Crop Protection: बहुतांश द्राक्ष विभागात मागच्या आठवड्यात अचानक ढगाळ वातावरण, त्यानंतर रिमझिम पाऊस व पुन्हा कडक ऊन असे हवामान अनुभवास आले. बंगालच्या उपसागरातून येणारी चक्री वादळे छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागांत जाताना विदर्भ व मराठवाड्यात पाऊस देऊन जातील व त्यातील काही पाऊस लातूर, बार्शी भागांतील द्राक्ष विभागांपर्यंत पोहोचेल असा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात तसे न घडता केवळ रिमझिम पाऊस झाला. .वेगवेगळ्या हवामान मॉडेल्सच्या अंदाजानुसार कुठल्याही द्राक्ष विभागामध्ये येत्या आठवड्यातच नाही, तर संपूर्ण सप्टेंबर महिन्यात मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. या आठवड्यातच बंगालच्या उपसागरात दोन चक्रीय वारे तयार होऊन मोठ्या प्रमाणात बाष्प घेऊन जमिनीकडे येण्याची शक्यता आहे. पण त्यांची घोडदौड छत्तीसगढ, मध्य प्रदेशकडेच राहील. जास्तीत जास्त विदर्भाच्या ईशान्येकडील भागात पाऊस मिळेल, पण मराठवाड्यातील द्राक्ष विभागामध्ये या वेळीही पावसाची शक्यता फारच कमी दिसते. उर्वरित भागामध्ये तर पावसाची शक्यता कमीच आहे. अगदी झालाच तर स्थानिक वातावरण निर्मिती होऊन मिळालाच तर रिमझिम पाऊस होऊ शकतो. अशा प्रकारचे पाऊस मॉडेल्सच्या अंदाजात दर्शविले जात नाहीत..Grape Vineyard Disease Control: भुरी, केवडा नियंत्रणात ठेवणे आवश्यक .सध्या ‘एल निनो’ ताकदवान बनत चालला आहे, तर आयओडी कमजोरच राहत आहे. तसेच मेडन ज्युलियन ऑस्सिलेशन्स (एमजेओ) ही जगभरात विषुववृत्ताजवळून पूर्वकडे सरकत जाणारी ढग, वारे आणि पावसाची मोठी लाटसदृश्य स्थिती असते. हा घटकही सध्या किंवा जवळच्या भविष्यात आपल्या मॉन्सूनवर काही प्रभाव टाकेल असे दिसत नाही. हवामान तज्ज्ञांच्या मते, या व्यतिरिक्त उत्तरेमध्ये बर्फ जास्त वेळ टिकून राहणे आणि उत्तर पूर्व भागामध्ये कमी पाऊस होणे या दोन बाबी मॉन्सूनवर प्रभाव टाकू शकतात. .सध्या उत्तर पूर्व भागातच जास्त पाऊस होत आहे. थोडक्यात, या वर्षीच्या मॉन्सूनच्या पावसाची सरासरी सुधारण्यासाठी सध्यातरी आशावादी वातावरण दिसत नसल्याचे बहुतेकांचे मत आहे. या वर्षी मॉन्सून लवकर परतीचा प्रवास सुरू करेल असे सांगितले जात आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या द्राक्ष विभागांमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पावसाची शक्यताही फारच कमी दर्शविली जात आहे. यातील बऱ्याच भागात मॉन्सून परत जात असतानाच पाऊस होतो. या पावसामुळे उन्हाळ्यातील पाण्याची तजवीज होत असते. आतापर्यंत तरी वातावरण ठीक राहिले आहे. आता जाताना परतीच्या पावसाने पाण्याची आवश्यकता पूर्ण होईल, अशी आशा करू..Grape Crop Management: उघडीप काळात पानांचे संरक्षण आणि जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन.रिमझिम पावसामुळे बऱ्याच बागांमध्ये नवीन फुटी फुटल्या असतील, त्यावर रोग वाढण्याची शक्यता आहे. मात्र या रोगाला भिऊन विनाकारण बुरशीनाशकांच्या फवारण्या करणे टाळावे. येणाऱ्या काळात पाऊस कमी झाला की रोगही वाढणार नाही. संभाव्य रिमझिम पावसात जैविक नियंत्रणाचे घटक चांगले काम करतील. म्हणूनच पुन्हा भुरी आणि बुरशीजन्य करपा रोगासाठी ट्रायअझोल जातीतील बुरशीनाशकांचा वापर शक्य तितका टाळावा. त्याचप्रमाणे ताम्रयुक्त बुरशीनाशकांचा वापर करणे आता फारसे जरुरी वाटत नाही. .या दोन प्रकारच्या बुरशीनाशकांचा वापर कमी केलेल्या किंवा अजिबात न केलेल्या द्राक्ष बागायतदारांनी या रिमझिम पावसात जैविक नियंत्रणाचे घटक वापरल्यास त्याचे चांगले परिणाम मिळतील. बागेमध्ये जैविक नियंत्रणाच्या बुरश्या किंवा जिवाणू आता चांगल्या प्रकारे स्थायिक होतील आणि त्याचा खरा फायदा फळाच्या छाटणीनंतर मिळणार आहे. सध्या बागेत दिसणारे रोग जैविक नियंत्रणाने कदाचित बुरशीनाशकांच्या फवारणीइतके चांगले नियंत्रण मिळालेले दिसणार नाही. पण सध्याच्या वातावरणात जैविक नियंत्रणाच्या घटक (उदा. बुरशी किंवा जिवाणू) बागेतील रोगांची वाढ थांबवतील. पानगळ होणार नाही. .त्याच प्रमाणे ताम्रयुक्त बुरशीनाशकांमुळे दिसणारी करपलेली पानेसुद्धा दिसणार नाहीत. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जैविक नियंत्रणासाठी वापरलेले सूक्ष्मजीव यावेळी बागेत स्थापित होतील. ते काड्यांवरील किंवा खोडावरील रोगांचे किंवा किडींचे अवशेष नष्ट करतील. सध्या जास्त पाऊस सांगितलेला नाही. परंतु फळांच्या छाटणीनंतर सुरुवातीच्या काळात पाऊस आल्यास बुरशीनाशकांपेक्षा जास्त आत्ता वापरलेल्या जैविक नियंत्रणाचाच फायदा त्यावेळी जास्त होईल..वाळवा भागात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव अजूनही वाढत आहे. त्याबद्दल मागील आठवड्यात दिलेल्या सल्लाच अजूनही उपयोगी पडेल असे वाटते.- डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.