
Raigad News : रायगड जिल्ह्यात दोन-अडीच वर्षांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका मुरूड तालुक्यातील नारळ-पोफळीच्या बागांना बसला असून हजारो हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या अस्मानी संकटातून बागायतदार अजूनही सावरलेला नाही. त्यातच हवामानातील बदल आणि अचानक उष्णतेचे प्रमाण वाढल्याने तसेच बुरशीजन्य रोगामुळे सुपारी बागांमध्ये गळती सुरू झाल्याने शेतकरी धास्तावले आहेत. यंदा गतवर्षीच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुरूड तालुक्यात २०१९ मध्ये ७२५ खंडी (एक खंडी म्हणजे ४०० किलो) सुपारी पिकाचे उत्पन्न मिळाले होते; तर २०२१ मध्ये २७८ खंडी पीक हाती आले होते. २०२२ मध्ये ४०९ खंडी सुपारीचे उत्पादन मिळाले असले तरी यंदा पावसाने अचानक मारलेल्या दडीने उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सुपारीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. याशिवाय बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भावही वाढण्याची शक्यता आहे. खारुताई व वटवाघुळांचे सुपारी आवडते भक्ष्य असल्याने पिकाची नासाडीही होत आहे.
वातावरणात उष्मा वाढल्याने सुपारीच्या बागांमध्ये ओल्या सुपाऱ्यांचा खच पडलेला दिसतो. उंच झाडावर फवारणी करणे शक्य होत नाही वा कृषी विभागाकडूनही प्रभावी उपाययोजना होत नसल्याने सुपारी पीक धोक्यात आले आहे. तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र ४५०हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र ३९९ हेक्टर इतके आहे. मुरूड शहरासह आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला आदी ठिकाणी प्रामुख्याने सुपारी पिकवली जाते. निसर्गाच्या अवकृपेमुळे १४२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून दिवसेंदिवस उत्पादनात घट होत आहे.
साधारण मे ते जूनमध्ये सुपारीच्या झाडावर फळधारणा होते. हवामान अनुकूल असल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत सुपारी तयार होऊन फेब्रुवारी ते मार्चमध्ये ती काढण्यायोग्य होतात. सुपारीची झाडे आंतरपीक म्हणून नारळाच्या बागेत लावली जातात. माड ५० ते ६० फूट तर सुपारीची उंची २५ ते ३० फुटापर्यंत असते. पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर सुपारीची वाढ जोमात होते. मशागत व पाण्याचे योग्य नियोजन उत्तमरीत्या केल्यास प्रति एकर क्षेत्रात ४० मण सुपारीचे उत्पादन मिळू शकते.
रोठा सुपारीला मागणी
रायगड जिल्ह्यात मुरूड, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन रोठा सुपारीचा ब्रँड असून मुंबईसह आखाती देश, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात होते. या सुपारीतील पांढरा गर चवीला गोड लागतो. त्यामध्ये आरसेक्लोनीम रसायनाचे प्रमाण कमी असते. सुगंधी सुपारी व पान मसाल्यासाठी या सुपारीला विशेष मागणी असते.
जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल
जिल्ह्यात सुपारी लागवडीखालील क्षेत्र पाच हजार हेक्टरवर आहे. यातून दरवर्षी साधारणपणे ३५ ते ४० कोटींची उलाढाल होते. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीच्या बागा आहेत. नगदी पीक म्हणूनही सुपारी पिकाकडे पाहिले जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.