
Amravati News : पारंपरिक पिकाच्या जोडीला शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी काही क्षेत्रावर केळीसारख्या तत्सम पिकाची लागवड केल्यास त्यातून हमखास उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या फायदेशीर शेतीचा पॅटर्न राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने बुधवारी (ता. २५) आयोजित राज्यस्तरीय केळी पीक परिषदेत ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, कोशाध्यक्ष दिलीप इंगोले, त्रिची (केरळ) येथील केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन,
केळी पीक तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, खेड (पुणे) येथील माजी खासदार व केळी उत्पादक शेतकरी अशोक मोहोड, सोलापूर येथील युवराज शिंदे, सुभाष बनसोड, प्रशांत भोयर, सुधीर भोंगळे, केशव मेतकर, सी. एम. देशमुख, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांची या वेळी उपस्थिती होती.
केळी तज्ज्ञ डॉ. के.बी. पाटील यांनी केळी पिकातील व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींची माहिती दिली. केळीचे उत्पन्न वाढीत उत्पादकता खर्च कमी करणे गरजेचे आहे. त्याकरिता शेतकऱ्यांनी माती परीक्षणाच्या माध्यमातून मातीची गरज ओळखत त्यानुसार अन्नद्रव्याचा पुरवठा केला पाहिजे. त्याशिवाय उत्पादकता खर्च नियंत्रणात येणार नाही. पिकाला आवश्यकतेपेक्षा अधिक पाणी देखील नुकसानकारक ठरते. त्यामुळे नियोजनबद्ध प्रमाणात पाणी दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. सेल्वराजन म्हणाले की, भारतात केळीखालील क्षेत्र कमी असताना उत्पादकता मात्र महाराष्ट्राची देशात सर्वाधीक आहे. त्यामागे शिफारशीत पद्धतीनुसार पिकाचे व्यवस्थापनात या भागातील शेतकऱ्यांचा हातखंडा असणे हे मुख्य कारण असल्याचे सांगितले.
प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार
भगवंत इंगळे (वरना, खामगाव, बुलडाणा), उमेश भोंडे (अंजनगाव, अमरावती), विकास देशमुख (पणज, अकोट), कुंदन वाघमारे (पवनार, वर्धा), श्रीकांत धोंडे (इनायतपूर, चांदूर, अमरावती), महम्मद आशीक महम्मद अन्सारी या प्रयोगशील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.