Kolhapur Bidri Sugar Election : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि कागल तालुक्याची मिनी विधानसभा म्हणून चर्चेत आलेल्या बिद्री सहकारी साखर कारखान्यासाठी तब्बल ८९.०३ टक्के मतदान झाले. एकूण ५६ हजार ९१ पैकी ४९ हजार ९४० मतदारांनी हक्क बजावला. राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील १७३ मतदान केंद्रावर मतदारांची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.
आजच्या मतदानातून ५६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, मंगळवार (ता.५) होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. दरम्यान मागच्या वेळच्या तुलणेत मतदान वाढल्याने याचा नेमका कोणत्या गटाला फायदा होणार याची उत्सुकता लागली आहे.
वाढलेल्या मतदानाचा धक्का कोणाला
कारखान्याची २०१७ मध्ये निवडणूक झाली; तेव्हा ८२ टक्के मतदान झाले होते. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये संपली होती; परंतु विविध कारणांनी वर्षभर लांबणीवर पडलेली निवडणूक आज पार पडली. आज सरासरी ८९.०३ टक्के मतदान झाले. गतवेळेपेक्षा मतदानाचा टक्का वाढला. त्यामुळे या वाढलेल्या मतदानाचा धक्का कोणाला बसणार, याचा फैसला मंगळवारी होणार आहे.
यंदाच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संजय घाटगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी श्री महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या विरोधात खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, समरजितसिंह घाटगे, जनता दलाचे विठ्ठलराव खोराटे, भाजपचे नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील विरोधी राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीमध्ये टक्कर आहे.
एका केंद्रात तीन ते चार ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याने मतदान प्रक्रिया जलद गतीने होत होती. त्यामुळे केंद्राबाहेर अपवाद वगळता मतदारांची गर्दी कमी होती. सकाळी आठ वाजता मतदान सुरू झाले. निवडणुकीतील ईर्ष्या पाहता वयोवृद्ध, आजारी मतदारांना आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रत्येक केंद्रावर बंदोबस्त होता. दिवसभरात दोन्ही आघाड्यांचे प्रमुख नेते आणि उमेदवार यांनी कार्यक्षेत्रातील विविध गावांतील मतदान केंद्रांना भेट दिली. दरम्यान, उद्या (ता. ५) कोल्हापुरातील मुस्कान लॉन येथे मतमोजणी होणार आहे.
राधानगरी १७४३६ पैकी १५४७७ (८८.७६ टक्के), भुदरगड १९७२५ पैकी १७४८३ (८८.६३ टक्के), कागल १५४४० पैकी १३९६९ (९०.४७), करवीर ३४९० पैकी ३०११ (८६.२७) टक्के
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.