म समभाव जपतो असे म्हटले होते. भाजपने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वापर करून सत्ता मिळविली. याच भाजपने संघाच्या हिंदुत्वाला हरताळ फासला आहे,’’ अशी टीका शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
पुणे जिल्ह्याच्या ‘शिवसंकल्प, चला जिंकूया’ मेळाव्यात शनिवारी (ता. ३) ठाकरे बोलत होते. श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीत फटके बसल्यानंतर आता भाजपला हिंदू मतांची आठवण झाली आहे. भाजप फक्त मतांसाठी हिंदुत्वाचा वापर करत आहे. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी हिंदुत्व असून, नवाझ शरिफ यांचा केक खाल्लेल्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.’’
आमदार अपात्रता, चिन्ह आणि नावाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत बोलताना ठाकरे म्हणाले,‘‘ आमचा न्याय व्यवस्थेवर अंधविश्वास आहे. पुढील ५० वर्षांत निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. मात्र तोपर्यंत आम्ही जनतेच्या न्यायालयात दाद मागणार आहोत. शिवसैनिक वकील असतील आणि जनता आम्हाला विधानसभेत न्याय देईल.’’
खासदार संजय राऊत, सुषमा अंधारे, विनायक राऊत, भास्कर जाधव, जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहीर, सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांनी या वेळी मार्गदर्शन केले. पावसाने राज्यातील सर्वच रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांना विकासपुरुष ऐवजी खड्डा पुरुष पुरस्कार द्यावा, अशी उपरोधिक टीकाही ठाकरे यांनी केली.
‘अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज’
औरंगजेबाचा जन्म हा गुजरातमध्ये झाला होता. त्यामुळे त्याची भाषा गुजराती होती. अमित शहा हे अहमद शहा अब्दालीचे राजकीय वंशज असल्याची टीका ठाकरे यांनी केली. अमित शहा यांनी भाजपच्या बालेवाडी येथे झालेल्या अधिवेशनात ठाकरे यांच्यावर ‘औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख’ अशी टीका केली होती. त्यावर ठाकरे यांनी प्रत्त्युत्तर दिले.
‘पुण्याला विकास नाही विकार दिला’
भाजपने पुण्याला विकास नाही तर विकार दिला आहे. नदी सुशोभीकरण प्रकल्पाला मी मुख्यमंत्री असताना स्थगिती दिली होती. मात्र आमचे सरकार पाडल्यानंतर हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला असून, या प्रकल्पामुळे नैसर्गिक नाले यांना बाधा येऊन, नागरिकांच्या घरात पाणी घुसले आहे. या प्रकल्पाचा कंत्राटदार हा गुजरातचा असून, त्यानेच नवीन संसद उभारली आहे. त्यालाही गळती लागली असून, कंत्राटदारांचे भले करणाऱ्या भाजपला पैशांचा विकार झाल्याची टीका ठाकरे यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.