Marigold Market : बंगळूरच्या झेंडूची आवक पोहोचली दहा टनांवर

Zendu Rate : सण-उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर फुलांची आवक वाढती; संततधार पावसाचा स्थानिक उत्पादकांना फटका
Marigold Market
Marigold Market Agrowon
Published on
Updated on

विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Nagpur News : नागपूर ः पावसामुळे इतर पिकांसोबतच फुलपिकांचेही नुकसान झाले. परिणामी, स्थानिकस्तरावरून फुलांची अपेक्षित आवक होत नसून बंगळूरच्या चिकबेलापूर भागातील फुलांवरच नेताजी मार्केटची भिस्त असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. बंगळूरमधून सद्यःस्थितीत झेंडू आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे.

नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेताजी मार्केटमधून विदर्भातील अकरा जिल्ह्यांत फुलांचा पुरवठा होतो. गणपती, महालक्ष्मीसह व येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात झेंडूची आवकही वाढती आहे. सुमारे १० हजार किलो झेंडू बाजारात रोज दाखल होतो, असे घाऊक व्यापारी दत्तात्रय भावराव इंगळे यांनी सांगितले.
नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु गेले महिनाभर असलेल्या संततधार पावसाच्या परिणामी इतर पिकांसोबतच फुल उत्पादकांचेही नुकसान झाले. त्यामुळे चिकबेलापूर (बंगळूर) मधून झेंडू बाजारात येत असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारात झेंडूचे घाऊक दर सद्यःस्थितीत ८० रुपये किलो आहेत. १० ते २० रुपयांचा नफ्याचे समीकरण गृहीत धरून किरकोळ विक्रेते ९० ते १०० रुपयांप्रमाणे झेंडू विकतात. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत श्रावणामुळे देखील झेंडू व इतर फुलांना मागणी वाढल्याचे रोशन बेलगे या किरकोळ विक्रेत्याने सांगितले.

Marigold Market
Flower Market : दसऱ्यानिमित्त दोन दिवस झेंडूची आवक वाढणार

फुलाच्या गुच्छात (बुके) वापरण्यात येणाऱ्या जिप्सी या गवताची देखील मागणी आहे. सध्या बुके देण्याचा ट्रेंड वाढला असल्याने या गवताचे दरातही सातत्याने चढउतार होतात. हंगाम असलेल्या काळात साधारणतः ४५० ते ५०० रुपये असा दर जिप्सीला मिळतो. सद्यःस्थितीत २०० ते २५० रुपयांप्रमाणे याचे व्यवहार होत आहेत. अर्धा किलोच्या पॅकिंगमध्ये हे मिळते. पूर्वी नाशिक तसेच देशाच्या इतर भागांतून याचा पुरवठा होत होता. आता नागपुरातच रचना ॲग्री फार्ममध्ये पॉलिहाउसचा वापर करून याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे स्थानिक स्तरावरुनच हे उपलब्ध होते, असे दत्तात्रय इंगळे यांनी सांगितले. २० फुलांच्या गुलाब बंडलचा दर १०० ते १२० रुपये आहे. जरबेरा ७० रुपये बंडलप्रमाणे विक्री होते. निशिगंधाला २०० ते २५० रुपये किलोचा दर मंगळवारी (ता. १३) मिळाला. निशिगंधाची मागणी आणि आवक यावर त्याचे दर ठरतात. यात मोठे चढ-उतार होत असल्याची माहिती व्यापारी संजय सोनटक्‍के यांनी दिली.


गुलाब फुलांच्या पाकळ्यांनाही मागणी
सजावटकामी गुलाब फुलांच्या पाकळ्यांनाही नजीकच्या काळात मागणी वाढली आहे. गावरान गुलाब पाकळ्यांची रंगसंगती खुलणारी राहते. त्यामुळे याच फुलांच्या पाकळ्यांना मागणी असल्याचे रोशन बेलगे सांगतात. फुलांच्या पाकळ्या काही कालावधीनंतर आपोआप गळून पडतात. त्यांचाही आता सजावट क्षेत्रात उपयोग होत असल्याने याचे किरकोळ दर १०० रुपये किलोवर पोहोचले आहेत. लग्नसराईत हे दर यापेक्षाही अधिक असतात. गुलाब पाकळ्यांचे घाऊक दर ८० ते ९० रुपयांप्रमाणे आहेत.


नेताजी मार्केटमधून विदर्भातील ११ जिल्ह्यांत फुलांचा पुरवठा होतो. पावसाचा फटका बसल्याने स्थानिकऐवजी सध्या बंगळूरमधून झेंडूची आवक होत आहे. त्यासोबतच नाशिक, नगर या भागातूनही फुले येतात. ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सकाळी तोडणी केलेली फुले संध्याकाळी बाजारात येतात.
- दत्तात्रय इंगळे, व्यापारी, नेताजी फुल मार्केट, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com