ऋतुजा नाळे, डॉ. एस. ए. रणपिसे
Grape Farming : द्राक्ष हे निर्यातीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे फळपीक आहे. सध्या देशात १.७२ लाख हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. त्यातून उत्पादीत होणाऱ्या फक्त ८ ते १० टक्के आंतरराष्टीय बाजारपेठेत निर्यात होते. एकूण उत्पादनाच्या २६ ते २८ टक्के बेदाणा निर्मितीत, २ टक्के मद्य व रस निर्मिती आणि इतर स्थानिक बाजारपेठेत
ताज्या खाण्याकरता वापरले जाते. त्यामुळेच उत्तम प्रतीच्या द्राक्ष उत्पादनासाठी बागेतील कॅनोपी व्यवस्थापन, अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅनोपी व्यवस्थापनामध्ये वेलीवरील काड्याची संख्या व पानाची संख्या, घडाची व घडातील मण्याची संख्या आणि संजीवकाचा योग्य संतुलित वापर यावरच चांगली प्रत अवलंबून असते.
फळ छाटणीनंतरच्या घडाच्या अवस्था
आपल्याकडील भागात फळ छाटणी ही साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. द्राक्ष जातीनुसार फळ परिपक्व होण्याकरता साधारणतः ११० ते १५० दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत द्राक्ष घड हा विकासाच्या वेगवेगळ्या टप्यात दिसून येतो. उदा. प्रीब्लूम अवस्था, फुलोरा अवस्था, मणी विकासाची अवस्था, मण्यात पाणी उतरणे व मण्यात गोडी येण्याची अवस्था इ. वाढीच्या या वेगवेगळ्या अवस्थेत द्राक्ष जातीनुसार संजीवकाचा वापर खालीलप्रमाणे करणे शक्य आहे.
लांब मण्याच्या द्राक्ष जातीमध्ये संजीवकांचा वापर
आपल्याकडे सोनाका, माणिक चमन, सरिता सीडलेस, कृष्णा सीडलेस, एसएसएन इ. लांब मण्याच्या द्राक्ष जाती आढळून येतात. थॉमसन सीडलेसच्या तुलनेत या द्राक्ष जातीच्या विकासाकरिता संजीवकांचा वापर वेगळ्या प्रकारे केला जातो. प्रीब्लूम अवस्थेत जीए ३ हे १० पीपीएम आणि १५ पीपीएम या प्रमाणे फवारणी केल्यानंतर पुढे फुलोरा अवस्थेत मात्र जीए३ चा वापर अत्यंत काटेकोरपणे करायचा असतो. त्याचे वेळापत्रक साधारणपणे असे ठेवता येईल.
प्री ब्लूम अवस्था - जीए३ @ १० पीपीएम
१५ दिवसानंतर- जीए३ @ १५ पीपीएम
२५ टक्के फुलोरा अवस्था - जीए३ @ १० पीपीएम
५० टक्के फुलोरा अवस्था - जीए३ @ १० पीपीएम
७० टक्के फुलोरा अवस्था - जीए३ @ १० पीपीएम
९० - १०० टक्के फुलोरा अवस्था - जीए३ @ ५० पीपीएम + आयएए १० पीपीएम
८ दिवसानंतर - जीए३ @ ४० पीपीएम
(* टीप - आपल्या बागेतील जमिनीचा प्रकार व बागेतील वातावरणानुसार जीए३ च्या वेळापत्रकात काही फेरफार करावे लागतात.)
संजीवकाची गरज नसलेल्या द्राक्ष जाती
काही द्राक्षजातीच्या बियामध्ये ऑक्झिन्स असल्यामुळे मण्याच्या विकासाकरिता बाहेरून संजीवकाचा वापर करण्याची गरज नसते. (उदा. मांजरी मेडिका, रेड ग्लोब, दिलखुष, चिमा साहेबी इ.) तर याच तुलनेत बिनबियाच्या द्राक्ष जातीमध्ये स्वयं विरळणीचे (सेल्फ थिंनिंग) गुणधर्म असल्याने त्यांनाही संजीवकाची गरज पडत नाही. (उदा. फँटसी सीडलेस, क्रिमसन सीडलेस, मांजरी नवीन इ.) परंतु या द्राक्ष जातीमध्ये ८ ते १० मिमी मणी अवस्थेत जीए३ @ ५ पीपीएम या प्रमाणात दिल्यास मण्यांचा आकार थोडाफार वाढण्यास मदत होते.
संजीवकाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...
बऱ्याचवेळा बागायतदार बागेत शिफारशीप्रमाणे संजीवकांचा वापर करूनही अपेक्षित मण्यांचा विकास होत असल्याचे दिसत नाही. याकरिताजमिनीचा प्रकार, वातावरणातील तापमान, द्राक्षवेलीची व पानांची अवस्था इ. बऱ्याच गोष्टी जबाबदार असतात. त्यापैकी नेमक्या कोणत्या बाबीमध्ये समस्या येत आहे, हे जाणून उपाययोजना कराव्यात. संजीवकांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
फवारणीकरिता वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सामू (pH) ६.५ ते ७ असावा.
तयार केलेल्या संजीवकांच्या द्रावणाचा सामू ५.५ ते ६ असावा.
सामू नियंत्रणात ठेवण्याकरिता सायट्रीक ॲसिड किंवा युरिया फॉस्फेट चा वापर करता येईल.
बागेत ६० टक्के आर्द्रता असताना फवारणी करावी.
वेलीची पणे द्रावण शोषून घेण्याकरता सक्षम असतील अश्यावेळी फवारणी करावी.
संजीवकांच्या अतिरेकामुळे
होणारे परिणाम
द्राक्ष घडाच्या विकासाकरिता बागेत द्राक्षजात व वाढीची अवस्था यानुसार वेळापत्रक ठरवले जाते. शिफारसीनुसार वापर करण्याचे टाळून शेतकरी एका संजीवकासोबत दोन ते तीन (त्याच वर्गातील परंतु दुसऱ्या नावाच्या) संजीवकांचा वापर करतात. मात्र असे केल्यास मात्रा जास्त होऊन त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. घडामध्ये कॉयलिंग होणे, घडाच्या दांड्यावर गाठी येणे व काडीवर गाठी येऊन चिरा पडणे इ. समस्या आढळून येतात. यावर खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
एकावेळी एकापेक्षा जास्त संजीवकाचे मिश्रण टाळावे.
बाजारात उपलब्ध असलेले संजीवक वापरण्यापूर्वी खात्री करून घ्यावे.
विपरीत परिणाम होत असल्याचे लक्षात आल्यास बागेत पाण्याच्या २ ते ३ फवारणी करून घ्याव्यात. त्यासोबत अर्धा ते एक ग्रॅम युरिया मिसळू शकता.
शेंडा खुडणे थांबवून ३ ते ४ पाने पुन्हा वाढू द्यावीत.
प्रीब्लूम अवस्थेत पाकळ्यांचा विकास करणे
फळछाटणीनंतर ही अवस्था साधारणतः १८ दिवसांनंतर सुरू होते. उत्तम निर्यातक्षम द्राक्षे तयार होण्याच्या दृष्टीने प्रीब्लूम अवस्थेत २ पाकळ्यातील अंतर व पाकळीची लांबी वाढवणे महत्त्वाचे असते. याकरिता जीए३ हे संजीवक १० पीपीएम या प्रमाणात वापरता येते. या फवारणीनंतर ५ दिवसांनी १५ पीपीएम प्रमाणे दुसरी फवारणी करण्याची शिफारस असते. या फवारणीमुळे प्रीब्लूम अवस्थेतील घडाच्या पेशींचे विभाजन होणे, या पेशींची वाढ होणे या प्रक्रियेला वेग येतो. परिणामी सुटसुटीत घड तयार होण्यास मदत होते.
पोंगा अवस्थेत संजीवकाचा वापर
फळ छाटणी केल्यानंतर ८ ते ९ व्या दिवसात ही अवस्था आढळून येते. या वेळी बागेत जर सतत पाऊस किंवा ढगाळी वातावरण असेल, तर वेलीमध्ये जिबरेलिनचे प्रमाण वाढते. सायटोकायनीनचे प्रमाण कमी होते. वेलीत सायटोकायनीनचे प्रमाण वाढविण्यासाठी सायटोकायनिनयुक्त संजीवकाचा वापर महत्त्वाचा असतो. म्हणूनच पोंगा ते दोन पानांच्या अवस्थेपर्यंत ६ बीए १० पीपीएम किंवा क्लोरमेक्वाट क्लोराईड (सीसीसी) (अनेक्श्चर ५) च्या शिफारशीप्रमाणे किंवा सीपीपीयू ०.३ ते ०.४ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करता येईल.
