
चंद्रकांत जाधव
Indian Agriculture : चोपडा शहरातील (जि. जळगाव) बोरोलेनगर येथे भूषण पाटील यांचे वास्तव्य आहे. कठोरा आणि सनपुले नजीकच्या अनुदानित आश्रमशाळेत पाटील हे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शिक्षकी पेशा म्हणजे शिस्त, नेटकी कामे. भूषण पाटील यांनी शिक्षणशास्त्र विषयातील पदविका घेतली. पुढे ते आश्रमशाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले तरीदेखील शेती व्यवस्थापनात त्यांनी सक्रिय सहभाग ठेवला आहे.
कठोरा-सनपुले गावशिवार तापी नदीच्या परिसरात आहे. या भागात काळी कसदार जमीन आहे. या शिवारात भूषण पाटील यांची सतरा एकर शेती आहे. शेतीमध्ये दोन कूपनलिका आहेत. शेती व्यवस्थापनासाठी सालगडी असून, इतर कामांसाठी मजुरांची मदत घेतली जाते. शेतीमध्ये बैलजोडी आणि देशी गाय आहे. सुट्टीच्या काळात शक्य तेवढा अधिकचा वेळ पाटील शेती नियोजनासाठी देतात.
लहान बंधू कपिल हे अभियांत्रिकी विषयातील पदवीधर असून, शिरपूर (जि. धुळे) येथे खासगी क्लासेस घेतात. कपिलदेखील अधूनमधून गावी येऊन शेती व्यवस्थापनामध्ये रमतात. भूषण यांना वडील ज्ञानेश्वर यांच्याकडून शेतीचे प्राथमिक धडे मिळाले. त्यांचे देखील शेती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन मिळते. भूषण पाटील यांनी शेतात एक गोदामही उभारले. शेतात नव्याने जलवाहिनी केली आहे.
विविध पिकांचे नियोजन ः
भूषण पाटील यांची कठोरा (ता. चोपडा) शिवारात सतरा एकर बागायती शेती आहे. सर्व पिकांना ठिबक सिंचन केलेले आहे. केळी हे प्रमुख पीक असून, दरवर्षी कांदेबाग केळीची सहा एकरांत लागवड केली जाते. ऑक्टोबरमध्ये साडेपाच बाय पाच फूट अंतरात लागवड केली जाते. लागवडीसाठी उंच गादीवाफा, ठिबक सिंचन तंत्राचा अवलंब केला जातो.
दरवर्षी फेब्रुवारी किंवा मार्चच्या सुरुवातीला चार एकरामध्ये गादीवाफ्यावर नऊ बाय पाच फूट अंतरावर पपईची लागवड असते. उन्हाळ्यात पपईमध्ये तिळाचे आंतरपीक घेतले जाते. यामुळे पिकाला आच्छादन मिळते. उष्णतेपासून संरक्षण होते. नोव्हेंबरमध्ये चार एकरात उसाच्या को-८६०३२ जातीची लागवड असते. साडेचार बाय एक फूट अंतराने बेण्याची लागवड होते. घरचेच बेणे लागवडीसाठी वापरले जाते.
दरवर्षी तीन एकरात जूनच्या पहिल्या आठवड्यात कापसाची पाच बाय दीड फूट या अंतरात ठिबकवर सरी पद्धतीने केली जाते. लवकर उत्पादन देणाऱ्या जाती ते निवडतात. एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर केला जातो. कामगंध सापळे, शिफारशीनुसार कीडनाशकांची फवारणी केली जाते. नोव्हेंबरमध्ये कापूस काढणीनंतर काबुली हरभऱ्याची लागवड असते.
भूषण यांना डॉ. मुकेश पाटील (गाढोदे), डॉ. सत्त्वशील पाटील (कठोरा), किरण पाटील (चोपडा), मनोज पाटील (सनपुले) आणि दीपक गुर्जर (अर्थे) या प्रयोगशील शेतकऱ्यांचे सातत्याने मार्गदर्शन मिळते. केळी उत्पादक संघातही सक्रिय आहेत. भूषण पाटील हे सालगड्यांसोबत दर आठवड्याचे नियोजन करतात. शेतीसंबंधी ज्ञान घेण्यासह, शेतकऱ्यांशी संपर्क वाढावा यासाठी रावेर, यावल, शिरपूर भागात शिवारफेरी काढतात. शेती नियोजनात भूषण यांना पत्नी सौ. शीतल यांचीही समर्थ साथ मिळाली आहे.
पीक उत्पादनात सातत्य ः
पाटील यांना सरासरी २० किलो केळीची रास मिळते. ऊस एकरी ४५ टन, सोयाबीन आठ क्विंटल, कापूस १० क्विंटल, हरभरा १० क्विंटल आणि पपईचे १८ टन उत्पादन मिळते. मध्यंतरी कापूस उत्पादन कमी झाले होते. परंतु योग्य जातीची निवड, सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा योग्य वापर आणि एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीवर भर देत त्यांनी पीक उत्पादनात वाढ केली. जमीन सुपीकतेसाठी त्यांचा पीक फेरपालटीवर भर आहे.
खरेदीदारांशी मैत्री ः
पाटील हे जागेवरच खरेदीदारास केळीची विक्री करतात. त्यातून व्यापारी, खरेदीदारांशी चांगला संपर्क तयार झाला आहे. यामुळे वाहतूक, मजुरी खर्चासह वेळेची बचत होते. केळीची काढणी सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये सुरू होते. या काळात सण उत्सव असल्यामुळे उठावही असतो. त्यामुळे दरही चांगले मिळतात. कापसाची देखील थेट विक्री होते. चोपडा किंवा मुक्ताईनगर (जि. जळगाव) येथील कारखान्यास ऊस पाठविला जातो. पपईची विक्री चोपडा, शिरपूर भागातील खरेदीदारांना जागेवर केली जाते. पीक उत्पादन खर्चाचा जमा- खर्च मांडत असल्याने दरवर्षी व्यवस्थापनात बदल केले जातात.
जमीन सुपीकतेकडे लक्ष
काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा व्हावा, सुपीकता टिकून राहण्यासाठी दोन-तीन वर्षाआड तीन ते चार एकरांत गाळाची माती मिसळली जाते. काठेवाडी बंधूंच्या गायींना थांबा देवूऊन शेणखत थेट जमिनीत मिसळले जाते. विविध पिकाचे अवशेष जमिनीत गाडण्यावर भर आहे. माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खते तसेच पाण्याच्या नियंत्रित वापरासंबंधी वेळापत्रक तयार केले आहे. येत्या काळात शेतीमध्ये यांत्रिकीकरणावर भर देण्याचे त्यांनी नियोजन केले आहे.
संपर्क ः भूषण पाटील, ९५४५६६३५००
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.