Birsa Munda : आपल्याला खडसावायला आज बिरसा मुंडा नाहीत...

Adivasi Jamin : १८४५ पासून मिशनरी ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार करू लागले. लाखो कोलांचं धर्मांतर करण्यात आलं. मिशनऱ्यांनी शाळा काढल्या. पण कोलांची जमीन ताब्यात घेतली. पारंपरिक देव-धर्मांपासून कोलांना तोडलं.
Birsa Munda
Birsa MundaAgrowon
Published on
Updated on

Indian Agriculture : ९ जून ही बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी. १८७५ मध्ये त्यांचा जन्म झाला. कोल आदिवासी समाजात. सध्याच्या झारखंड राज्यातल्या छोटा नागपूर प्रदेशात. बिरसा मुंडा मेंढ्या चारायचे, बासरी वाजवायचे. जडीबुटीच्या औषधांचं त्यांचं ज्ञान अचंबित करणारं होतं.

ब्रिटिशांच्या हाती देशाचा कारभार जाईपर्यंत म्हणजे १९ व्या शतकापर्यंत जंगल-जमीन आदिवासींच्या सामूहिक मालकीची होती. १८६० फॉरेस्ट ॲक्ट नुसार देशातली सर्व जंगलं ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बळकावली.

सरपण गोळा करणं, तेंदू, आवळे, मोह, चारोळी, मध इत्यादी वेचण्याचा आदिवासींचा हक्क डावलला गेला. जंगलात गुरंढोरं चारणं हा गुन्हा ठरला. ब्रिटिशांनी अन्य भारतीयांना, व्यापाऱ्यांना कोल आदिवासींची जमीन विकून टाकली. ते जमीनदार बनले.

जमीनदाराच्या पालखीसाठी कोलांनी पैसे द्यायचे, पालखीही उचलायची. जमीनदाराच्या घरात लग्न वा पूजा असेल तर त्याचा कर कोलांनी द्यायचा. त्याच्या घरात कुणी मेलं, तर कोलांनी दंड भरायचा. कुणी जन्माला आलं तर कोलांनी पैसे द्यायचे. कोलांनी पळून जाईपर्यंत ही लूटमार चालू असायची. कोलांचं शोषण करणारे भारतीयच होते.

Birsa Munda
Birsa Munda Krushi Kranti Yojana : बिरसा मुंडा योजनेतून मिळवा विहिरीसाठी अनुदान ; काय आहे योजनेसाठी पात्रता

१८४५ पासून मिशनरी ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार करू लागले. लाखो कोलांचं धर्मांतर करण्यात आलं. मिशनऱ्यांनी शाळा काढल्या. पण कोलांची जमीन ताब्यात घेतली. पारंपरिक देव-धर्मांपासून कोलांना तोडलं. आदिवासींनी त्यांच्या देवांची पूजा करणं हा गुन्हा ठरवला. बिरसा मुंडा यांचाही बाप्तिस्मा झाला होता. पण त्यांनी धर्मगुरूशीच भांडण केलं. म्हणून त्यांना शाळेतून हाकलण्यात आलं.

बिरसा एका हिंदू विणकराकडे राहिले. तिथे ते वैदू म्हणून उपजीविका करू लागले. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरली. आदिवासी त्यांना ईश्‍वरी अवतार मानू लागले. १८९५ मध्ये बिरसा प्रेषित झाले. जग नष्ट होणार आहे, माझ्या भोवती जे मुंडा जमतील तेच वाचतील. बाकी सर्व परकीय लोक- ब्रिटिश आणि त्यांचे भारतीय दलाल- जळून खाक होतील अशी भविष्यवाणी त्यांनी उच्चारली. ही सुरुवात होती राजकीय बंडाची.

टेकडीवर हजारो आदिवासी तीरकमठा, गलोली, कुऱ्हाडी घेऊन बिरसांच्या भोवती जमले. ब्रिटिशांनी बिरसांना अटक केली. दोन वर्षं कारावासात काढून बाहेर आल्यावर बिरसांनी आदेश दिला, की केळ्याच्या झाडांचे पुतळे करून जाळा.

हे पुतळे ब्रिटिश सरकारचे होते. १८९९ मध्ये बिरसा यांनी आदिवासींना बंडाचं आवाहन केलं. तीरकमठे, गलोली, कुऱ्हाडी या शस्त्रांनी आदिवासींनी ब्रिटिश, मिशनरी, भारतीय जमीनदार-सावकार यांच्यावर हल्ले केले. हाच उलगुलान- प्रचंड मोठं रणकंदन.

Birsa Munda
Farmers Protest : हमीभावासाठी शेतकरी आक्रमक ; दिल्ली-चंदीगड महामार्ग रोखला

हे बंड चिरडण्यात आलं. बंदुकांच्या गोळ्यांनी. बिरसा जंगलात पळाले. पण मार्च १९०० मध्ये त्यांना जेरबंद करण्यात आले. ९ जून १९०० रोजी तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्यांनी वयाची पंचविशीही पार केलेली नव्हती.

आजही आपण आदिवासींच्या जमिनी हडप करतो आहोत. आपली खनिजं, आपलं पाणी त्यांच्या जमिनीत का, असे प्रश्‍न विचारतो आहोत. आपल्याला प्रत्युत्तर द्यायला, आपल्या विरोधात बंड करायला, आपल्याला खडसावायला आज बिरसा मुंडा नाहीत.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com