Animal Feed : संक्रमण काळात हवा संतुलित पशुआहार

Animal Husbandry : प्रसूतीदरम्यान खर्च होणारी ऊर्जा तसेच दूध उत्पादनात अचानक वाढ झाल्याने गाईच्या रोगप्रतिकारक शक्तीवर ताण पडतो, त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. म्हणून संक्रमण काळात गाई, म्हशींना योग्य आहार आणि व्यवस्थापनाची गरज असते.
Livestock
LivestockAgrowon
Published on
Updated on

डॉ. मयूरी धुमाळ

Livestock Update : दुग्ध व्यवसायामध्ये गाभण जनावरांचा संक्रमण कालावधी महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये पशुपोषण, आरोग्य आणि गोठा व्यवस्थापन यावर काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे असते. विण्यापूर्वी तीन आठवडे आणि व्यायल्यानंतर तीन आठवडे हा टप्पा जनावरांच्या आटवलेला कालावधी आणि दूध देण्याचा कालावधी यातील समतोल राखून जनावरांना व्यायल्यानंतर त्यांच्या क्षमतेनुसार दूध उत्पादन देण्यास यशस्वी ठरवण्यास मदत करतो.

या कालावधी दरम्यान पशू अनेक शारीरिक बदलांच्या आव्हानांना सामोरे जातात. त्यामुळे योग्य पोषणाला प्राधान्य देणे, शरीराच्या स्थितीचे निरीक्षण, ताणतणाव व्यवस्थापन आणि चयापचय विकार रोखणे हे संक्रमण गायींचे आरोग्य आणि उत्पादकता सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत.

बरेच पशुपालक गाय आटविल्यानंतर खुराक देणे बंद करतात. परंतु या कालावधीत गाभण जनावरांमध्ये वासराचे वजन सर्वाधिक प्रमाणात वाढत असल्याने पोषण कमतरतेमुळे गाय आणि गर्भाशयातील वासरू यांच्यावर विपरीत परिणाम होतो.

पुरेशी काळजी न घेल्यास चयापचय विकार-केटोसिस-दुग्धज्वर, वार अडकणे, त्रासदायक प्रसूती सारख्या समस्या येण्याची शक्यता असते. हे आजार गायीचे आरोग्य आणि उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम करू शकतात. विल्यानंतर गायीच्या शरीरातून अचानक कमी होणारे वासरू आणि इतर घटकांचे वजन, प्रसूतीदरम्यान खर्च होणारी ऊर्जा तसेच दूध उत्पादनात अचानक वाढ झाल्याने गायीच्या रोगप्रतिकारक शक्तीवर प्रचंड ताण पडतो.

ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. परिणामी दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून संक्रमण काळात योग्य आहार व व्यवस्थापनाची गरज असते.

Livestock
Animal Feed : पशुखाद्य बॅगवर घटक न नोंदविणाऱ्यांवर कारवाई करा

शुष्क आहार सेवन

प्रत्येक जनावराची आहाराची गरज ही त्याच्या शरीराच्या वजनावर अवलंबून असते. त्याकरिता शरीरपोषणाकरिता किमान २.५ ते ३ टक्के शुष्क आहार देणे गरजेचे असते. संक्रमण कालावधीत वासरांची वजन वाढ सर्वाधिक असल्याने पोटावर तणाव येऊन आहार सेवन कमी होते. त्यामुळे शुष्क आहार सेवन पुरेशा प्रमाणात असल्याची खात्री करावी.

गायींना त्यांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करण्यासाठी उच्च-गुणवत्तेचा चारा मुबलक प्रमाणात आणि गाभण जनावरांसाठी बनविलेला संतुलित पशुआहार देणे आवश्यक आहे.

संतुलित पशू आहार

गर्भधारणेदरम्यान संक्रमण कालावधीत जनावरांमध्ये महत्त्वपूर्ण संप्रेरक बदल घडतात. त्याकरिता योग्य पोषणमूल्य जीवनसत्त्व, खनिजे आणि चयापचय सुधारण्यासाठीचे संतुलित आहार द्यावा.

