Education System : ती आई होती म्हणुनी...
Agrowon

Education System : ती आई होती म्हणुनी...

एखाद्या रविवारी सुटीला घरी आलो की, आई माझा सुकलेला चेहरा वाचायची. माझ्या जीवाची उलघाल तिला बहुतेक जाणवत असायची. पण पुरुष प्रधान समाजातील एक महिला म्हणून घरातले निर्णय ती घेऊ शकत नव्हती किंवा त्यात फेरफार करू शकत नव्हती!

लेखक - भाऊसाहेब चासकर

--------------------------------

"आणला रे निकाल? 

"हं, आणलाय आई."

"काय झालं?"

"पास झालोय आई!"

आईला केवढा आनंद होत असे. मला

किती मार्क्स मिळालेत? मित्रांपैकी कोणाला किती?  कोणाचा कितवा नंबर आलाय? असले आजच्या जमान्यातल्या अति जागरूक पालकांसारखे प्रश्न तिनं कधीच विचारल्याचं मला आठवत नाहीये. खरं तर मी सतत काठावर पास व्हायचो. आठवीपर्यंत आमच्या निकालपत्रावर 'f1' असं लाल शाईच्या पेनानं लिहलेलं असायचं. एटीकेटीची सवलत घेऊनच आम्ही पास होत असू. 'पास झालं बास झालं!' असं जणू शालेय शिक्षणातलं आमचं ब्रीद होतं! दहावीत जेमतेम मार्क्स मिळालेले असताना पुढे इच्छेविरुद्ध मला शिकायला संगमनेरला पाठवलं. मला तिकडचं वातावरण मला अजिबात मानवलं नाही. विज्ञान शाखेचे सारे विषय इंग्रजीतून शिकावे लागत. मला जमेनात. खरं म्हणजे माझ्यावर तो सरळ सरळ अन्यायच होता! 

रूमवर आलो, एकटा असलो की, हमसूहमसू रडायचो. मनातल्या मनात खूप चरफड व्हायची. कुठेतरी दूरदूर पळून जावंसं वाटायचं. मनातला आकांत कोणाला सांगता येत नव्हता, सहनही होत नव्हता! खूपच अवघडल्यासारखी अवस्था झाली होती.

एखाद्या रविवारी सुटीला घरी आलो की, आई माझा सुकलेला चेहरा वाचायची. माझ्या जीवाची उलघाल तिला बहुतेक जाणवत असायची. पण पुरुष प्रधान समाजातील एक महिला म्हणून घरातले निर्णय ती घेऊ शकत नव्हती किंवा त्यात फेरफार करू शकत नव्हती!

Education System : ती आई होती म्हणुनी...
ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी

अखेर जे व्हायचं होतं तेच झालं. अकराव्या वर्गात मी एक-दोन नव्हे तर तीन विषयांत फेल झालो. त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा घरी यायला पाय नको म्हणत होते. पास झालेल्या मुलांचे चेहरेसुद्धा बघू वाटत नव्हतं. स्वतः चाच स्वतःला अपमान वाटत होता. सालं आपण काही लायकीचे नाही आहोत असं वाटे. कोणालाच तोंड दाखवू नये, अशी वैफल्यग्रस्त मानसिकता बनली. अर्थात जोरदार वाऱ्याच्या झोताने एखाद्या शिखराला वेढलेले धुके दूर जाते, तशी ती अवस्था काही क्षण टिकली. आई आहे, ती आपल्याला नक्की समजून घेईल, असा भक्कम विश्वास मनात जागा झाला. तिचा मोठा आधार वाटू लागला. घराकडे नेणारी बस पकडली.

घरी आलो, झोपून घेतलं. आईनं कारण विचारल्यावर नापास झाल्याचं तिला सांगितलं. तिनं 'बातमी' कुटुंबातल्या इतर सर्व म्हणजे दहा सदस्यांना सांगितली. माझं काम हलकं केलं. त्याच्यावर कुणीही रागावू नका, असंही ठणकावून सांगितलं. मला फार बरं वाटलं. "यंदाच्या साली फेल झाला ना होऊ दे, म्होरच्या साली नक्की पास व्हशील!" असं म्हणत तिनं माझी समजूत घातली. सांत्वनाचे तिचे शब्द आठवले की आजही शहारल्यासारखं होतं!

पुढे संगमनेरहून अकोल्याला शिकायला आलो. अकरावी कला या वर्गात नव्याने प्रवेश घेतला.  संगमनेर आणि सायन्स सोडून नापास होऊन आलेलो असल्याने, 'हे महाशय आता आयुष्यात काहीही करू शकणार नाहीत', अशी खात्रीच आई वगळता कुटुंबातल्या इतर सदस्यांची झाली होती म्हणा. गावातली भावकीतली पोरं शिकली होती, नोकरी करत होती. दहावी पास झालेला सहा भावंडातला मी एकमेव सदस्य होतो. मी काहीतरी शिकावं, नोकरी धरावी, सगळ्यांनी शेतीवर राहू नये, अशी आईची अतीव इच्छा होती.