एकसारखा रंग मिळण्याकरिता संजीवकांचा वापर
आगाप (जून-जुलै) फळछाटणी घेतलेल्या द्राक्ष बागेत मण्यात पाणी उतरण्याची अवस्था नोव्हेंबर -डिसेंबर महिन्यात दिसून येते. यावेळी वातावरणातील तापमान फारच कमी असून, सूर्यप्रकाशसुद्धा कमी उपलब्ध असतो. त्यामुळे मण्यात एकसारखा रंग मिळणे कठीण होते. रंगीत जाती (उदा. नानासाहेब पर्पल, शरद सीडलेस, सरिता सीडलेस, कृष्णा सीडलेस इ.) लवकर छाटल्या जातात. यावेळी एकसारखा रंग मिळण्याकरता इथेफॉन या रसायनाचा वापर ०.५ मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणे घडातील ४ ते ५ मणी गुलाबी रंगाचे होताच फवारणीच्या माध्यमातून करावा. दुसरी फवारणी ८ दिवसानंतर तितक्याच मात्रेने करता येईल. (इथेफॉन अनेक्श्चर ५ मध्ये समाविष्ठ.) ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात फळछाटणी घेतलेल्या रंगीत जातीच्या द्राक्ष बागेत इथेफॉनची फवारणीची गरज नसते. या काळात इथेफॉनचा वापर केल्यास घड लूज पडण्याची शक्यता असते.
प्रीब्लूम अवस्थेतील संजीवकांचा वापर
फळछाटणीच्या साधारणतः ३५ दिवसांनंतर फुलोरा अवस्था सुरू होते. या अवस्थेत काही प्रमाणात फुलोरा घड होणे गरजेचे असते. एका द्राक्षघडात साधारणतः ६०० ते ७०० मणी दिसून येतील. निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षघड तयार होण्याकरिता १०० ते १२० मणी, तर बेदाण्याकरिता ४५० ते ५०० मणी इतकी गरज असते. म्हणूनच मणी सेटिंगपूर्वी नैर्सर्गिक गळ करून घेणे अपेक्षित असते. ही गळ करतेवेळी बऱ्याचदा पूर्ण द्राक्ष घड खाली झालेला दिसून येतो. जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याची उपलब्धता याचा ताळमेळ बसत नसल्यामुळे ही समस्या निर्माण होते. फुलोरा अवस्थेत परागकण मरतात आणि आपल्याला नैसर्गिक गळ मिळते.
मणी विकासात संजीवकांचा वापर
मणी सेटिंगनंतर मण्यांचा विकास फार महत्त्वाचा असतो. मणी सेटिंग झाल्यानंतर ३ ते ४ मि.मी. अवस्थेत जीए ३ हे संजीवक ४० पीपीएम अधिक सीपीपीयू १ मि.लि. प्रति लिटर किंवा ६ बीए १० पीपीएम यांचा वापर फायद्याचा ठरतो. संजीवकांच्या या द्रावणात घड बुडवून घेणे किंवा घडावर व्यवस्थित कव्हरेज मिळेल अशी फवारणी करून घेणे फायद्याचे ठरेल. यानंतर पुन्हा साधारणतः ८ दिवसांनंतर जीए ३ हे संजीवक ३० पीपीएम व सीपीपीयू १ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे घड बुडवून घेणे किंवा फवारणी करावी. यावेळी सोर्स आणि सिंक चांगले कार्य करत असल्यामुळे मण्यांचा विकास झपाट्याने होतो. सोर्स - सिंक बळकट करण्याकरिता घडात मण्याची संख्या व घडाच्या पुढे पानाची संख्या (१६० ते १६० वर्ग सेंटीमीटर आकाराची १० ते १२ पाने ) गरजेची असतात.
- ऋतुजा नाळे, ७७०९१७४९९१
(आचार्य पदवी विद्यार्थिनी, फळबागशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.