
Jalgaon News : खानदेशात बाजरी पीक जोमात आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक निसवणीच्या अवस्थेत आहे. पिकात तणनियंत्रण, खते देण्यासह अन्य कार्यवाही शेतकऱ्यांनी केली आहे. खानदेशात बाजरीची पेरणी यंदा सुमारे १२ हजार हेक्टरवर झाली आहे. धुळे जिल्ह्यात पेरणी अधिक आहे. जिल्ह्यातील पेरणी सात हजार हेक्टरपर्यंत आहे.
जळगाव जिल्ह्यातही सुमारे चार हजार हेक्टरवर बाजरी पीक आहे. धुळ्यातील शिंदखेडा, साक्री आदी भागांत बाजरी पीक अधिक आहे. जळगावातील चोपडा, चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, पाचोरा आदी भागात बाजरी पीक अधिक आहे. बाजरीची पेरणी खानदेशात डिसेंबरअखेरीस सुरू झाली. कमाल शेतकऱ्यांनी जानेवारीत पेरणी केली आहे.
ही पेरणी यंदा स्थिर आहे. मागील हंगामातही बाजरीची पेरणी सुमारे १२ हजार हेक्टरवर झाली होती. पेरणी वाढलेली नाही. कारण अन्य शेतकरी बाजरी पेरणीकडे वळलेले नाहीत. बाजरीचे दर खरिपात स्थिर होते. आता रब्बीतही दर स्थिर आहेत. अनेक शेतकरी घरात धान्यासह सकस चाऱ्यासाठी बाजरीची पेरणी करतात. यामुळे पेरणी स्थिर आहे.
बाजरीची पेरणी विविध टप्प्यांत झाली आहे. यामुळे काही भागात पीक निसवत आहे. तर काही भागात पीक निसवणीवर आले आहे. काळ्या कसदार जमिनीत पीक जोमात आहे. या क्षेत्रात तीन वेळेस पिकात सिंचन करावे लागले आहे. अनेकांनी सिंचनासाठी ठिबकचा उपयोग केला आहे. यामुळे सिंचन काटेकोरपणे केले जात असून, पीकवाढ व्यवस्थित दिसत आहे.
काळ्या कसदार जमिनीत पुढे दोन वेळेस पिकात सिंचन करावे लागेल. यानंतर पीक हाती येईल. पीक निसवल्यानंतर त्याचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी राखणदारी करावी लागेल. याचीही तयारी शेतकरी करीत आहेत. अनेकांनी बेवडसाठी बाजरीची पेरणी केली आहे. बाजरीची काढणी झाल्यानंतर त्यात मशागत करून केळी, पपईची लागवड करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी केले आहे.
केळी पिकात बाजरी
अनेक शेतकऱ्यांनी काढणी ९० ते ९५ टक्के पूर्ण झालेल्या केळी बागांत बाजरीची पेरणी केली. बाजरीचे पीक बेवडसाठी महत्त्वाचे आहे. कमी पाण्यातही हे पीक येत असल्याने केळी उत्पादक बाजरीची पेरणी करतात. अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागा डिसेंबरअखेरीस काढणी पूर्ण होऊन रिकाम्या झाल्या. या शेतकऱ्यांनी बाजरीची पेरणी केली. केळी पिकात चोपडा, जळगाव, यावल, धुळ्यातील शिरपूर भागात बाजरीची पेरणी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.