पुढे माझ्यात काय बदल झाले, हे मला माहिती नाहीत. पण ४८० मुलांध्ये मी अकरावीत पहिला आलो. बारावीतही कॉलेजात दुसरा आलो. डीएडच्या पहिल्या वर्षी नगर जिल्ह्यात सर्वाधिक मार्क्स मला मिळाले होते. दुसऱ्या वर्षी जिल्ह्यात पहिल्या तिनात आलो होतो. शिवाय डीएडला असतानाच सकाळी साडेसातला कॉलेजला जायचो, दुपारी कुठल्या तरी शाळेत पाठ घ्यायला जावं लागे.  सायंकाळी सहा ते दहा-साडे दहा पर्यंत लोकसत्तेच्या कार्यालयात मुद्रितशोधक (प्रूफरिडीर) म्हणून अर्धवेळ काम करत असे. दिवसभर सायकल मारून मारून जीव नखात यायचा. मेसचे जेवण आवडत नसे, मी आणि माझा रुममेट असलेला अजित रेपाळे रूमवर स्वयंपाक बनवायचो. डीएड झालो. गावी निघालो तेव्हाचे लोकसत्तेच्या नगर आवृत्तीचे मुख्य वार्ताहर महादेव कुलकर्णी म्हणाले 'माझं ऐक. शिक्षक होऊ नकोस. तुझं अक्षर, शुद्धलेखन छान आहे. लिहायला शिकशील तर पत्रकारितेत चांगलं करिअर करशील.' ते मला सुचवत होते ते मनावर घेतलं नाही. घरी आलो. मी दोन वर्षांत नेमकं काय शिकलोय? यातलं आईला काहीही माहीत नव्हतं. पण पुढे जेव्हा मी शाळामास्तर झालो, तेव्हा लेकाला 'सरकारी नोकरी' मिळाली म्हणून आईला खूप आनंद झाला. मला अजूनही तिचा चेहरा आठवतो.

चुका करायचं आणि नापास होण्याचंही स्वातंत्र्य देणारी, पडत्या काळात, अडचणीच्या दिवसांत खंबीर पाठिंबा देत मागे उभी राहणारी, 'पुढच्या वेळी नक्की पास व्हशील' असं सांत्वन करत समजावत, तू काहीतरी करू शकतो असा विश्वास ठेवणारी, चुकलो म्हणून प्रसंगी पाठीत जोराने धपाटे घालणारी तरीही अत्यंत प्रेमळ आई मला मिळाली. शेतकरी समाजातली एक सामान्य स्त्री म्हणून वाट्याला आलेल्या व्यथा-वंचना यावर मात करून तिनं आमच्यासाठी भरपूर केलं. खरंच किती ग्रेट होती माझी आई.

'माह्या लेकाच्या लय लोकांशी वळखीपाळखी हायेत, हे ती अभिमानानं तिच्या संगती-सोबतीणींना केवढ्या अभिमानानं सांगायची. पैशापेक्षा माणसं कमावणं महत्त्वाचं हा तिचाच संस्कार माझ्या आयुष्याची सोबत करतोय. आज सहजच हे सारं आठवलं. हे लिहिताना तिच्या आठवणींनी डोळे पाणावले...

सध्या मी माझ्याच गावातल्या शाळेत शिकवतोय. मुलांच्या शिकण्याबाबत पालकांच्या कल्पना काय आहेत ते बघतोय. ठिकठिकाणी पालक सभांतून बोलायला जातो, तेव्हा मुलांच्या शिकण्याबाबतच्या पालकांच्या मनातल्या चिंता, काळज्या ऐकतोय, समजून घेतोय. ग्रामीण भागातले पालक शिक्षणाबाबत जागरूक झालेत, हे ठीक आहे. पण मध्यमवर्गीय पालकांचं तर विचारुच नका. मुलं म्हणजे आपल्या अतृप्त इच्छा आकांक्षा पूर्ण करायचं माध्यम वाटतेय अनेकानेक पालकांना. घोड्यासारखे पालक मुलांवर स्वार होताहेत. मुलांची शाळा, शिकायचं माध्यम, मुलांचे मित्र, मुलांना केजीपासून किती मार्क्स मिळाले पाहिजेत? असं सारं सारं नियोजन पालक करत असल्याचं पाहून फार वाईट वाटतं. मूल काय आहे? मूल कसं शिकतं? याची नीट समज नसलेल्या पालकांच्या हातात मुलांच्या जगण्याचा रिमोट कंट्रोल जाणं म्हणजे मला ही मुलांच्या आयुष्यातली अनावश्यक लुडबूड वाटते. मुलांना सांगता येत नसलं तरी ही गोष्ट मुलांना आवडत नसते. पालक ही गोष्ट मुद्दामहून, जाणीवपूर्वक करत नसले तरी मुलांच्या आयुष्यातला अनावश्यक हस्तक्षेप मुलांची स्वतंत्र व्यक्ती म्हणून होणारी वाढ आणि सर्वांगीण विकासाच्या आड येणारा मुद्दा ठरू शकतो याचे सतत भान ठेवायला हवं.

माझ्या आईनं असा हस्तक्षेप कधी केला नाही. हसण्या-खेळण्याचं मनमुराद स्वातंत्र्य आम्हा भावंडांना मिळालं. मागे वळून बघताना कधी कधी असं वाटतं, की बरं झालं आपण काही वर्षं आधी जन्मलो. ज्या काळात आपल्या आईला शिकण्यातली स्पर्धा, करिअर, पॅकेज असले कोणतेच शब्दच माहिती नव्हते! कदाचित त्यामुळेच आमचं बालपण आम्हाला एन्जॉय करता आलं, समृद्ध जगता आलं. मला आताची अनेक मुलं याबाबतीत अभागी जीव वाटतात!

विद्यार्थीदशेतली मुलं म्हणजे मार्क्स मशीन्स आणि पुढे जाऊन तारुण्यात प्रवेशलेली मुलं म्हणजे मनी मशीन्स नाहीत हो! 'मूल म्हणजे स्वतंत्र व्यक्ती' हे बाल मानसशास्रातले तत्त्वज्ञान वगैरे वाचलेलं, ऐकलेलं नसताना आम्हाला पुरेपूर स्वातंत्र्य देणारे पालक भेटले, हे आमचं नशीब!

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com