Banana Orchard Care : वाढत्या तापमानात केळी बागेची काळजी

सध्या किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानाचा केळी पिकावर विपरीत परिणाम होतो.
Banana
Banana Agrowon

डॉ. चंद्रशेखर पुजारी, अंजली मेंढे, डॉ. गणेश देशमुख

Temperature Update : सध्या जून-जुलै महिन्यातील केळी लागवड (Banana Cultivation) निसवणीच्या किंवा निसवण सुरू झालेल्या अवस्थेत आहेत. तर फेब्रुवारी लागवडीच्या बागांमधील रोपे स्थिरावून शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत.

सध्या किमान व कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. वाढत्या तापमानाचा केळी पिकावर (Temperature Effect Banana Crop) विपरीत परिणाम होतो.

उन्हाळ्यात किमान व कमाल तापमानात बऱ्यापैकी वाढ होते. तसेच हवेतील आर्द्रता कमी होते. त्यामुळे हवामान उष्ण व कोरडे राहते. या काळात सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि वाऱ्याचा वेग वाढतो.

काही वेळा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता असते. मागील आठवड्यात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

हवामानातील बदलांचा केळी बागेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी बागेची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Banana
Banana Rate : खानदेशात केळी दर स्थिर

व्यवस्थापनातील बाबी

१) मृग बागेतील केळफूल व शेवटची फणी कापून घडावर पोटॅशिअम डायहायड्रोजन फॉस्फेट ५० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम स्टिकरसह १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पुन्हा १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

२) घडाची गुणवत्ता राखण्यासाठी घड ६ टक्के सच्छिद्रता असलेल्या पॉलिथीन पिशव्यांनी झाकून घ्यावेत.

३) घडाच्या वाढत्या वजनामुळे केळी झाडाचे खोड वाकून मोडण्याची शक्यता असते. त्यासाठी झाडांना आधार देणे आवश्यक असते. आधार देण्यासाठी पॉलिप्रॉपीलीन पट्ट्यांच्या साह्याने किंवा बांबूचा वापर करावा.

४) बऱ्याच वेळा वादळी वाऱ्यांमुळे बागेतील झाडे मोडून उन्मळून पडण्याची शक्यता असते. त्यासाठी केळी बागेभोवती संजीव कुंपण म्हणून शेवरी लागवड फायदेशीर ठरते.

शेवरी लागवड केली नसल्यास शेडनेटचा वापर करावा. परंतु कुंपणासाठी शेडनेट लावताना त्याची उंची बागेतील झाडांच्या उंचीपेक्षा थोडी जास्त असावी.

५) जून, ऑक्टोबर व फेब्रुवारी या सर्व लागवडीतील बागेत उसाचे पाचट, गव्हाचे काड किंवा हरभऱ्याचा भुस्सा वापरून आच्छादन करावे. तसेच झाडांवर केओलिन ८० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

६) सध्या फेब्रुवारी लागवडीतील केळी रोपे स्थिरावून शाकीय वाढीच्या अवस्थेत आहेत. वाढत्या तापमानाचा केळी रोपांच्या वाढीवर परिणाम होऊ नये यासाठी बागेभोवती ताग लावून घ्यावे.

Banana
Banana Orchard Damage : वाशिंबे परिसरात वादळी वाऱ्याने केळी बागा जमीनदोस्त

खत, सिंचन व्यवस्थापन

ऑक्टोबर लागवडीतील केळी बागेस युरिया ८२ ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून मात्रा द्यावी. ठिबक सिंचनातून युरिया १३ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ८.५ किलो प्रति १ हजार झाडे याप्रमाणे दर आठवड्याला द्यावे.

मृगबाग केळीसाठी युरिया ५.५ किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश ७ किलो प्रति १ हजार झाडांना प्रति आठवडा प्रमाणे ठिबक सिंचनातून द्यावे.

जून, जुलै लागवडीच्या बागेला १४ ते १६ लिटर पाणी, ऑक्टोबर लागवडीस ९ ते ११ लिटर, तर फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या बागेस ४.५ ते ६.५ लिटर पाणी प्रति झाड प्रति दिन या प्रमाणे द्यावे.

डॉ. चंद्रशेखर पुजारी, ९४२०९४३१४६, (अखिल भारतीय समन्वयित फळ सुधार प्रकल्प, केळी संशोधन केंद्र, जळगाव)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com