गाभण काळात आटवल्यानंतर (सातव्या महिन्यापासून ते आठवा महिन्यापर्यंत) सर्वसाधारण पशुआहार शरीर पोषणाव्यतिरीक्त २ ते २.५ किलो आणि शेवटचा महिना ते व्यायल्यानंतर १५ ते २१ दिवस किमान ३.५ ते ४ किलो प्रतिदिवस इतका गाभण पशूंसाठी बनविलेले ट्रान्झिशन पशुखाद्य द्यावे. त्यामुळे गर्भाची योग्य वाढ व वजन होण्यास मदत होते.

Livestock
Animal Feed : पशुपक्षी खाद्याच्या बॅगवर होणार अन्नघटकांची नोंद

प्रथिने गुणवत्ता आणि प्रमाण

गायीचे संपूर्ण आरोग्यास आणि निरोगी जार/वार/गर्भ आवरणपेशी विकासासाठी आहारात पुरेसे आणि उच्च-गुणवत्तेचे प्रथिने आहेत याची खात्री करावी.

पुरेसे पोषण निरोगी जार/वार/गर्भ आवरणपेशी विकासास मदत करते. चयापचय असंतुलनाचा धोका कमी करते, जे जार /वार अडकण्याचा समस्या कमी होण्यास मदत करते.

खनिज पूरक, जीवनसत्त्व

योग्य खनिज पूरकता, विशेषत: कॅल्शिअम आणि फॉस्फरसचा पुरेसा पुरवठा होणे आवश्यक आहे. प्रसूतीदरम्यान गर्भाशयाच्या आकुंचनासह स्नायूंच्या कार्यासाठी योग्य खनिज संतुलन महत्त्वाचे आहे.

विशेषत: जीवनसत्त्व ई आणि सेलेनियमची पुरेशी पातळी सुनिश्चित करावी. हे रोगप्रतिकारक कार्य आणि संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.

चारा /तंतुमय पदार्थ

पचनास योग्य गुणवत्तायुक्त मुबलक हिरवा, सुका चारा पुरेशा प्रमाणात द्यावा. हिरव्या चाऱ्यातून जीवनसत्त्व आणि पोषण घटकांचे आतड्यांमध्ये पचन होण्यासाठी आहारात चांगले पाचक पदार्थ असावेत.

पाण्याची उपलब्धता

संक्रमण काळात गर्भाची योग्य वाढ, चयापचय, गर्भाशयातील वासराच्या पिशवीतील पोषण द्राव समतोल राखण्यासाठी तसेच शरीरक्रियेसाठी पाणी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पशूंना नेहमी स्वच्छ आणि मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. संपूर्ण आरोग्य, पोषकद्रव्य शोषण आणि चयापचय संतुलन राखण्यासाठी योग्य हायड्रेशन महत्त्वपूर्ण आहे.

शरीर रचनेचा अभ्यास

गाभण गायींमध्ये शरीराच्या इष्टतम स्थितीचे नियमितपणे परीक्षण आणि देखभाल करावी. ज्या गायी खूप अशक्त किंवा खूप लठ्ठ आहेत त्यांना धोका जास्त असू शकतो.

शरीराची इष्टतम स्थिती राखण्यासाठी आवश्यकतेनुसार आहार द्यावा. संक्रमण काळात दिला जाणारे पशुखाद्य कासेच्या पेशींची योग्य वाढ व आरोग्य राखण्यास मदत करून दूध उत्पादन वाढीस मदत करते.

तणाव व्यवस्थापन

तणाव कमी केल्याने गायीचे संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत होते. जनावरांना बसण्यासाठी आरामदायी जागा असावी. सौम्य हाताळणी करावी.

- डॉ.मयूरी धुमाळ, ९९६७३७००४७

(लेखिका पशूपोषण तज्ज्ञ आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com